मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांची घटणारी संख्या तसेच लसीकरणाच्या वाढत्या प्रमाणामुळे पर्यटन क्षेत्रावरील अनिश्चिततेचे सावट दूर होत असतानाच ओमायक्रॉन या नव्या विषाणूच्या आगमनाने सगळ्यांनाच धक्का दिला आहे. ओमायक्रॉनबद्दल सतत उपलब्ध होणारी उलटसुलट माहिती आणि त्यानुसार बदलणाऱ्या राज्यांच्या तसेच देशांच्या प्रवासविषयक नियमांमुळे पर्यटकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतात वाढणारी ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या आणि तज्ज्ञांनी दिलेला तिसऱ्या लाटेचा इशारा या पार्श्वभूमीवर नाताळ तसेच नूतन वर्षानिमित्ताने आखलेल्या पर्यटनाच्या बेतांचे काय करावे?, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. याच कारणामुळे पर्यटक बुकिंग्ज मोठ्या प्रमाणावर रद्द करत असल्याचे दिसून येत आहे.
२०२० मध्ये कोरोनाच्या फैलावानंतर हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. या क्षेत्राला २० ते २५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला होता. मात्र २०२१ च्या अखेरपासून पुन्हा चांगले दिवस येण्याच्या अपेक्षेत असणारे हे क्षेत्र ओमायक्रॉनच्या दशहतीखाली आले आहे. ओमायक्रॉनच्या भीतीमुळे डिसेंबर तसेच जानेवारी महिन्यातल्या पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याची भीती वर्तवली जात असून ५० टक्के पर्यटक बुकिंग रद्द करत असल्याचे पर्यटन संस्थांचे म्हणणे आहे.
चेन्नईतल्या मदुरा ट्रॅव्हल्स सर्विसेसचे व्यवस्थापक श्रीधरन बालन यांच्या म्हणण्यानुसार मागील काही दिवसांपासून विविध पर्यटन संस्थाकडून करण्यात आलेले जवळपास २० टक्के बुकिंग रद्द झाले आहे. त्यातही अनेकांनी दुबई, अमेरिका आणि युरोपमधल्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध राज्यांनीही ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पर्यटनविषयक नियमावली जाहीर केल्यामुळे देशी पर्यटनावरही या सगळ्याचा परिणाम दिसून येत आहे.
१५ डिसेंबर ते ५ जानेवारी हा काळ पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने सुगीचा मानला जातो. या काळात पर्यटक मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी निघतात. मात्र यंदा ओमायक्रॉनचे परिणाम या क्षेत्रावर जाणवत आहेत.
म्हैसूर जिल्हा हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी. नारायण गौडा म्हैसूरमधली परिस्थिती कथन करतात. ते सांगतात, गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये अंदाजे ३० टक्के अॅडव्हान्स बुकिंग्ज रद्द करण्यात आली आहेत. तसेच या काळात म्हैसूरला येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत ५० टक्क्यांची घट झाली आहे. ओमायक्रॉनबद्दल काहीच स्पष्ट होत नसल्यामुळे लोकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून आम्ही लोकांना न घाबरण्याचे आव्हान केले आहे.
म्हैसूर ट्रॅव्हल्स असोसिएशनचे मानद अध्यक्ष बी. एस. प्रशांतही गौडा यांचीच री ओढतात. ओमायक्रॉनच्या दहशतीमुळे परदेशी जाणारे पर्यटक बुकिंग्ज रद्द करत असल्याचे ते सांगतात. दरम्यान, कूर्गमधल्या पर्यटनावर ओमायक्रॉनचा सध्या तरी कोणताच परिणाम दिसून येत नसून पर्यटक इथे येण्यास उत्सुक आहेत. मात्र आमच्याकडे नियमांबाबत मोठ्या प्रमाणावर चौकशी होत असल्याचे कूर्ग होम स्टे असोसिएशनचे बी. जी. अनंतशयना सांगतात.