भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारला सवाल
पुणे (प्रतिनिधी) : सत्ताधारीच जर राज्यातील महिलांना सुरक्षा पुरवत नसतील, तर त्या सत्तेला काय अर्थ आहे? आज महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अशी टीका चित्रा वाघ यांनी केली.
राज्यात महिला व लहान मुलींवर मोठ्या प्रमाणावर होणारे अत्याचार, या विषयावर भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
चित्रा वाघ म्हणाल्या, या दोन वर्षांत महाराष्ट्राने काय नाही पाहिले. चांद्यापासून बांद्यापर्यंत एक जिल्हा असा नाही, ज्या ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटना घडलेल्या नाहीत. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी मागील दोन वर्षांत उच्चांक गाठला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. लहान मुली, शाळकरी मुलींवर अत्याचार होत आहेत आणि पोलीस यंत्रणा हतबल झाल्याचे दिसत आहे.
पुणे हे विद्येचं माहेरघर म्हटले जाते. पण आता ते अत्याचाराचे माहेरघर झाले आहे का? पुणेतील अत्याचार घडत आहेत ते देखील उणे नाहीत. याचबरोबर, आतापर्यंत अनेक सरकारे आली, अनेक गेली; परंतु कायदा आणि सुव्यवस्थेची एवढी वाईट अवस्था आम्ही आजपर्यंत पाहिलेली नव्हती, असेही चित्रा वाघ यांनी यावेळी सांगितले.