नवी दिल्ली : आज रशिया-युक्रेन या देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा आज १२ वा दिवस असून या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या चर्चेची आज तिसरी फेरी पार पडणार आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी फोनवरुन तब्बल ३५ मिनिटे संवाद साधला. या चर्चेदरम्यान मोदींनी भारतियांना परत आणण्यासाठी युक्रेनच्या सरकारने केलेल्या मदतीबद्दल आभार देखील मानले.
या चर्चेत सुमीमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये पंतप्रधानांनी युक्रेन सरकारकडून पाठिंबा मागितला आहे. तसेच या दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील बदलत्या परिस्थितीवर चर्चा केली.
तसेच रशियासोबत सुरु असलेले युद्ध लवकरात लवकर थांबवले जावे, यासाठी युक्रेनने पुन्हा एकदा भारताकडे विनंती केली आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधणार आहेत.
दुसरीकडे, आज पुन्हा रशियाने तात्पुरता युद्धविराम घोषित केला आहे. याआधीही रशियाने काही तासांसाठी युद्ध थांबवण्याची घोषणा केली होती.