मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. मात्र दक्षिण आफ्रिका आणि युरोपमध्ये वेगाने वाढत असलेला ओमिक्रोन या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार लशीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच एसटी, बेस्ट बस, रिक्षा व टॅक्सी या सार्वजनिक वाहनांनी प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान राज्य सरकारच्या या नवीन नियमावलीनुसार मुंबई उपनगरीय लोकलमध्ये युनिव्हर्सल पासची तपासणी होते. त्यानुसार आता बेस्ट बसमध्येही दोन डोस घेतलेल्यांच्या युनिव्हर्सल पासची तपासणी केली जाणार आहे. याची अंमलबजावणी मंगळवारी, ३० नोव्हेंबरपासून होणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली आहे. बेस्ट उपक्रमाच्या २६ बस आगार व्यवस्थापकांना या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सध्या दक्षिण आफ्रिकेत नवा ओमिक्रॉन विषाणू आढळल्यानंतर जगभरात भीती निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संपर्कात येणारे सगळे देश अलर्ट झाले आहेत. ओमिक्रॉन या विषाणूचा प्रवेश होण्यापूर्वीच त्याला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेसह बेस्ट उपक्रम सज्ज झाला आहे. बेस्टकडून प्रवाशांचा युनिव्हर्सल पास तपासण्यासाठी टीसी देखील उपलब्ध केले जाणार आहेत. तर सध्या काही वाहकांना हंगामी पदोन्नती देण्यात आली असून त्यांची देखील या कामात मदत घेतली जाणार आहे.
कसा तपासणार युनिव्हर्सल पास?
युनिव्हर्सल पास बेस्टचे टीसी तपासतील. युनिव्हर्सल पास तपासणाऱ्या टीसींची संख्या वाढविण्यात येणार आहे. ज्या आजारातून बस सुटते तिथे देखील युनिव्हर्सल पासची तपासणी होणार आहे.