LATEST ARTICLES

CBSE Board वर्षातून दोनदा परीक्षा घेणार; कसा असेल हा नवा नियम?

जाणून घ्या सविस्तर

मुंबई : देशभरात निवडणुकांचे वारे वाहत असताना अनेक कंपन्या किंवा बँका अशा विविध गोष्टींबाबत वेगवेगळे अपडेट मिळत आहेत. अशातच १०वी आणि १२वी २०२४ बोर्डाचा निकाल लागण्यापूर्वी एक मोठी घोषणा समोर आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ येत्या शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ११वी आणि १२वी च्या परीक्षांमध्ये कार्यक्षमतेवर आधारित प्रश्न (Efficiency based question) ची संख्या वाढू शकणार आहे. केंद्रिय शिक्षण मंत्रालयाने केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाला (CBSE Board) वर्षातून दोन वेळा परीक्षा घेण्याची तयारी करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीबीएसईच्या बोर्ड परीक्षेच्या आगामी सत्रात राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पूर्ण प्रभाव दिसण्याची शक्यता आहे. त्याला अनुसरुन वर्षातून २ परीक्षा घेऊ शकतं. शिक्षण मंत्रालयाने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाला आगमी शैक्षणिक सत्र२०२५-२६ मध्ये दोन वेळा बोर्ड परीक्षांचं आयोजन करण्याच्या योजनेवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. यानंतर सीबीएसई आता नव्याने शैक्षणिक कॅलेंडर कशाप्रकारे तयार करायचं याचा विचार करत आहे. पदवीपूर्व प्रवेश परीक्षांवर परिणाम न होता, वर्षातून २ वेळा बोर्ड परीक्षांचं आयोजन कसं करायचं याचा विचार बोर्ड करत आहे.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, ‘शिक्षण मंत्रालयाने सीबीएसई बोर्डाला वर्षातून दोनदा परीक्षा कशाप्रकारे घेता येईल याचा विचार करण्याचा आणि त्यानुसार योजना आखण्याचा आदेश दिला आहे. बोर्ड त्यावर काम करत आहे. पुढील महिन्यात यासंबंधी शाळेच्या मुख्याध्यापकांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे’. आचारसंहिता संपल्यानंतर सीबीएसई दोन वेळा बोर्ड परीक्षा आयोजित करण्याच्या योजनेला अंतिम रुप देण्यासाठी वेगवेगळ्या शाळांशी चर्चा करेल, असे पीटीआयने सांगितले.

विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळण्याचा उद्देश

विद्यार्थी बोर्ड परीक्षांपासून तणावमुक्त व्हावेत तसंच त्यांना अधिक संधी मिळावी हा यामागील मुख्य उद्देश आहे. शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं होतं की, अनेकदा विद्यार्थी आपलं एक वर्ष वाया गेलं आणि आपलं यापेक्षा चांगली कामगिरी करु शकलो असतो असा विचार करत फार ताण घेतात. फक्त एकच संधी असल्याचा विचार करत विद्यार्थी फार ताण घेत असल्याने त्यांना दोन परीक्षांचा पर्याय उपलब्ध केला जात आहे. ही परीक्षा कशाप्रकारे घ्यायची यावर सध्या विचार सुरु आहे. तसंच सेमिस्टर योजना लागू करण्याचा प्रस्ताव मात्र फेटाळण्यात आला आहे.

दोनदा परीक्षा देणं अनिवार्य असणार का?

  • मंत्रालयाने गतवर्षी ऑगस्टमध्ये जारी केलेल्या नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम रचनेत (NCF) विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा देण्याचा पर्याय दिला जावा असाही प्रस्ताव देण्यात आला होता. तसेच, विद्यार्थ्यांना सर्वोत्तम गुण राखण्यासाठी परवानगी देण्यास सांगितले होते.
  • MoE च्या नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार, इयत्ता ११, १२ च्या विद्यार्थ्यांनी दोन भाषांचा अभ्यास केला पाहिजे आणि यापैकी एक भारतीय भाषा असावी. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पीटीआयला सांगितले होते की, विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाच्या परीक्षेला बसणे बंधनकारक नाही.
  • विद्यार्थ्यांना जेईईसारख्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेला वर्षातून दोनदा बसण्याचा पर्याय असेल (इयत्ता १० आणि १२ बोर्ड). ते सर्वोत्तम गुण निवडू शकतात, परंतु ते पूर्णपणे ऐच्छिक असेल, कोणतीही सक्ती नसेल असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.

Hemant Soren : हेमंत सोरेन यांच्या तात्पुरत्या जामीनाचा अर्ज ईडीने फेटाळला!

काय आहे प्रकरण?

रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना ईडीने (ED) जमीन घोटाळ्याप्रकरणी जानेवारी महिन्यात अटक केली. यानंतर हेमंत सोरेन यांनी त्यांचे चुलते राजाराम सोरेन यांचं निधन झाल्यामुळे १३ दिवसांचा जामीन द्यावा, अशी मागणी केली होती. या तात्पुरत्या जामिनावर आज ईडी कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

हेमंत सोरेन यांच्या वतीने दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं होतं की, त्यांचे चुलते राजाराम सोरेन यांचं निधन झालं आहे. त्यांच्या क्रियाकर्मासाठी १३ दिवसांचा जामीन द्यावा. परंतु ईडी कोर्टाने हेमंत सोरेन यांना तात्पुरता जामीन देण्यास नकार दिला आहे. कोर्टाने सोरेने यांची याचिका फेटाळून लावली आहे.

दरम्यान, जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने हेमंत सोरेन यांना अटक केली आहे. सध्या ते होटवार जेलमध्ये आहेत. या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निर्णय सुरक्षित ठेवला.

यापूर्वी हेमंत सोरेन यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. २४ एप्रिल रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात म्हटलं होतं की, ईडीच्या अटकेविरोधातील याचिकेवर हायकोर्ट निर्णय देत नाहीये. उच्च न्यायालयाने २८ फेब्रुवारी रोजी आपला निकाल राखून ठेवला होता.

Ujjwal Nikam : उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर

मुंबई : भाजपाने (BJP) उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच जागेवर महाविकास आघाडीने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता निकम विरुद्ध गायकवाड यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे.

उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात मुस्लिम व ख्रिश्चन मतदारांची संख्या पाच-सहा लाख असून त्यांचे मतदान शक्यतो भाजपाविरोधात जाते. विलेपार्ले, चांदिवली, कुर्ल्यातील काही भाग, कालिना, वांद्रे सरकारी कॉलनी आदी भागात मराठी, उत्तर भारतीय व अन्य मतदार आपल्याबरोबर राहतील, असे भाजपाला वाटत आहे. खासदार पूनम महाजन या २०१९ मध्ये एक लाख ३७ हजार मतांनी निवडून आल्या होत्या. पण महाजन यांच्या विरोधातील कार्यकर्त्यांच्या तक्रारी, मतदारांशी पुरेसा संपर्क नसणे, आदी बाबींमुळे भाजपाने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली नाही.

मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांना भाजपा नेत्यांनी निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारणातच रहायचे असल्याने त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. त्यामुळे अन्य नावांबरोबरच भाजपाने निकम यांच्याबाबतही विचार केला व त्यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले.

दरम्यान, १९९३ चा मुंबई बाँबस्फोट खटला, मुंबईवरील अतिरेकी हल्ला यासह अनेक महत्वाच्या खटल्यांमध्ये अतिरेक्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होण्यासाठी निकम यांनी राज्य सरकारची यशस्वीपणे बाजू मांडली. तर खैरलांजी, सोनई येथील दलितांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये आरोपींना कठोर शासन घडविण्यासाठी निकम यांनी मोलाची कामगिरी बजावली. निकम यांचे सर्वपक्षीय नेत्यांशी चांगले संबंध असून त्याचा त्यांना उपयोग होईल.

Shashikant Shinde : १३८ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल!

शशिकांत शिंदे मविआचे साताऱ्यातील उमेदवार

साताऱ्यात मविआच्या अडचणीत वाढ

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या सातारा लोकसभा (Satara Loksabha) मतदारसंघात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) एक मोठा धक्का बसला आहे. राज्यभरातून मविआला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाच आता साताऱ्यातही मविआच्या अडचणीत वाढ झाली आहे. याचं कारण म्हणजे १३८ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी मविआचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदेंवर (Shashikant Shinde) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील एफएसआय घोटाळा (Market FSI Scam) प्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शशिकांत शिंदे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरुवातीला ८ ते १० कोटींच्या शौचालय घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी शशिकांत शिंदे यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याने त्यांची अटक टळली होती. पण इतर काही संचालकांवर अटकेची कारवाई झाली होती. त्यानंतर आता मसाला मार्केटमधील १३८ कोटींचा घोटाळा समोर आला आहे. मुंबईतील APMC पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

सन २००९ पासून या प्रकरणाची चौकशी सुरु होती पण यात गुन्हा दाखल होत नव्हता. प्रशासक मनोज सैनिक यांनी या प्रकरणाचा अहवाल तयार केला. यामध्ये ६५ कोटींच्या एफएसआयमध्ये फसवणूक झाल्याचा दावा केला आहे. अखेर काल रात्री एपीएमसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. दरम्यान, १२ एप्रिल रोजी शशिकांत शिंदे यांनी कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यामुळे या प्रकरणात कोर्ट काय निकाल देतंय हे पाहणं महत्वाचं आहे.

Devendra Fadnavis : आपल्याकडे महायुती तर राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी!

काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट दाखवलं

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सणसणीत टीका

सांगली : सध्या देशात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राजकीय नेते उन्हातानात सभा घेत विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. त्यातच आज सांगली लोकसभा (Sangli Loksabha) मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचाराची सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. त्यांनी सभेला संबोधित करताना शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर हल्लाबोल केला. शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी (Naremdra Modi) यांनी काय केले?, अशी टीका शरद पवारांनी अनेकदा केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत ‘काँग्रेसने अनेक वर्ष राज्य केलं, पण जनतेला फक्त चॉकलेट दाखवलं’, अशी खोचक टीका केली. शिवाय ‘आपल्याकडे महायुती तर राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे’, असा टोलाही त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सांगलीमध्ये संजयकाका पाटील यांच्यासह अजून काही उमेदवार आहेत. या उमेदवारांची ही निवडणूक नाही. या निवडणुकीत दोनच पर्यांय आहेत. एक पर्याय नरेंद्र मोदी आणि दुसरा पर्याय राहुल गांधी. एकीकडे आपली महायुती तर दुसरीकडे राहुल गांधींकडे २६ पक्षांची खिचडी आहे. ही लढाई दोन व्यक्तिमत्वांमधील आहे. आपल्याकडे नरेंद्र मोदी यांच्यासारखे मजबूत इंजिन आहे. त्या इंजिनबरोबर वेगवेगळ्या पक्षांचे डब्बे लावले आहेत. ही आपल्या विकासाची ट्रेन आहे. या विकासाच्या ट्रेनमध्ये गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आहेत. महायुतीची ही गाडी सबका साथ सबका विकास म्हणत पुढे चालली आहे. विरोधकांकडे काय अवस्था आहे”, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पुढे ते म्हणाले, “राहुल गांधी म्हणतात मी इंजिन, तर शरद पवार म्हणतात मी इंजिन, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन. आता त्यांच्याकडे कोणीही डब्बे लावायला तयार नाही. शरद पवार यांच्या इंजिनमध्ये फक्त सुप्रिया सुळे आहेत. उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरे यांनाच जागा आहे. त्यांच्या इंजिनमध्ये जनतेसाठी जागा नाही. काँग्रेसच्या सरकारने अनेक वर्षे राज्य केले. आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदे भोगली. पण जनतेला फक्त चॉकलेट दिले. दुसरीकडे आपण ८० कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचे काम केले”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर केली.

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

“ज्यावेळी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले होते, त्यावेळी महाराष्ट्रातील एका नेत्याने म्हटलं होतं की, नरेंद्र मोदी यांना उसाच्या शेतीबाबत काय कळतं. नरेंद्र मोदी यांना साखर कारखान्याबाबत काय कळतं. मात्र, आज दहा वर्षांनंतर मी दाव्याने सांगतो, ६० वर्षांचा त्यांचा इतिहास काढा आणि १० वर्षांचा मोदींचा कार्यकाळ काढा. साखर कारखान्यांसाठी आणि उसाच्या शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी जेवढे निर्णय घेतले, तेवढे आजपर्यंतच्या इतिहासात कधीही झाले नव्हते”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता शरद पवारांना लगावला.

काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी दिला

राजेश क्षीरसागर यांची टीका

कोल्हापूर : निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. त्यात एकनाथ शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) यांनी कोल्हापूरच्या राजघराण्यावर गंभीर वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.

राजेश क्षीरसागर हे कोल्हापूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी सतेज पाटील, सुषमा अंधारे यांच्यावर देखील टीका केली.

छत्रपती घराण्याचा मान कसा ठेवायचा, हे आम्हाला कोणीही शिकवू नये. संभाजीराजे छत्रपती यांचा मान आम्ही ठेवला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना पराभव समोर दिसत असतानासुद्धा उमेदवारीची आपल्या गळ्यातील माळ शाहू महाराजांच्या (Shahu Maharaj) गळ्यात घातली. काँग्रेसने शाहू महाराजांचा राजकीय बळी देण्याचे काम केले आहे, असा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला आहे. सतेज पाटील घाणेरड राजकारण करत असतील तर कोल्हापूरची जनता माफ करणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेला आले म्हणून त्यांचा जळफळाट का होतोय? ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी सभा घेतात त्या ठिकाणी उमेदवार निवडणून येतो, असा दावा राजेश क्षीरसागर यांनी केला.

छत्रपती घराण्याचा मान कसा ठेवायचा हे आम्हाला शिकवू नका. छत्रपती संभाजी यांचा मान आम्हीच ठेवला आहे. शाहू महाराजांनी राजकारणात पडू नये, असं आम्हाला वाटतं. छत्रपती पद हेच सर्वात मोठं पद आहे. मात्र आता शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.

शाहू महाराजांना राजकीय बळी देण्याचं काम काँग्रेसनं केलं आहे. छत्रपती घराण्याचे खरे वारसदार कोण? असा सवाल अनेकदा उपस्थित केला जात आहे. कदमबांडे यांची देखील चर्चा करण्यात आली. छत्रपती घराण्याने राजकारणात पडू नये म्हणून याआधीच मालोजीराजे आणि संभाजीराजे यांचा कोल्हापूरकरांनी पराभव केला. निवडणुकीमध्ये गादीचा अपमान होणार आहे मात्र असे करणाऱ्याला जनता माफ करणार नाही, असे राजेश क्षीरसागर म्हणाले.

एमआयएम पक्षाची कोल्हापूरमध्ये एकही शाखा नाही. कोण आहेत हे एमआयएमवाले? ते पुन्हा कोल्हापूरमध्ये आले तर आम्ही त्यांना फोडून काढू. आम्ही देखील हिंदू आहोत. सुषमा अंधारे हे फालतू, पेड बाई आहेत, असे म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंवर देखिल टीका केली.

कोकणातील प्रवाशांसाठी खूशखबर : तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेस पावसाळ्यातही सुरु राहणार; आरक्षण झाले खुले

मुंबई : कोकणातील बहुसंख्य लोक मुंबईत स्थायिक झाले आहेत. त्यामुळे कोकणात जाण्यासाठी कोकण रेल्वेच्या गाड्या कायम तुडूंब भरुन जात असतात. उन्हाळी सुट्ट्यांपासून गणपतीपर्यंत म्हणजे सप्टेंबरपर्यंत गावी जाण्यासाठी कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक असते. यामुळे कोकणातील लोकांना सहज आरक्षण मिळत नाही. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडत असतात. यामुळे या मार्गावर अनेक गाड्या रद्द केल्या जातात. त्यामुळे येत्या १० जूननंतरची कोकणात जाणारी वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस (Tejas Express and Vande Bharat Express) रद्द करण्यात आल्याची माहिती आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर देण्यात आली होती. यामुळे कोकण अन् गोवामध्ये जाणारे लोक संभ्रमात पडले होते.

कोकण रेल्वे पावसाळ्यात दरडीचा धोका लक्षात घेऊन १० जून ते ३१ ऑक्टोबरपर्यंत नवीन वेळापत्रक लागू करते. तसेच रेल्वेचे आरक्षण प्रवासाच्या १२० दिवस आधी सुरू होते असते. यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेसचे रेल्वे आरक्षण खुले झाले नव्हते. परंतु आता या गाड्यांचे आरक्षण खुले झाले आहे. यामुळे तेजस आणि वंदे भारत एक्स्प्रेस पावसाळ्यात सुरु राहणार आहेत. त्यामुळे यासंदर्भात निर्माण झालेला गोंधळ दूर झाला आहे.

पावसाळी वेळापत्रकातही कोकण रेल्वे मार्गावर वंदे भारत आणि तेजस एक्स्प्रेस धावणार आहे. मध्य आणि कोकण रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे आयआरसीटीसीच्या संकेत स्थळावर १० जून नंतरच्या या दोन रेल्वे गाड्यांचे आरक्षण सुरु करण्यात आले आहे. शुक्रवारपासून हे आरक्षण सुरु झाले आहे. यामुळे गणेश उत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची चांगली सोय होणार आहे.

दरम्यान, कोकण आणि मध्य रेल्वेने कोकण मार्गावर उन्हाळी सुट्यांमध्ये ३६ विशेष वातानुकूलित रेल्वे सुरु केल्या आहेत. ही रेल्वे २६ एप्रिल ते २ जूनपर्यंत आहे. यामुळे कोकणवासीयांना वातानुकूलित रेल्वेतून प्रवाशाचा आनंद मिळणार आहे. या विशेष रेल्वेमध्ये १५ तृतीय वातानुकूलित कोच आहे. तसेच मुंबई आणि दानापूर दरम्यान दोन विशेष रेल्वे चालवली जाणार आहे. ट्रेन संख्या ०१०१७ एसी स्पेशल ट्रेन २६ एप्रिल ते २ जूनपर्यंत प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, रविवार असणार आहे. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवरुन रात्री सव्वा दहा वाजता ही गाडी सुटणार आहे.

Mamata Banerjee : अपघातांचे शुक्लकाष्ठ संपेना! ममता बॅनर्जी पुन्हा पडल्या पण थोडक्यात बचावल्या…

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना पुन्हा एकदा दुखापत झाली आहे. ममता बॅनर्जी या हेलिकॉप्टरमध्ये चढताना अडखळून खाली पडल्या. परंतु त्यांच्या अंगरक्षकांनी प्रसंगावधान राखल्याने त्या थोडक्यात बचावल्या.

ममता बॅनर्जी या असनसोल लोकसभा मतदारसंघात प्रचारासाठी जात होत्या. ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरने याठिकाणी जाणार होत्या. दुर्गापूर येथून त्या हेलिकॉप्टरमध्ये बसणार होत्या. हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी असलेला लोखंडी जिना चढून ममता बॅनर्जी आतमध्ये गेल्या. मात्र, हेलिकॉप्टरच्या दारातून आत गेल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा अचानक तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या. सुदैवाने त्यांच्या अंगरक्षकांनी ममता यांना लगेच सावरले. यावेळी ममता बॅनर्जी यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, ममता बॅनर्जी यांनी आपला दौरा रद्द न करता त्या असनसोल मतदारसंघात गेल्या.

काही दिवसांपूर्वीच ममता बॅनर्जी या त्यांच्या निवासस्थानी ट्रेडमिलवर व्यायाम करताना पाय घसरुन पडल्या होत्या. यावेळ त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्या कपाळावर झालेल्या जखमेतून बराच रक्तस्त्राव झाला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ममता बॅनर्जी यांची ही दुखापत पाहून तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते चिंतेत पडले होते. मात्र, प्राथमिक उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले होते.

गेल्या काही काळापासून ममता बॅनर्जी यांच्या पाठिशी अपघातांचे शुक्लकाष्ठ लागले आहे. जानेवारी २०२४ मध्ये त्या प्रवास करत असताना कारचा ब्रेक जोरात लागल्यामुळे ममता बॅनर्जी समोरच्या बाजूला जोरात आपटल्या होत्या. तेव्हाही त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. तर २०२१ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक सुरु असताना ममता बॅनर्जी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तर २०२३ मध्येही त्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. तेव्हादेखील ममता बॅनर्जी यांच्या डाव्या गुडघ्याला आणि पाठीला दुखापत झाली होती.

Onion Exoprt : केंद्र सरकारचा शेतकर्‍यांना दिलासा! अखेर कांद्यावरील निर्यातबंदी उठवली

का करण्यात आली होती निर्यातबंदी?

नवी दिल्ली : कांद्यावरील निर्यातबंदी (Onion Exoprt ban) हा गेल्या अनेक दिवसांपासून वादाचा मुद्दा ठरला होता. केंद्र सरकारने (Central Government) ८ डिसेंबर २०२३ रोजी कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी ३१ मार्च रोजी उठवण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही निर्यातबंदी न उठल्याने शेतकर्‍यांचे (Farmers) प्रचंड नुकसान झाले. अखेर आज केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवल्याची घोषणा करत शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज महायुतीच्या प्रचारासाठी कोल्हापूर येथे सभा घेणार आहेत. तत्पूर्वी केंद्र सरकारकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, ९९ हजार १५० मेट्रीक टन कांदा निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, आता शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होऊन कांद्याला चांगला दर मिळू शकतो. दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील २ हजार मे. टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली होती. त्यावरुन, महाराष्ट्र आणि गुजरात असा वाद रंगला होता. मात्र आता महाराष्ट्रात निर्यातबंदी उठवण्यात आली आहे.

केंद्र सरकारने ६ देशात कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. बांग्लादेश, युएई, भूटान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंकेत भारताचा कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. २ हजार मेट्रीक टन पांढरा कांदा आखाती व काही युरोपियन देशात निर्यात केला जाणार आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला होता. कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण झाल्याचं दिसून आलं.

योग्यवेळी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे : सदाभाऊ खोत

केंद्र सरकारने योग्यवेळी हा निर्णय घेतला आहे. उन्हाळी कांदा अजून शेतात आहे. या निर्णयाचा फायदा महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना होणार आहे. आता कांदा काढायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे मोदी सरकारने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा दिला आहे, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

का करण्यात आली होती निर्यातबंदी?

अल निनोच्या प्रभावामुळे मागील वर्षी पावसाचं प्रमाण कमी राहिलं आहे. यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसंच दुसरं कारण म्हणजे देशातील बाजारात स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा हा सरकारचा उद्देश आहे. किंमतीवर नियंत्रण राहावं यासाठी सरकारने खबरदारी म्हणून कांद्याची निर्यातबंदी केली आहे. मात्र, या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. ४००० रुपये प्रतिक्विंटलवर आलेला दर सध्या ८०० ते १२०० रुपयांच्या दरम्यान आला आहे. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

Nitesh Rane : कोल्हापुरच्या गादीबद्दलचा नियम सातार्‍याला का नाही?

शिवरायांच्या वंशजांविरोधात सातार्‍यात उमेदवार उभा करुन मविआने अपमानच केला!

संजय राऊतांनी पंतप्रधानांवरुन केलेल्या टीकेवर आमदार नितेश राणे यांचा सणसणीत पलटवार

मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज कोल्हापूरमध्ये महायुतीसाठी (Mahayuti) प्रचारसभा आहे. त्यावर ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) ‘पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या गादीचा, छत्रपती घराण्याचा अपमान करु नये. छत्रपती घराण्याच्या विरोधात प्रचार म्हणजे गादीचा अपमान’, असं वक्तव्य केलं. यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. ‘शिवरायांच्या वंशजांविरोधात सातार्‍यात उमेदवार उभा करुन महाविकास आघाडीने त्यांचा अपमानच केला आहे’, अशी सणसणीत टीका नितेश राणे यांनी केली.

नितेश राणे संजय राऊतांना उद्देशून म्हणाले, हाच नियम, हीच भूमिका तुम्ही सातार्‍यात असताना का घेतली नाही? त्या ठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसले उभे आहेत. ती गादी देखील आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. शिवरायांच्या वंशजांच्या विरोधात तुतारीचा उमेदवार का उभा आहे? जो नियम तुम्हाला कोल्हापुरात लावायचा आहे, तोच नियम तुम्ही सातार्‍यातही लावा, असं नितेश राणे म्हणाले.

देशाचे पंतप्रधान मोदी हे उमेदवाराच्या प्रचारासाठी येत असताना देशासाठी त्यांनी काय केलं आणि कोल्हापूरकरांचं त्यांच्यावर किती प्रेम आहे, हे पाहायचं असेल तर संजय राजाराम राऊतला गर्दीमध्ये मी खुर्ची देऊन बसवतो. मग त्याने आमच्या पंतप्रधान मोदींची जादू बघावी. संजय राऊतने याआधी वंशजांचे पुरावे मागितले होते, त्यामुळे त्याच्या तोंडून आमच्या छत्रपती घराण्याच्या बाजूने काहीही ऐकणं हाच मुळात मोठा अपमान आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली. संजय राऊतने आधी माफी मागावी आणि मग छत्रपतींच्या घराण्याबद्दल बोलावं, असंही नितेश राणे म्हणाले.

गुजरातच्या कांद्याची चव मालकाला विचार

गुजरातचा २००० मेट्रिक टन कांदा परदेशात निर्यात करण्यात येणार आहे, मात्र महाराष्ट्राचा कांदा सडवला जातोय, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. यावर नितेश राणे म्हणाले, गुजरातचा कांदा किती गोड आणि चविष्ट आहे हे तू तुझ्या मालकाला विचार. कारण काही आठवड्यांपूर्वी तुझा मालक आणि त्याचं कुटुंब जामनगरला जाऊन कांदाच खाऊन आले आहेत. तेव्हा अंबानींच्या लग्नात गुजरातचा कांदा तुझ्या मालकाला खटकला नाही. म्हणून गुजरातच्या कांद्याची चव मालकाला विचार आणि मग तुझं थोबाड उघड, असं नितेश राणे म्हणाले.