मुंबई (प्रतिनिधी) : देशातील मत्स्य आणि जलजीवन क्षेत्रातील मनुष्यबळ विकासविषयक प्रमुख संस्था असलेल्या सीआयएफई अर्थात मुंबईतील केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्थेने अभ्यासक्रमाचा भाग म्हणून उद्योजकता विकास शिकवण्याची सुरुवात करावी आणि विद्यार्थ्यांना सरकारच्या विविध योजनांची माहिती द्यावी, अशी सूचना केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी शनिवारी केली.
मुंबईतील केंद्रीय मत्स्योद्योग शिक्षण संस्थेचा पंधरावा पदवीदान समारंभ शनिवारी मुंबईतील संस्थेच्या सभागृह परिसरात संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. रूपाला म्हणाले की, भारतीय जलाशय-उत्पादनांना जगभरात मान्यता आहे आणि ८ हजार किमीच्या किनारपट्टीमुळे देशाच्या मत्स्योद्योग क्षेत्रात अमाप संधी आहेत.
देशाच्या मत्स्योद्योग क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी शिक्षणाचा आणि ज्ञानाचा सर्वोत्तम वापर करा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. सीआयएफईच्या १५व्या पदवीदान समारंभात २३० मत्स्यविज्ञान पदव्युत्तर पदवीधर आणि ८८ पीएचडी धारकांना शैक्षणिक वर्षात केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला यांच्या हस्ते सर्वोत्तम गुणवत्तेसाठी विविध पुरस्कार/पदके यांच्यासह पदव्या प्रदान करण्यात आल्या.
डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. डॉ. मोहपात्रा यांनी मत्स्योद्योगाच्या महत्त्वावर भर दिला.