Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाजजिंदगी कैसी है पहेली हाये...

जिंदगी कैसी है पहेली हाये…

नॉस्टेल्जिया : श्रीनिवास बेलसरे

सिने पत्रकार अनुपमा चोपडा यांनी २०१३ साली लिहिलेल्या एका पुस्तकाचे नाव होते, “मरण्यापूर्वी हे १०० चित्रपट पाहाच.” (100 films to see before you die.) यात हृषिकेश मुखर्जीं दिग्दर्शित ‘आनंद’चा गौरवपूर्ण उल्लेख आहे. ‘आनंद’ला मिळालेल्या अनेक पुरस्कारांत ‘फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारचा (१९७२) समावेश होता. राजेश खन्ना आणि अमिताभ यांनी केवळ दोन सिनेमांत एकत्र काम केले. ‘आनंद’(१९७१) आणि ‘नमकहराम’(१९७३). दोन्हीचे दिग्दर्शक हृषिदाच होते. सहकलाकार रमेश देव, सीमा, जॉनी वॉकरसुद्धा कायमचे लक्षात राहतात. कारण आनंद केवळ एक कथानक नव्हते, तो एक भयंकर अनुभव होता!

रक्ताच्या कर्करोगाने आजारी पडलेला राजेश खन्ना डॉ. प्रकाश कुलकर्णीकडे (रमेश देव) उपचार घेत असतो. डॉ. कुलकर्णी पूर्णत: व्यावसायिक डॉक्टर. मात्र त्यांचा मित्र डॉ. भास्करने (अमिताभ) हा पेशा गोरगरिबांच्या सेवेसाठी निवडलाय. गरीब रुग्णांचे या रोगातील हाल, कुटुंबांची अपरिहार्य वाताहत पाहून अमिताभ अस्वस्थ आहे.

डॉ. कुलकर्णी आनंदची ओळख भास्करशी करून देतात आणि आनंदच्या लाघवी स्वभावामुळे दोघे चांगले मित्र बनतात. हातात केवळ ६ महिनेच आहेत, हे माहीत असलेला आनंद जीवनाकडे निराशेने बघण्याचे जाणीवपूर्वक टाळतोय, उलट अत्यंत आशावादी राहून जाता-जाता इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. अमिताभला मात्र स्वत:च्या अगतिकतेमुळे आनंदचे हे स्वत:बाबतचे सत्य नाकारून सतत हसणे-खिदळणे, लोकांत मिसळणे असह्य होते.

शेवटी त्याच्या मृत्यूनंतर अमिताभ डायरीतील आनंदबद्दलच्या नोंदीचेच एक पुस्तक प्रकाशित करतो. त्याला पारितोषिक मिळते. त्या सोहळ्यातील अमिताभच्या भाषणानेच सिनेमा सुरू होतो.

आपण डॉक्टर असूनही काहीच करू शकत नसल्याने तो अस्वस्थ आहे. तो म्हणतो, “मै रोगसे लड सकता था, लेकीन भूख और गरिबीसे कैसे लडता? जिस जंग के लिये मैं मैदान में उतरा था, उसके हथियारही मेरे पास नहीं थे…”

सिनेमातील प्रत्येक गाणे आपल्याला अस्वस्थ करते. हा सिनेमा आपल्याला अनेकदा ढसढसा रडवल्याशिवाय राहत नाही. पण हे रडणे वेगळेच असते. वेदनादायी असले तरी ते प्रेक्षकांना चिंतनशील बनवते. प्रथमच आयुष्याबद्दल गंभीर विचार करायला लावते. जीवनाबद्दलचा अतिशय वेगळा दृष्टिकोन देऊन जाते!

जीवनाची एकंदर गुंतागुंत, माणसाच्या अस्वस्थ करणाऱ्या मर्यादा, त्यांच्या जाणिवेने मनात उठणारा भावनांचा कल्लोळ या सगळ्यांतून गेल्याने प्रेक्षक सिनेमागृहातून बाहेर पडतो, तो एक वेगळाच माणूस बनून! भलेही हे वेगळेपण प्रत्येकासाठी कमी-अधिक वेळाने संपते. पण ‘आनंद’ तुम्हाला आमूलाग्र बदलवून टाकतो, हे नक्की! हा सिनेमा प्रत्येक डॉक्टरने पाहिलाच पाहिजे, असा आहे. अनुपमा चोप्रा यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘मरण्यापूर्वी एकदा पाहावाच’ असा हा सिनेमा नाही, तो जगतानाच सर्वांनी १०० वेळा पाहावा असा आहे!

आपले क्षणाक्षणाला संपत चाललेले आयुष्य आनंदाने घालवण्याची राजेशची धडपड सुरू आहे. त्याच्या मनात जे प्रश्न येतात, जे चिंतन सुरू असते तेच योगेश यांनी एका गाण्यात साकारले. मन्नाडेंचा भारदस्त आवाज, सलीलदांचे भावस्पर्शी संगीत आणि पार्श्वभूमी म्हणून निवडलेला अथांग समुद्र आणि निळेभोर आकाश! सगळा कहरच! मरताना केलेला जीवनाबद्दलचा विचार, जणू परमेश्वराला विचारलेले निरागस प्रश्न… हे सगळे दाखवायला हृषिदांनी निवडलेली ही पार्श्वभूमी जबरदस्त होती.

आनंद जणू देवालाच विचारतोय, ‘क्षणात हसवून कायमचे रडायला लावणारा हा कसला रे तुझा जीवघेणा खेळ?’ तोच प्रश्न अमिताभच्या मनातही सलतोय. तोच शैलेन्द्रनेही एकदा विचारला होता, ‘गुपचूप तमाशा देखे, वाह रे तेरी खुदाई, काहेको दुनिया बनाई?’ गाणे ऐकताना हे सगळे आपल्या मनात दाटून येते –

ज़िन्दगी कैसी है पहेली, हाय…
कभी तो हँसाए, कभी ये रुलाये…

खरे तर, आनंदची काही तक्रार नाही. त्याने प्रत्येकाशी प्रेमाने वागून स्वत:चे एक विश्व उभे केलेय. आयुष्य कधीही संपेल म्हणून निरपेक्ष प्रेमाचा वर्षाव करत अतूट नाती निर्माण केलीयेत. आता ती कायमची संपणार ही जाणीव त्याला पोखरतेय. तो म्हणतो, मन या निद्रेतून उठायला तयार नाही, जगण्याच्या या स्वप्नातच गुंग राहावेसे वाटतेय. बिचारा स्वत:शीच विचार करतोय. देवाला हडसून खडसून विचारावेत, असे त्याचे प्रश्न! पण योगेश यांनी कोणताच आक्रस्ताळेपणा येऊ न दिल्याने, ते शब्द मनाला बोचतात, जिव्हारी लागतात!

कभी देखो मन नहीं जागे…
पीछे-पीछे सपनोंके भागे…
एक दिन सपनोंका राही,
चला जाये सपनोंसे आगे, कहाँ?
ज़िन्दगी कैसी है पहेली…

आनंदचा प्रश्न त्याचा एकट्याचा नाही! तो प्रत्येकाचाच आहे. आकाशपाताळ एक करून माणूस कष्टाने आपले विश्व उभे करतो आणि त्याला सगळे सोडून अचानक निघून जावे लागते, ही जीवनाची रचनाच किती भयंकर आहे!

जिन्होंने सजाये यहाँ मेले,
सुख-दुःख संग-संग झेले,
वही चुनकर खामोशी,
यूँ चले जाएँ अकेले कहाँ…?
ज़िन्दगी…

सिनेमाच्या शेवटी अमिताभच्या आवाजात एक वाक्य येते, ‘आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं..!’ केवढे विलक्षण भाष्य! आपल्या पहाडासारख्या उंच कलाकारांनी निर्माण करून ठेवलेल्या अशा अक्षय आनंदाची आठवण ताजी राहावी म्हणून तर हा नॉस्टॅल्जिया!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -