पुणे (हिं.स.) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत असणाऱ्या शांतीश्री पंडित गेल्या पाच वर्षांत एक हजाराहून अधिक दिवस म्हणजे जवळपास तीन वर्षे विना वेतन रजेवर असताना त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच पंडित यांच्या नियुक्तीची चौकशी करावी, अशी तक्रार नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे.
विद्यापीठाच्या कुलगुरू पदी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती केली जाते. परंतु, गेल्या काही वर्षांपासून रजेवर असणाऱ्या शांतीश्री पंडित यांनी शिक्षण क्षेत्रासाठी कोणते योगदान दिले, असा प्रश्न माजी अधिसभा सदस्यांकडून उपस्थित केला जात आहे.
तसेच उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशाने दिलेल्या अहवालानुसार पंडित यांच्यावर पाच वेतनवाढी रोखण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे अशा वादग्रस्त व्यक्तीची जेएनयुसारख्या नामांकित विद्यापीठाच्या कुलगुरू पदी नियुक्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.