इंडिया कॉलिंग : सुकृत खांडेकर
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार वरून जरी स्थिर दिसत असले तरी अंतर्गत खदखद आणि भाजपच्या नेत्यांकडून होणारे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप यामुळे हेलकावे खाऊ लागले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तोफांनी महाआघाडी सरकारला घाम फुटला आहे. राणे आणि सोमय्या यांच्या हल्ल्यांना तोंड देण्यातच ठाकरे सरकारची सारी शक्ति खर्च होत आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंधरा फेब्रुवारी रोजी दादर येथील शिवसेनेच्या मुख्यालयात शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर सेना विरूध्द भाजप हा संघर्ष चिघळला असून कोणीही माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाही. आता तर एकमेकांना जेलमध्ये टाकण्याची भाषा या निमित्ताने रोज ऐकायला मिळत आहे.
मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी सरकारचा रिमोट थेट शरद पवारांच्या हाती आहे. दोन वर्षात मुख्यमंत्री जनतेला भेटत नाहीत, लोकप्रतिनिधींशी चर्चा संवाद नाही. राज्यात कुठे दौरे नाहीत, आपले घर सोडत नाहीत अशी त्यांची प्रतिमा झाली आहे. कोविड काळातही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्यात सर्वत्र फिरत होते, राष्ट्रवादीच्या मुख्यालयात मंत्री जनता दरबार घेत होते. शिवसेनेचे मंत्री नेते आपापल्या घरात राहीले. सत्ता असुनही शिवसेना भवन ओस पडलेले असते.
शिवसेनेचा एकच चेहरा लोकांसमोर येतो, तो म्हणजे संजय राऊत. राऊत रोज सकाळी त्यांच्या घरी टीव्ही चॅनेल्सला मुलाखती देतात व त्यावर मराठी चॅनेल्स दिवसभर आपले गुर्हाळ चालवत असतात. शिवसेनेचे नेते, मंत्री, खासदार, पदाधिकारी गेली सव्वादोन वर्षे चि़डीचूप आहेत. कारण एकटेच संजय राऊत बोलत असतात. नारायण राणे, किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशीश शेलार, अतुल भातखळकर, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार अशा नेत्यांकडून रोज महाआघाडी सरकारवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोंपामुळे संजय राऊत वैतागणे स्वाभाविकच आहे. पंधरा फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षाची पत्रकार परिषद, भाजपच्या साडे तीन लोकांची नावे जाहीर करणार, अनिल देशमुख कोठडीतून बाहेर येणार व त्याच कोठडीत हे साडेतीन नेते जाणार अशी त्यांनी दर्पोक्ती केली. पत्रकार परिषदेत पोतडीतून मोठे काही बाहेर काढणार असे त्यांनी वातावरण निर्माण केले. प्रत्यक्षात तासाभराच्या पत्रकार परिषदेतून साधे झुरळ किंवा रंग बदलणारा सरडा सुध्दा बाहेर पडला नाही. मुळात राऊतांनी घेतलेली पत्रकार परिषद हा एक त्यांचा वैयक्तिक इव्हेंट होता. ते आले, त्यांनी भाषण केले व ते निघून गेले. प्रश्न नाहीत आणि उत्तरेही नाहीत. बाहेर शिवसैनिकांची गर्दी होती, ते संजय राऊत आगे बढो, अशा घोषणा देत होते, मग या पत्रकार परिषदेचे नेमके प्रयोजन काय होते ? याच परिषदेत राऊत यांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील ठाकरे कुटुंबियांच्या १९ बंगल्याचा मुद्दा प्रकर्षाने मांडला. किरीट सोमय्या आरोप करतात, तसा एकही बंगला तेथे नाही असा युक्तिवाद त्यांनी केला. मग हा व्यवहार बनामी होता की बेकायदेशीर? ठाकरे कुटुंबियांनी मालमत्ता कर कशाचा भरला होता, हे गूढ आजही कायम आहे.
सेना भवनबाहेर दोन तीन हजार शिवसैनिक जमले होते, ते सारे त्यांना मिळालेल्या आदेशावरून आले होते. नाशिक, पुण्यावरूनही शिवसैनिक आले होते. पक्ष अडचणीत सापडला आहे म्हणून शक्ति प्रदर्शन करायला आले होते का? यांचा जाण्या येण्याचा जेवण खाण्याचा खर्च हा राऊत यांच्या पत्रकार परिषदेसाठी कोणाला तरी करावा लागलाच ना. परिषदेला सेनेचे महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह उदय सामंत, दादा भुसे, गजानन कीर्तिकर, विनायक राऊत, दिवाकर रावते, अरविंद सावंत, राहूल शेवाळे, आनंद अडसूळ असे डझनभर शो पीस म्हणून बसले होते. त्यांनी ब्र सुध्दा काढला नाही किंवा राऊत यांनी या ज्येष्ठांचा साधा उल्लेखही केला नाही. सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, अनिल परब हे पक्षाचे ज्येष्ठ नेते कुठे होते? एकटे राऊत बोलत राहीले व बाकी सारे चूप होते. ही कसली पत्रकार परिषद? किरीट सोमय्यांचा त्यांनी मुलुंडचा दलाल तर मोहित कंम्बोजचा देवेंद्र फडवीसांचा फ्रंट मॅन अशा उल्लेख केला. मुळात पत्रकार परिषदेसाठी सेना भवनवर गर्दी का जमवली गेली? चार दिवसांपूर्वीच महाआघाडीच्यावतीने मी एकटाच बोलत आहे, मी काय बोलण्याचा ठेका घेतला आहे का, असे उदविग्न उदगार त्यांनीच काढले होते. रोज सकाळी महिनाभर बोलत होते, तेच दुपारी त्यांनी एकत्र मुद्दे मांडले. टाईट करू, फिक्स करू, ठिणगी पडेल, हा त्यांचा दलाल, झुकेंगे नही झुकाएंगे, सोमय्या तर इडीचे वसुली एजंट, अमोल काळे कुठे आहे, मोहित कंबोज फडणवीसांना एक दिवस बुडवणार, ठाकरे कुटुंबाचे बंगले दाखवा नाहीतर जोडे खा, महाराष्ट्र गांडूंची अवलाद नाही, केंद्रीय तपास यंत्रणांनी जायचे तिकडे जावे, त्यांची टक्कर शिवसेनेशी आहे, अशा अनेक धमक्या, इशारे त्यांनी दिले. हे सर्व प्रवक्त्याला शोभादायक होते का?
नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी उदगार काढले तेव्हा त्यांना न्यायालयात उभे करण्यासाठी हजारो पोलिसांचा फौज फाटा ठाकरे सरकारने उभा केला. सिंधुदूर्गमधे संजय परब याच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना गोवण्यासाठी पुन्हा साऱी पोलीस यंत्रणा एकवटली. राणे परिवार शांत बसत नाही म्हणून मुंबई महापालिकेकडून त्यांच्या निवासस्थानावर पाहणी करण्याची नोटीस चिकटवली. राणे यांच्या मुंबईतील जुहू येथील ‘अधिश’ निवासस्थानासंबंधी कोणातरी आरटीआय कार्यकर्त्याने तक्रार केली म्हणून मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तिथे काही बेकायदा सापडते का म्हणून पाहणी केली. दिशा सॅलियनच्या मृत्यूचे गूढ काय, असा प्रश्न राणे यांनी विचारताच शिवसेनेची धावाधाव सुरू झाली. आता राणेंबरोबर किरीट सोमय्या हेही रडारवर आहेत.
मातोश्रीवरील चौघांसाठी इडीची नोटीस तयार आहे व सुशांत सिंग राजपूत व दिशा सॅलियन यांची आत्महत्या नव्हे हत्याच आहे, असे वक्तव्य नारायण राणे यांनी दिल्लीतून करताच शिवसेनेत कल्लोळ माजला. यावेळी मात्र संजय राऊत यांनी किशोरी पेडणेकर व विनायक राऊत यांना शेजारी बसवून पत्रकार परिषद घेतली. राणे शिवसेनेत व काँग्रेसमधे असताना काय बोलायचे याचे व्हिडिओ दाखवून त्यांना समाधान मिळत असेल पण शिवसेनेला काय लाभ मिळणार? ही तर मनसेची कॅापी झाली.
आम्ही तुम्हाला उघडे केल्याशिवाय राहणार नाही, हे महाराष्ट्र सरकार आहे, आमच्या हातात बरेच काही आहे, भाजपने नौटंकी बंद करावी, सीबीआय – इडीला आम्ही घाबरत नाही, रिश्ते मे तो हम तुम्हारे बाप है…. अशी धमकी संजय राऊत यांनी दिली आहे. भाजप आणि तपास यंत्रणांना ते अंगावर ओढवून घेत आहेत… महाआघाडीचा तोल ढळल्याचे हे लक्षण आहे.