शैलेश पालकर
पोलादपूर : तालुक्यातील ग्रामीण भागात गुरुवारी सकाळी पाऊस पडल्यानंतर शुक्रवारी सायंकाळनंतर सोसाट्याच्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडून आंबा बागायतदार शेतकरी आणि घरे तसेच गोठ्यांचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त होत आहे. मात्र, महसूल विभागाला वीकएण्डच्या सलग सुट्ट्या असल्याने या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे रखडले असून सोमवारनंतर या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यसरकारकडून झाल्यास तालुक्यातही पंचनामे सुरू केले जातील, असा अंदाज वर्तवला जात आहे.
गुरूवारी सकाळी आभाळ भरल्यानंतर अर्धा तास पावसाने शिडकावा केला असताना शुक्रवारी सायंकाळी पुन्हा आभाळ दाटून आले आणि जोरदार सोसाट्याचे वारे वाहू लागून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी महावितरणने विद्युतपुरवठा खंडित ठेवल्याने ग्रामीण भागात हानीचा अंदाज घेण्यास आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी प्रयत्न केल्यानंतर रस्त्यावर कैऱ्यांचा सडा पडल्याचे प्रकाशझोतामध्ये दिसून आले.
मात्र, शनिवारी दिवसा आंबा बागायतीकडे लक्ष टाकले असता शेतकऱ्यांना आंब्याच्या झाडांच्या फांद्या तुटून अनेक झाडांची हानी झाली असून असंख्य आंबे व कैऱ्यांचा खच झाडाखाली गळून पडल्याने नवी मुंबई वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत आंब्यांचीअंदाज आहे. तालुक्यात कृषी अधिकारी कार्यालयामार्फत फळपीक विमा मोबदला देणाऱ्या कंपन्यांनी तातडीने त्यांचे एजंट पाठवून झालेल्या अवकाळी नुकसानाचा विमा देण्याची व्यवस्था करण्याची अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
शाळा, अंगणवाड्या व इतर इमारतींचेही नुकसान
दरम्यान, शाळागृह, अंगणवाड्या तसेच अन्य सार्वजनिक इमारती तसेच शेतकऱ्यांची घरे व गोठ्यांचेही मोठ्या संख्येने नुकसान झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृत सरकारी आकडेवारी प्राप्त होण्यासाठी सोमवारी महसूल आणि कृषी विभागामार्फत पंचनामे होण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.