Friday, April 25, 2025
Homeमहाराष्ट्रपहिले ते चौथीचे वर्ग लवकरच होणार सुरू

पहिले ते चौथीचे वर्ग लवकरच होणार सुरू

टास्क फोर्सची मान्यता असल्याची राजेश टोपेंची माहिती

मुंबई (प्रतिनिधी) : पहिली ते चौथीचे वर्ग सर्व अटी-शर्थींसह सुरू करण्याची परवानगी देण्याची सूचना चाईल्ड टास्क फोर्सने दिल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

ग्रामीण भागांतील पाचवी ते बारावी आणि शहरी भागांतील आठवी ते बारावीचे वर्ग आधीच सुरू झाले असून आता कोरोना रुग्णांची कमी झालेली संख्या पाहता पहिलीपासूनचे वर्गही सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ग्रामीण भागात शिक्षक, शाळाचालक, पालक आदी त्यासाठी आग्रही आहेत. त्यानंतर आता राज्याच्या चाईल्ड टास्क फोर्सनेही पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची परवानगी दिली आहे.

चाईल्ड टास्क फोर्सने स्पष्टपणे सांगितले आहे की, पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयोगटामार्फत विषाणू परसरण्याची शक्यता आहे. मात्र १२ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरणानंतर शैक्षणिक संस्थामध्ये जाण्याची परवानगी देण्यात येऊ शकते. तसेच पहिली ते चौथीचे वर्ग सर्व अटी-शर्थींसह सुरू करण्याची परवानगी देण्याची सूचना चाईल्ड टास्क फोर्सने केली आहे. याबाबत विचार सुरू असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

कोव्हॅक्सिन ही मुलांना देण्यात कोणतीही अडचण नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. राज्यात लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, फक्त केंद्र सरकारने लहान मुलांचे लसीकरण करण्याबाबत परवानगी दिली, तर राज्याची तयारी आहे. राज्यात दररोज ७०० ते ८०० रुग्ण आढळत आहेत. राज्याचा पुनर्प्राप्ती दर ९८ टक्के आहे, तर मुलांमध्ये गंभीर आजाराचे प्रमाण असे कुठेही नाही. त्यामुळे पालकांनी चिंता करण्याचे कारण नाही, असे राजेश टोपे म्हणाले.

राज्यात ५० टक्के आसन क्षमतेची परवानगी सिनेमागृह आणि नाट्यगृहांना देण्यात आली आहे. कोविड कमी झाला असला तरी बेफिकीर राहून चालणार नाही, कोरोना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -