मुंबई : भाजप आमदार रवी राणा यांचा संबंध नसतानाही राज्य सरकारने त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले. अमरावती मनपा आयुक्तांवर शाईफेकीचा घटना घडली तेव्हा रवी राणा दिल्लीत होते. तरीही पोलिसांनी रवी राणा यांच्यावर कलम ३०७ आणि कलम ३५३ सारख्या कठोर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे समर्थन अजिबात होणार नाही, ही घटना अत्यंत चूक आहे. पण गु्न्हेगाराशी संबंध नसताना शिक्षा दिली जात आहे. उद्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काही केले तर मग अजितदादांना फासावर देणार का, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत बोलताना उपस्थित केला.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आगपाखड केली. रवी राणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांना कोणत्या नेत्यांचे फोन गेले? रवी राणा यांच्यावर ३०७ सारखा गंभीर गुन्हा दाखल झाला. तर शाईफेक करणाऱ्यांवर तितके गंभीर गुन्हे दाखल झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांकडून ३०७ चा गैरवापर सुरु आहे. अशाने पोलीस बेछूट होतील. आम्हाला गोंधळ करण्यात काहीही इंटरेस्ट नाही. काही तरी आश्वासन द्या. विधानसभा सदस्यावर अन्याय झाला, काही तरी आश्वासन मिळायला हवं, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.