मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई -रेल्वेने उपनगरीय आणि मेल/एक्स्प्रेस गाड्यांमध्ये अलार्म चेन पुलिंग पर्याय उपलब्ध करून दिला आहे. मात्र, प्रवासी अलार्म चेन पुलिंगचा वापर स्थानकात उशिरा पोहोचणे, मधल्या स्थानकांवर उतरणे, चढणे इत्यादी शुल्लक कारणांसाठी करत असल्याचे समोर आले असून केवळ १ एप्रिल ते २० एप्रिल या २० दिवसांत १५७ चेन पुलिंगची प्रकरणे नोंदवली आहेत, तर यात १०८ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान रेल्वेने यात ४७,२०० दंड वसूल केला आहे.
विशेष म्हणजे ट्रेनमधील अलार्म चेन पुलिंगच्या कृतीचा केवळ त्या विशिष्ट ट्रेनच्या वेळापत्रकावरच परिणाम होत नाही, तर त्या ट्रेनच्या मागून चालणाऱ्या गाड्यांवरही परिणाम होतो. मुंबई विभागासारख्या उपनगरीय प्रणालीमध्ये, यामुळे मेल/एक्स्प्रेस आणि उपनगरी गाड्या उशिराने चालतात आणि त्याच्या वक्तशीरपणाला बाधा येते.
तसेच एखाद्या किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी अलार्म चेन पुलिंगचा गैरवापर केल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. दरम्यान रेल्वे प्रवाशांनी गरज नसताना चेन पुलिंगचा वापर करू नये तसेच कायद्याच्या कलम १४१ नुसार दंडनीय गुन्हा असल्याचे रेल्वेने सांगितले आहे.