नवी दिल्ली : वाढत्या रुग्णसंख्येमुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. बुधवारी (२७ एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे २,९२७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३२ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ५,२३,६५४ वर पोहोचला आहे.
कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जगभरातील रुग्णसंख्येने तब्बल ५१ कोटींचा टप्पा पार केला आहे. भारतातही कोरोनाचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. वेगाने वाढणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन हजारांहून अधिक नवे रुग्ण दररोज आढळून येत आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. काही राज्यांनी कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन पुन्हा निर्बंध लागू केले आहेत.