ठाणे (प्रतिनिधी) : गर्भवती महिला आणि बालकांसाठी नरेंद्र मोदी सरकारने सुरू केलेल्या आरोग्य, पोषण अभियानाचा फायदा देशातील ६ कोटींहून अधिक महिला व बालकांना झाला आहे, अशी माहिती भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त नरेंद्र मोदी सरकारच्या आरोग्य पोषण अभियानातील कामगिरीची माहिती डावखरे यांनी पत्रकात दिली आहे. देशातील महिला, बालक आणि गर्भवती स्त्रियांचे कुपोषणापासून रक्षण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पोषण अभियानांतर्गत विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी केली.
त्याअंतर्गत २०१४ मध्ये मिशन इंद्रधनुष सुरू करण्यात आले. या अभियानात मार्च २०२२ पर्यंत ४ कोटी १० लाख बालकांना विविध आजारांवरील लसी देण्यात आल्या. घटसर्प, डांग्या खोकला (पर्टुसिस), टिटॅनस, पोलिओ, क्षयरोग, गोवर आणि हिपॅटायटीस बी यासारख्या गंभीर आजारांवर लस देणे, सर्व लहान मुले आणि गर्भवती महिलांचे लसीकरण करणे हे ‘मिशन इंद्रधनुष’चे उद्दिष्ट आहे. ३५२ जिल्ह्यांमध्ये पूर्ण लसीकरण केले जाणार आहे, असे डावखरे यांनी पत्रकात म्हटले आहे.
गर्भवती महिलांसाठी आरोग्य सेवा सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने मातृत्व वंदना योजना सुरू करण्यात आली. गर्भवती महिलेला पौष्टिक आहार मिळावा यासाठी त्या महिलेच्या बँक खात्यात ५ हजार रुपये जमा केले जातात. तसेच प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला गर्भवती महिलांची मोफत आरोग्य तपासणी करून मोफत आवश्यक उपचार दिले जातात. गर्भवती महिलांसाठी देशभरातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू आहे. या योजनेत आतापर्यंत सुमारे ६ हजार कोटी रुपये गर्भवती महिलांना देण्यात आले.
या योजनेच्या महिला लाभार्थ्यांची संख्या सुमारे २ कोटी आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. दुर्गम भागातील अल्प उत्पन्न गटातील महिला, बालके अनेक आजारांवरील उपचारापासून आर्थिक आणि अन्य कारणांमुळे वंचित राहतात. या सर्वांना मिशन इंद्रधनुष व मातृत्व वंदना योजनेचा फायदा मिळत आहे, असे आमदार डावखरे यांनी नमूद केले.