Sunday, July 21, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यविवाहबाह्यसंबंध आणि महिलांचे आर्थिक नुकसान!

विवाहबाह्यसंबंध आणि महिलांचे आर्थिक नुकसान!

मीनाक्षी जगदाळे

मागील लेखात आपण ‘महिलांनो ठेवलेली म्हणून राहू नका’ या शीर्षकाखाली एका सत्यघटनेचे उदाहरण देऊन महिलांना प्रबोधन केले. या लेखामार्फत आपण एका सत्यघटनेतून महिलांना समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहोत की, कोणत्याही विवाहित पुरुषाशी संबंध प्रस्थापित करताना स्वतःचे अवमूल्यन, अपमान, आर्थिक नुकसान करून घेऊ नका. ज्या संबंधांना समाजमान्यता नाही त्यात गुंतण्याआधी विचार करा. आपले हक्काचे घर, हक्काचा नवरा सोडून भलत्याच्या नादाला लागून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका.

संगीता (काल्पनिक नाव) हिनेदेखील असेच एका विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडून स्वतःचे किती मोठ्या प्रमाणात प्रापंचिक आणि आर्थिक नुकसान स्वतःच्या हाताने करून घेतले हेच या लेखात आपण सांगणार आहोत. संगीता उच्चशिक्षित, चांगल्या पदावर, चांगल्या पगारावर नोकरी करणारी, दोन मुलं असणारी महिला. तिचा पतीदेखील अतिशय उच्चपदस्थ, मोठ्या पगाराची नोकरी करणारा आणि गाडी, बंगला सर्व सुखसोयींनी युक्त अशी जीवनशैली जगणारा आणि बायको-मुलांना देखील तसेच ठेवणारा. संगीताला नोकरीव्यतिरिक्त देखील विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी होण्याची खूप आवड होती. अशाच एका सामाजिक उपक्रमामार्फत तिची ओळख मोहन (काल्पनिक नाव) या व्यक्तीशी झाली. मोहनचे प्रभावी व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट भाषाशैली, दुसऱ्यावर छाप मारण्याची कला यामुळे संगीता मोहनकडे आकर्षित झाली आणि त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन दोघेही एकत्र येत गेले. संगीताच्या नवऱ्याला याची खबर लागायला काही जास्त वेळ लागला नाही. संगीताच्या नवऱ्यामध्ये आणि तिच्यामध्ये बऱ्यापैकी वाद आणि भांडणे मोहनमुळे होऊ लागली होती. कारण मोहन तिला सातत्याने उशिरापर्यंत कामाच्या निमित्ताने, कार्यक्रमांच्या निमित्ताने ऑफिसमध्ये थांबवू लागला. सततचे परगावी दौरे, मिटिंग, विविध उपक्रमांच्या निमित्ताने संगीताचे बाहेर राहणे वाढले आणि संसाराकडे, मुलांकडे बरेच दुर्लक्ष होऊ लागले होते. सातत्याने मोहनचे संगीताला स्वतःच्या ऑफिसला थांबवणे, त्यामुळे तिला घरी जायला उशीर होणे, यामुळे तिच्या पतीसोबतची भांडणदेखील विकोपाला गेली होती.

समुपदेशनच्या दरम्यान संगीता सांगत होती की, मोहनने विविध कारणे सांगून सातत्याने तिच्याकडून आर्थिक साहाय्य आणि मदत मागितली होती. मोहनच्या व्यावसायिक उपक्रमात संगीताने आवड दाखवल्यामुळे, सक्रिय सहभाग दिल्यामुळे त्यांचे प्रेमप्रकरणासोबतच व्यावसायिक संबंधदेखील निर्माण झालेले होतेच. मोहन सतत चुकीचे आर्थिक व्यवहार करतोय आणि अडचणीत आल्यावर मला प्रेमात घेऊन, भावनिक करून पैसे मागतोय. नाही म्हटल्यास अबोला धरतो आणि मला ते सहन होत नाही, असे संगीताचे म्हणणे होते. त्याच्या या सवयीला आता संगीता पूर्ण वैतागून गेली होती. संगीताने तब्बल वीस-पंचवीस लाख रुपये विविध प्रयत्न करून, व्याजाने घेऊन, सोनं गहाण ठेऊन, कर्ज काढून मोहनला आजपर्यंत पुरविले होते. पैशाचा विषय काढल्यावर, पैसे परत मागितल्यावर मोहन संगीताला सतत टाळत असायचा. तीन-चार वर्षं सातत्याने एकमेकांना भेटणे, एकत्रित वेळ घालवणे, एकत्र व्यवसाय करणे, गावोगावी फिरणे यातूनसुद्धा मोहनला नीट ओळखणे संगीताला शक्य झाले नव्हते. हळूहळू तिच्या लक्षात आले की मोहनवर कर्जाचा खूप मोठा डोंगर आहे. मोहनने अनेकांकडून अशा पद्धतीने पैसे घेतलेले आहेत आणि कोणालाही परत केलेले नाहीत. मोहनवर पैशांची फसवणूक करण्याबाबत अनेक तक्रारी आहेत ही माहितीसुद्धा संगीताला मिळाली. इकडून तिकडून पैसे घेऊन उधळपट्टी करणे, मौज- मजा करणे हीच मोहनची जीवनशैली होती. हे सर्व सुरू असतानाच संगीताच्या पतीला तिच्या मोहनसोबतच्या प्रेम प्रकरणाबाबत अनेक सबळ पुरावे हाती लागल्याने त्याने तिला घराबाहेर काढले होते आणि मुलेसुद्धा आईच्या प्रेमापोटी घराबाहेर पडली होती. स्वतःच्या मालकीचा मोठा बंगला उच्चभ्रू वस्तीत असतानादेखील आता संगीता छोटे, साधे भाड्याने घर घेऊन स्वतःची नोकरी सांभाळून दोन मुलांसोबत राहत होती. तरीही संगीता अजून मोहनमध्ये गुंतलेलीच होती. आज न उद्या त्याची परिस्थिती बदलेल, तो नीट वागेल आणि कायमस्वरूपी आपण त्याला आर्थिक, भावनिक साथ दिली याची जाणीव ठेऊन, आपल्या प्रेमाखातर निदान पतीपासून विभक्त झाल्यावर तरी मोहन आपल्याला आयुष्यभर सांभाळून घेईल, याच भ्रमात ती होती.

मोहनचा आजपर्यंत अनुभव येऊनदेखील संगीता मोहनशी झालेल्या गुंतवणुकीमधून बाहेर पडू शकत नव्हती. आर्थिक व्यवहारांचा विषय काढल्यावर मोहन तिला टाळणे, तिचा फोन न घेणे, तिला व्यावसायिक उपक्रमांतून बाजूला ठेवणे, तिला अपमानित करणे अशा प्रकारे वागवत होता. संगीताच्या नवऱ्याने एव्हाना तिला कायदेशीर घटस्फोटाची नोटीस पाठवून दिलेली होती आणि तिला परत घरात घेऊन स्वीकारण्याची मानसिकता तर अजिबातच तिच्या नवऱ्याची नव्हती. अशा परिस्थितीत संगीताला मोहनशिवाय आता आपल्याला काहीच पर्याय नाही, असेच वाटत होते. त्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीमध्ये मोहनला सोडायला किंवा झाले ते नुकसान बास झाले असे समजून थांबायला तयार नव्हती.

मोहन विवाहित होता. त्याला मुलं होती; परंतु त्याची पत्नीदेखील त्याच्या सततच्या चुकीच्या आर्थिक व्यवहारांना कंटाळून, उधाऱ्या, कर्ज, देणेदारीला वैतागून मुलांसह माहेरी राहत होती. अर्थातच तिने मोहनला कायदेशीर घटस्फोट दिलेला नव्हता. मुलांसाठी, मुलांना वडिलांपासून तोडायचं नाही म्हणून तिने लांब राहून पण मोहनशी चांगले संबंध ठेवलेले होते. मोहनचे कुटुंबीय देखील मोहनच्या बायकोशी, तिच्या माहेरी चांगले संबंध ठेऊन होते. एकमेकांना भेटणे, बोलणे, एकमेकांसोबत वेळ घालवणे, बायको, मुलांची आर्थिक जबाबदारी घेणे यात मोहन अजिबात मागे नव्हता. विशेष म्हणजे हे सर्व संगीताला सुरुवातीपासून माहिती होते. मोहनने याबद्दल काहीही तिच्यापासून लपविलेले नव्हते.

संगीता जेव्हा समुपदेशनला आली तेव्हा ती पूर्णतः सैरभैर झालेली होती. कारण मोहनने राहते शहर सोडून दुसऱ्या शहरात कायमस्वरूपी स्थलांतर केले होते. ज्या संगीताने त्याच्यासाठी स्वतःचा संसार मोडला, लाखो रुपयांचे नुकसान करून घेतले, स्वतःच हक्काचं घर सोडून जी भाड्याने घर घेऊन राहू लागली. तिला सोडून मोहन सरळ दुसऱ्या गावी स्थायिक झाला होता. तरी तिच्यासाठी एक आशेचा किरण होता की, मोहनने तिला स्वतःचा पत्ता दिलेला होता आणि तो फोनवर तिच्याशी संपर्क ठेवून होता. निदान तो कायमस्वरूपी तिला तोडून, सोडून पळून गेलेला नव्हता.

या परिस्थितीतसुद्धा हार न मानता, स्वतःच्या नवऱ्याने टाकलेली कायदेशीर केस लढत असताना, स्वतःची नोकरी सांभाळून, मुलांना सांभाळून माहेरचा बराचसा आधार असल्याने मनोधैर्य खचू न देता, संगीता मोहनला भेटायला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तेव्हा जात होती. अजूनही मोहन तिचे पैसे थोड्या फार प्रमाणात परत द्यायचे नाव घेत नव्हता. मोहनने मोठ्या प्रमाणात वडिलोपार्जित मालमत्ता विकल्याचे संगीताला समजले आणि तिला अजून एक धक्का बसला. आता तरी थोडे फार पैसे परत देण्यासाठी मोहनला विनंती केली. तिने पैशाचा विषय काढला की मोहन तिला टाळणे सुरू करायचा. मला इतर बरेच कर्ज फेडायचं आहे तुझे पैसे इतक्यात देणे शक्य नाही, तूच मला समजून घेऊ शकते, अशा वल्गना करून तो संगीताला गप्प करीत असे.

दुसऱ्या शहरात राहायला गेल्यामुळे असेही त्याने संगीताशी संपर्क हळूहळू खूपच कमी केला होता. तरीही संगीताने मोहनविषयी चांगली भावना ठेवली होती. मोहन स्वतः तिला भेटायला कधीच येत नव्हता. पण संगीताला राहावले जात नसल्याने ती मात्र तो बोलावो अथवा न बोलावो जसे जमेल, जेव्हा जमेल, तेव्हा सुट्ट्या टाकून धावपळ करून त्याला भेटायला जात होती. अनेकदा भेटायला गेल्यावर मोहन तिला टाळायचा, तिला वेळ न देणे किंवा स्वतः खूप कामात असल्याचे दाखवणे अशी वागणूक संगीताला मिळत होती.

मोहन नवीन शहरात त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांसोबत अतिशय उच्च जीवनशैली जगत होता. स्वतःवर, इतरांवर भरपूर पैसा खर्च करीत होता; परंतु संगीताला एक रुपया देण्याची पण त्याची दानत होत नव्हती.

हेसुद्धा सगळं स्वीकारून संगीता त्याला दूर करीत नव्हती, कारण तिचे म्हणणे होते मी खरे प्रेम केले आहे. समुपदेशनाला संगीता जी समस्या घेऊन आली होती, ती मात्र या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तिच्या सहनशक्तीचा अंत बघणारी होती. नवीन शहरात नवीन घरासोबतच, नवीन सोयी-सुविधांसोबतच मोहनने नवीन प्रेमप्रकरण केलेले संगीताने पाहिलं होत. राजरोसपणे मोहनने त्या नवीन मैत्रिणीला स्वतःच्या घरात प्रवेश देऊन जणू नवीन संसारच थाटलेला होता. एकदा-दोनदा नाही, तर महिनोन्महिने संगीताने हे नवीन प्रेमप्रकरण बंद कर, आपण एकत्र राहू, मी सगळी साथ देईल, मी आजपर्यंत खूप त्याग केला, असे वागू नकोस, माझे आर्थिक व्यवहार तरी मिटवून दे, याबद्दल मोहनला कळकळीची विनंती करत होती. तरीही मोहन तिच्यासमोर कोणतीही मर्यादा, तमा न बाळगता तिच्या भावनांना थोडीही किंमत न देता त्याच नवीन प्रेमप्रकरण बिनदिक्कत सुरू ठेवून होता. संगीता जेव्हा जेव्हा मोहनला भेटायला जात असे, तेव्हा तेव्हा तिच्यासमोर नवीन मैत्रिणीशी अधिक सलगी करणे, अतिप्रेमाने वागणे, संगीताला कमी लेखणे यासारखे प्रकार मोहन वारंवार करीत होता.

आता संगीता अशा वळणावर उभी होती, जिथे तिचा हक्काचा संसार तुटल्यात जमा होता. तिचे वीस-पंचवीस लाखांचे नुकसान झालेले होते. सोने-नाणे शिल्लक राहिलेले नव्हते, ज्यांच्याकडून व्याजाने पैसे घेऊन मोहनला दिले ते तगादा लावत होते. राहायला स्वतःच घर नव्हतं. तसेच सर्वात महत्त्वाचे ज्याच्यासाठी हे सर्व ती गमावून बसली होती. त्याने तिची साथ सोडून दुसऱ्याच महिलेला आयुष्यात स्थान दिले होते. या सर्व झालेल्या हानीसाठी संगीता कुठेही दाद मागू शकत नव्हती. फक्त स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करण्यासाठी समुपदेशनला आलेली होती.
meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -