वाघोली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना काळात सर्व काही दिले. अगदी मास्क पासून लस ही मोदींनीच दिली. उद्योगांना पाठबळ ही मोदींनीच दिला. राज्य सरकारला साधे परराज्यातील कामगारांना इथे रहा असा विश्वासही देता आला नाही. यामुळेच कामगार आपल्या राज्यात परतले. यामुळे कुणी कितीही टीका केली तरी मोदींचे वक्तव्य चुकीचे नाही. असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पंतप्रधान मोदींनी लोकसभेत सोमवारी काँग्रेस वर केलेल्या टिकेनंतर त्यांच्यावरही टीका होऊ लागली आहे. याबाबत पाटील यांना विचारले. ते पुढे म्हणाले, राज्यात परप्रांतीय कामगारांना राज्य सरकारने विश्वास दिला असता तर कामगार आपल्या राज्यात परतले नसते. ते तिकडे परतल्यामुळे तिकडे कोरोना वाढला. आत्ता टीका करणारे बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, संजय राऊत कुठे होते. ते कोरोना काळात लपून बसले होते. फक्त भाजप रस्त्यावर होता. रेल्वे जरी केंद्राने पाठविल्या तरी त्या मोकळ्या जाऊन द्यायच्या होत्या. तुमच्या दबावामुळे त्या पाठवाव्या लागल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नऊ हजार कोटींचा चेक लस विकत घेऊ म्हणून फडकविला. कुठे गेला तो चेक. लस तर मोदींनीच दिल्या.
यापुढेही लसीकरण मोदीच करतील. चांगल्याना थोपाटणे हा मोदींचा गुण आहे. म्हणून त्यांनी शरद पवार यांची स्तुती केली असेल. मोदींचा हा गुण तुम्ही घेतला पाहिजे. सर्व काही मोदीच देत आहेत. राज्य सरकारने काय दिले त्याची श्वेत पत्रिका जाहीर करावी.
ओबीसी आरक्षण मुद्यावरही त्यांनी भाष्य केले. विधानसभेत व विधान परिषदेत जरी आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी सुप्रीम कोर्ट काय निकाल देते ते महत्वाचे आहे. निवडणुकीत आरक्षण असावे हे मलाही मान्य आहे. पुणे महापालीका निवडणुकीवर त्यांना विचारले असता, ते म्हणाले, राष्ट्रवादीने आपल्या फायद्याची प्रभागरचना केली आहे अशी चर्चा असली तरी मतदार तेच आहेत. यामुळे कुठलीही फोडाफोडी होणार नाही. भाजप 100 पेक्षा अधिक जागा महापालीकेत मिळवेल. असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.