Thursday, July 3, 2025

बाधित प्रवाशांच्या संपर्कातील ३१४ जण निगेटिव्ह

मुंबई/ नागपूर : मुंबईत परदेशातून आल्यानंतर कोरोनाबाधित ठरलेल्या एकूण २९ जणांच्या संपर्कात आलेल्या ३१४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मुंबईत आढळलेल्या ओमायक्रॉन रुग्णाच्या निकट संपर्कातील कुणालाही विषाणूची लागण झालेली नाही. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.


देशभरानंतर मुंबईतही ओमायक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका सतर्क झाली आहे. खबरदारी म्हणून पालिका गेल्या महिनाभरापासून ओमायक्रॉन प्रभावित देशामधून मुंबईत आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. यामध्ये आतापर्यंत १ नोव्हेंबरपासून ६ डिसेंबरपर्यंत सुमारे ५५१० प्रवासी संक्रमित देशामधून मुंबईत आले आहेत. यांच्या चाचण्यांमध्ये कोरोनाबाधित आढळणाऱ्याची जिनोम चाचणी करण्यात येत आहे. यामध्ये कोरोनाबाधित २० प्रवासी आणि त्यांच्या संपर्कातील ९ अशा २९ जणांपैकी २७ जणांची जिनोम चाचणी करण्यात येत आहे.


शोध मोहिमेनंतर कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांसाठी महापालिकेच्या मरोळ (अंधेरी) येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात २५० बेड सज्ज ठेवण्यात आले आहेत. त्यासोबतच ब्रीच कॅँडी आणि मुंबई रुग्णालयातही प्रत्येकी दहा बेड तयार ठेवण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.



ओमायक्रॉनवर मात केल्यानंतर डॉक्टरला पुन्हा कोरोना


बंगळूरू : ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गावर मात करणाऱ्या बंगळुरुमधील डॉक्टरला कोरोनाचा झाल्याची माहिती समोर येत आहे. ४६ वर्षीय डॉक्टर परदेशामधून भारतामध्ये दाखल झाला होता.



नागपुरात तिघांच्या रिपोर्टने वाढवली चिंता


परदेशात नागपुरात आलेल्या तिघांच्या पॉझिटिव्ह अहवालाने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे. नोव्हेंबर महिन्यात परदेशातून नागपुरात १७५ प्रवासी आले होते. यातील एक रुग्ण दक्षिण आफ्रिकेतून तर उर्वरित दोघे हे ब्रिटनममधून नागपुरात परतले. या सर्वांच्या चाचण्या करण्यात आल्या. तसेच त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. यातील एक ४५ वर्षीय महिला, तिची नऊ वर्षीय मुलगी आणि एका पुरुषाची चाचणी पॉझिटिव्ह आली.

Comments
Add Comment