जळगाव : विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा गेल्या चार महिन्यांपासून संप सुरू आहे. अनेक एसटी कर्मचाऱ्यांचे यामुळे हाल होत असल्याने कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या तर तणाव सहन न झाल्याने काहींचे निधन झाले आहे. आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका एसटी कर्मचाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
एसटी संपात सहभागी झालेल्या यावल डेपोच्या (वय ४८ वर्षे) चालकाने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून (सुसाइड नोट) लिहून जळगाव शहरात रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत एसटी चालक हे यावल डेपोत कार्यरत होते. शिवाजी पंडीत पाटील असे त्यांचे नाव आहे.
शिवाजी पाटील यांनी आत्महत्येपूर्वी सुसाइडनोट लिहून ठेवली आहे. यात त्यांनी मनस्थिती खराब असल्याने हे पाउल उचलत असल्याचे म्हटले आहे. त्यांचा मृतदेह जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, अशी संपकरी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानं नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल आला आहे. विलिनीकरणाची मागणी व्यवहार्य नसल्याचं सांगत समितीनं ही मागणी अहवालातून फेटाळून लावली आहे. राज्य सरकारनेही विलिनीकरण शक्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे संपाचा तिढा कायम आहे.