Tuesday, April 29, 2025
Homeमहामुंबईचार पिढ्यांपासून मुंबईत राहणारे उत्तर भारतीय हेदेखील मुंबईकरच

चार पिढ्यांपासून मुंबईत राहणारे उत्तर भारतीय हेदेखील मुंबईकरच

देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबई (प्रतिनिधी) : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उत्तर भारतीय मुद्द्यावर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. ज्या उत्तर भारतीय नागरिकांच्या तीन ते चार पिढ्या मुंबईत राहत आहेत ते सगळेच मुंबईकर असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. या सर्वच उत्तर भारतीय नागरिकांनी महाराष्ट्राची संस्कृती अंगीकारली आहे. उत्तर भारतीय संघाने कर्करोगग्रस्त रुग्णांच्या नातेवाईकांसाठी तसेच यात्रेकरूंसाठी उभारलेल्या विश्रामगृहाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीसांनी हे विधान केले. वांद्रे पूर्व येथे नव्याने बांधण्यात आलेल्या बाबू आर एन सिंह गेस्ट हाऊसचे उद्घाटन त्यांनी केले.

मुंबईत टाटा कॅन्सर रुग्णालय येथे उपचारासाठी देशभरातून येणाऱ्या कर्करोग रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांसाठी घेण्यात आलेल्या या पुढाकारामुळे अनेकांना याचा फायदा होईल. आपल्या वडिलांना कर्करोगाच्या उपचारासाठी नेतानाचा अनुभव सांगताना ते म्हणाले की, मी अनेक रुग्णांच्या नातेवाइकांना तसेच रुग्णांनाही रस्त्यावर राहताना पाहिले आहे. रुग्णांच्या नातेवाइकांची गरज आणि मागणी लक्षात घेता या बाबू आर एन सिंह गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची तसेच अन्नाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यल्प दरात अशी ही व्यवस्था गेस्ट हाऊसच्या पुढाकाराने करण्यात आली आहे. रुग्णसेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे, असेही फडणवीस या प्रसंगी म्हणाले.

उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आर. एन. सिंह यांनी सांगितले की, ‘बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह’ ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर  चालविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यातून विशेष म्हणजे  उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात कर्करोगग्रस्त रुग्ण उपचारासाठी मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात येतात. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही रुग्णालयाबाहेर रस्त्यावर राहावे लागत आहे. अशा रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अतिशय अल्प दरात बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह उपलब्ध करून दिले जातील. याशिवाय देवदर्शनाला येणाऱ्या नागरिकांना सुद्धा  अतिथीगृह उपलब्ध करून देण्यात येईल.

या कार्यक्रमाला माजी मंत्री आणि प्रदेश भाजप उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह, मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा, माजी मंत्री नसीम खान, भाजप आमदार आशीष शेलार, राजहंस सिंह, माजी मंत्री रमेश दुबे, महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चा अध्यक्ष संजय पांडे, मुंबई भाजप उपाध्यक्ष अमरजीत सिंह, उत्तर भारतीय संघ युवा मोर्चा अध्यक्ष संजय सिंह, आदि उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -