शिबानी जोशी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते हे आयुष्यभर संघाचे पक्के कार्यकर्ते असतात.अन्य कोणत्याही कामात ते व्यग्र असले तरी त्यांच्या मनात कायम समाजविकासाचा विचार धगधगत असतो. त्यापैकीच एक दि. वी. असेरकर. असेरकर हे उत्तर प्रदेशमध्ये प्रचारक होते. निवृत्तीनंतर ते ठाण्यात स्थायिक झाले होते. त्यांना असं वाटू लागलं की, संघ विचारावर आधारित कार्य करणाऱ्या अनेक संस्था आहेत. पण एखादा वैचारिक उपक्रमही राबवला गेला पाहिजे, ज्या उपक्रमामुळे वैचारिक जागरण होऊ शकेल. राष्ट्रीय विचारांची जी वैचारिक भूमिका आहे, ती सोप्या पद्धतीने सामान्य नागरिकांसमोर मांडावी आणि विचारमंथन व्हावं, असं त्यांना वाटत होतं. ठाण्यात असं काहीतरी ठोस सुरू व्हावं म्हणून त्यांनी दीनदयाळ प्रेरणा केंद्राची स्थापना केली आणि त्यायोगे व्याख्यान, चर्चा, स्पर्धा, नियमित बैठका, सर्वसाधारण सभा असं आयोजून राष्ट्रीय विचार लोकांमध्ये जागृत करण्याचा प्रयत्न सुरू केला. आता दीनदयाल यांचं नाव संस्थेला देऊनच हे काम त्यांनी का सुरू केलं? तर १९४०च्या दशकात उत्तर प्रदेशात दीनदयाळजी यांच्या समवेत दि. वि. असेरकर कार्यरत होते. यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेद्वारे दिनदयाळजींचे दि. वि. असेरकर लिखित चरित्र प्रकाशित करूनच संस्थेच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता. निर्विवाद देशभक्ती, संपूर्ण समर्पित सेवाभाव आणि प्राचीन भारतीय संस्कृतीचा जाज्वल्य, विज्ञाननिष्ठ अभिमान हे सारे अनोखे पैलू पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या रूपाने समूर्त साकार झाले होते. १९५१ साली डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुढाकाराने भारतीय जनसंघाची स्थापना झाली. संघाचे तत्कालिन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या सूचनेनुसार दीनदयाळ उपाध्याय यांनी त्या पक्षाच्या प्रसाराची आणि जडणघडणीची जबाबदारी स्वीकारली. एकात्म मानवदर्शन, सांस्कृतिक राष्ट्रवाद, स्वदेशी अर्थनिती, राष्ट्रीय चारित्र्याचे संवर्धन करणारे राजकारण, सामाजिक समरसता, अंत्योदयाची मांडणी अशा बाबींचे भक्कम अधिष्ठान राजकारणाला प्रदान करण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलं. १९६७ साली त्यांची जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली. याच पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे चरित्र, कर्तृत्व आणि प्रेरणा यांचा उज्ज्वल वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने १९९५ साली दिनदयाळ प्रेरणा केंद्र, ठाणे या संस्थेची स्थापना आणि नोंदणी करण्यात आली. त्यांच्याबरोबर प्रामुख्याने सुधाकर ओजाळे, चंद्रकांत धोपाटे, सदाशिव लेले, अरविंद फडके, रवींद्र महाजन, माधव बिवलकर असे संघ विचारांचे कार्यकर्ते सक्रिय काम करू लागले. २६ वर्ष सातत्यानं वैचारिक आदान-प्रदान करणारे विविध उपक्रम संस्था राबवत आहे.
संस्थेद्वारे दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त दर वर्षी विविध उपक्रम आयोजित केले जातातच आणि राष्ट्रीय विचार पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय अर्थसंकल्पाचे तज्ज्ञ वक्त्यांकडून विश्लेषण करणारे व्याख्यान संस्थेतर्फे आयोजित केले जात आहे. संस्थेच्या या अशा सगळ्या उपक्रमांना भरघोस प्रतिसाद लाभत आहे. भारतरत्न ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख, प्रा. डॉ. अशोक मोडक, डॉ. विनायक गोविलकर, प्रा. शेषराव मोरे, प्रा. सदानंद मोरे, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, अरुण करमरकर, मृगांक परांजपे, डॉ. अभिजीत फडणीस, चंद्रशेखर टिळक असे मान्यवर वक्ते संस्थेतर्फे निमंत्रित करण्यात आले आहेत.
सामाजिक विषयांवर कार्यशाळा हा संस्थेचा आणखी एक उपक्रम आहे. तसंच कालानुरूप येणाऱ्या मुद्द्यांवर व्याख्याने आयोजित केली जातात. सध्या आपण स्वातंत्र्याची ७५ वर्ष आजादी का अमृत महोत्सव साजरा करत आहोत. त्यानिमित्तानं वसाहतवाद, मानसिक गुलामगिरी या विषयांवर कार्यशाळा, व्याख्याने आयोजित केली होती.
त्याशिवाय अशाच काही राष्ट्रीय मुद्द्यांवरची पुस्तकही प्रकाशित केली जातात. चीन-भारत संघर्षादरम्यान गलवानमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्यासंबंधीचे पुस्तक नुकतंच प्रकाशित करण्यात आलं होतं. ठाण्यातील सुरुवाणी ही संस्कृत भाषेचा प्रचार प्रसार करणारी शाळा आहे. त्यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत विषयाच्या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी तसेच खुल्या वर्गासाठी आयोजित केल्या जातात. सध्या सुप्रसिद्ध पत्रकार मकरंद मुळे या संस्थेचे कार्यवाह आहेत, तर भा. वा. दाते हे अध्यक्ष आहेत. आता अफगाणिस्तानवर येत्या दोन महिन्यांत पुस्तक प्रकाशित केलं जाणार आहे. गेली २६ वर्ष अथकपणे ठाणेकरांना वैचारिक खाद्य पुरवणाऱ्या या संस्थेतर्फे पुढील टप्प्यात या सर्व उपक्रमांना गती देत असताना संशोधन, कौशल्य विकास, उद्योजकता प्रोत्साहन, सेवा-सहकार-स्वदेशी यावर काम केले जाणार आहे. शिष्यवृत्ती, स्पर्धा यांची योजना आहे. कृतिशील कार्यक्रमांची रचना केली जाणार आहे. वैचारिक वाङ्मय निर्मिती होणार आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी सांगितलेले एकात्म मानवदर्शनाचे तत्त्वज्ञान खूप महत्त्वाचं असून आजच्या काळातही उपयुक्त ठरणारं आहे. त्यामुळेच हे तत्त्वज्ञान सुलभपणे समाजात रुजविण्याचाही संस्थेचा मानस आहे.