मुंबई (प्रतिनिधी) : न्यायालयाने फरार घोषित केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे गुरुवारी मुंबई पोलिसांपुढे हजर झाले. त्यांच्यावर असलेल्या वेगवेगळ्या आरोपांबाबत गुन्हे शाखेने त्यांची तब्बल सात तास चौकशी केली.
गुन्हे शाखेची ही चौकशी पूर्ण झाली असून परमबीर सिंग यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले असल्याची माहिती हाती आली आहे.
‘न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मी तपासाला सहकार्य करेन. माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे आहेत. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि सत्याचा विजय होईल’, असा विश्वास परमबीर सिंग यांनी व्यक्त केला आहे. परमबीर यांची गुन्हे शाखेने चौकशी केली असली तरी त्यांच्यावर इतरही काही आरोप ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्या प्रकरणांमध्येही त्यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. परमबीर यांना फरार घोषित केले होते. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. त्यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. मागील काही महिन्यांपासून परमबीर सिंग हे तपास यंत्रणांसमोर येण्यासाठी टाळाटाळ करत होते. अटकेच्या भीतीने अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर ते समोर आल्याचे सांगितले जात आहे.
त्यांना ३० दिवसांची मुदत दिली गेली होती. अन्यथा त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार होता. पण आता परमबीर हे परतल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.