Wednesday, April 23, 2025
Homeकोकणरायगडसावित्री नदीची गाळसफाई आवश्यक

सावित्री नदीची गाळसफाई आवश्यक

चरई साळवीवाडी सोनारवाडीलगत झाले आहेत दगडगोट्यांचे उंचवटे

शैलेश पालकर

पोलादपूर : दि. २३ जुलै २०२१ रोजी पोलादपूर शहरामध्ये उत्तरवाहिनी सावित्री नदीचे पात्र घुसल्याने मटणमार्केटपासून स्मशानापर्यंत जलप्रलय निर्माण झाला होता. यामागे सावित्री नदीचे पात्र दिवसेंदिवस उथळ होत असल्याने पुराचे पाणी शहरात तब्बल ८ ते १२ फूट उंचीपर्यंत पूररेषा गाठत असल्याचे दिसून आले आहे. चरई गावातील साळवीवाडी आणि सोनारवाडीलगत दगडगोट्यांचे उंचवटे तयार झाल्याने पोलादपूर शहरातील पूरस्थितीनियंत्रणासाठी ठिकठिकाणी सावित्री नदीची गाळसफाई आवश्यक ठरत आहे.

२००५ मध्ये पोलादपूर शहरातील उत्तरवाहिनी सावित्री नदीला आलेल्या पूरपरिस्थितीत चरई पुलाचा चरईबाजूकडील ऍप्रोच रोड वाहून गेला. २०२१ मध्येही चरई बाजूकडील ऍप्रोच रोड वाहून गेल्याने पुराचे पाणी या ऍप्रोच रोडमुळे परत शहराकडे वळून पूरस्थिती निर्माण होत असल्याचा अंदाज लावला जात असताना पुराच्या पाण्याच्या पातळीतील वाढ तब्बल ८ ते १२ फूट उंच असल्याचे दिसून आल्याने उत्तरवाहिनी सावित्री नदी पात्रातील पोलादपूर शहरालगतचा तसेच चरई गावातील साळवीवाडी आणि सोनारवाडीलगत गाळ उपसा करण्याची गरज स्पष्ट झाली आहे. अखिल भारतीय सेनेचे पोलादपूरमधील कार्यकर्ते महेंद्र सकपाळ यांनी संपूर्ण पोलादपूर शहराच्या बाजूला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी केली असताना अन्य कोणत्याही राजकीय पक्षांना कोणत्याही उपाययोजना शासनाला सुचवण्यासंदर्भात सोयरसुतक नसल्याचे जाणवत आहे.

महाड शहरातील जुटे काढण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जात असताना पोलादपूर तालुक्यातूनच महाडकडे प्रचंड पुराच्या पाण्यासह सावित्री नदी वेगाने जात असल्याकडे राज्यकर्ते व प्रशासनाचे सपशेल दूर्लक्ष सुरू आहे. त्यामुळे पोलादपूर शहर तसेच तालुक्यातील नद्यांचा गाळउपसा करण्याकडे कोणीही गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून आले आहे.

पोलादपूरच्या पुरानंतर लगेचच पोलादपूर नगरपंचायतीची निवडणूक होऊ घातली असताना उपाययोजनांच्या स्वप्नांची उधळण वेळोवेळी सत्ताधाऱ्यांकडून मतदारांवर झाली. प्रत्यक्षात कोणतीही कृती न झाल्याने २०२२ च्या आगामी पावसाळ्यात पुन्हा पोलादपुरकरांना पूरस्थितीला सामोरे जावे लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -