Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमी‘संजय राऊतांमुळे मुख्यमंत्री अडचणीत येणार’

‘संजय राऊतांमुळे मुख्यमंत्री अडचणीत येणार’

राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

राहाता : उठसूठ रोज भाजप नेत्यांना लक्ष करुन आरोप करण्यापेक्षा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मागील अडीच वर्षात आघाडी सरकारने राज्यासाठी काय दिवे लावले, हे एकदा तरी सांगितले पाहिजे. आघाडी सरकारची वकीली करताना त्यांचे फक्त आरोपसत्र सुरु आहेत. यामुळे आता थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने मुख्यमंत्री अडचणीत येणार असल्याकडे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष वेधले.

भाजप नेत्यांवर आरोप करणाऱ्या राऊतांना कोणीही आता गांभिर्याने घेत नाही. स्वत:च्या पक्षासह आघाडीमध्ये ते एकटे पडले. वाईन उद्योगातील भागीदारी उघड झाली. आता पत्राचाळीतील आर्थिक गैरव्यवहारावरून निकटवर्तीयांवर झालेल्या कारवाईमुळेच त्यांची आगपाखड सुरू आहे. खोट बोल पण रेटून बोल स्वभावामुळेच त्यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या अडचणी वाढत चालल्या असल्याचे आमदार विखे पाटील म्हणाले.

रोज वेगवेगळी वक्‍तव्य करणारे राऊत आघाडीमध्येही एकटे पडल्याचे दिसते. त्यामुळेच त्यांना आता सेनाभवनाचा आधार घ्यावा लागल्याचा टोला लगावून वाईन कंपनीत असलेली त्यांची भागीदारी राज्यासमोर आली. पत्राचाळीच्या आर्थिक गैरव्यवहारात त्यांच्या निकटवर्तीयांवर झालेली कारवाई राजकीय हेतूने असल्याचे दाखविण्यासाठी रोज माध्यमांसमोर येवून राऊत आगपाखड करीत असल्याची टीका विखे पाटील यांनी केली.

भाजप नेत्यांच्या घरापुढे काँग्रेसची सुरु असलेली आंदोलने म्हणजे पक्षाची झालेली केविलवाणी अवस्था आहे. सत्तेत राहुन काँग्रेसला कोणी विचारत नाही. सत्तेसाठी एखाद्या पक्षाने किती लाचारी पत्करावी याचे आश्‍चर्य वाटते. दोन चार मंत्रीपद मिळाली म्हणून पक्षाने सर्व तत्वांशीच तडजोड केली.

एकीकडे उत्तरप्रदेशच्या निवडणुकांमध्ये वेगळी भूमिका घ्यायची, राज्यात शिवसेनेबरोबर मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचे. काँग्रेसचा राजकीय प्रवास कोणत्या दिशेला चाललाय याचे तरी भान पक्षाच्या नेत्यांना राहीले आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता राजकारणातील प्रदूषण आम्ही रोखले असा टोला लगावला होता. त्यावर आ. विखे पाटील म्हणाले की मंत्री ठाकरे अजुन खूप नवीन आहेत. आघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे असंतुलन खोलवर रुजत चालले आहे ते प्रथम त्यांनी कमी केले पाहिजे. या भ्रष्टाचाराचे झरे, प्रवाह कुठपर्यंत पोहोचत आहेत. हे राज्यातील जनता रोज पाहात आहे. भ्रष्टाचाराचे प्रदूषण कमी करण्याचा सल्ला देतानाच आधी स्वतःच्या घरात डोकावून पाहण्याची आवश्‍यकता असल्याचे ते म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -