मुंबई : अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील ‘जलसा’ बंगल्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांच्या घरातील एकूण ३१ कर्मचाऱ्यांची रविवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यापैकी एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
त्याचवेळी अमिताभ बच्चन यांनी ‘जलसा’ला कोरोनाचा फटका बसल्याची बातमी त्यांच्या अधिकृत ब्लॉगद्वारे दिली आहे. तथापि, त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये याची पुष्टी केली नाही की, जलसामधील कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या ब्लॉगमध्ये अमिताभ यांनी लिहिले की, ‘मी सध्या घरगुती कोरोना परिस्थितीशी झगडत आहे. मी नंतर तुमच्या भेटीला येईन…’
अमिताभ यांनी मध्यरात्री हा ब्लॉग लिहिला. या ब्लॉग पोस्टनंतर अमिताभ यांनी आणखी एक ब्लॉग लिहिला आहे. त्यात ते म्हणाले की, ते लढत आहेत आणि लढत राहतील, तेही सर्वांच्या प्रार्थनेने. अमिताभ यांनी लिहिले की, ‘लढा, लढत राहणार… प्रत्येकाच्या प्रार्थनेने… पुढे काही नाही… अधिक तपशील नाही… फक्त शो सुरू आहे.’ या ब्लॉगसोबतच अमिताभ यांनी त्यांच्या नव्या लढाईबद्दल एक कविताही लिहिली आहे.
अमिताभ यांनाही झाली होतो कोरोनाची लागण!
अमिताभ बच्चन यांनी कोरोनाचा प्रभाव अगदी जवळून पाहिला आहे. २०२० मध्ये, अमिताभ बच्चन स्वतः कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. कोरोनामुळे अमिताभ अनेक दिवस रुग्णालयात दाखल होते. मात्र, हॉस्पिटलमधूनच त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क ठेवला होता.
फक्त अमिताभ बच्चनच नाही तर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. अमिताभ आणि अभिषेक पॉझिटिव्ह आल्यानंतरच संपूर्ण कुटुंबाची कोरोना चाचणी झाली, त्यापैकी ऐश्वर्या आणि आराध्या पॉझिटिव्ह आल्या आणि श्वेता, जया बच्चन आणि अगस्त्या यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता.