मुंबई (प्रतिनिधी) : ओमायक्रोन या नवीन विषाणू व्हेरिएंटमुळे जगभरात चिंतेचे वातावरण असताना राज्यासह मुंबई महापालिकेने देखील नवीन नियमावली जाहीर केली आहे. बेस्टने युनिव्हर्सल पास तपासण्यास सुरवात केली आहे. मात्र याबाबत प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न दिल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
२७ नोव्हेंबर रोजी राज्य सरकारने ओमायक्रोनच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या नियमावलीमध्ये सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानुसार बेस्टने याची अंमलबजावणी केली.
मात्र याबाबत बेस्टने प्रवाशांसाठी कोणतेही परिपत्रक न काढता या नियमांची अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला होता. तर प्रवाशांनी याबाबत बेस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. अचानक या नियमांची अंमलबजावणी केल्यामुळे अनेक प्रवासी ज्यांचा केवळ एक डोस झाला आहे अशांना प्रवेश दिला गेला नाही. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.