न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्याच्या टी-ट्वेन्टी क्रिकेट मालिकेत भारताने विजयी आघाडी घेतली आहे. नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली आणि अनुभवी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाच्या मालिका विजयाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. उंचावलेली सांघिक कामगिरी तसेच त्यात सीनियर आणि युवा अशा सर्वच क्रिकेटपटूंचे मोलाचे योगदान ठरले आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) झालेल्या सातव्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेत उपविजेतेपद मिळवलेल्या किवी संघाकडून चांगली चुरस अपेक्षित होती. मात्र, भारतातील वातावरण आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यात त्यांना अपयश आले. तरीही भारताच्या नव्या संघाच्या यशाकडे दुर्लक्ष करून चालणारे नाही.
टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील ‘फ्लॉप शो’नंतर भारताच्या कामगिरीकडे देशभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले होते. घरच्या पाठिराख्यांसमोर होणाऱ्या झटपट मालिकेत यजमान संघाचे पारडे जड होते. मात्र, प्रतिस्पर्धी संघही तुलनेत कडवा आहे. त्यामुळे एकतर्फी मालिका विजयाचा अंदाज कुणी वर्तवला नव्हता. मात्र, प्रत्येक क्रिकेटपटूने संधीचे सोने केले. कर्णधार रोहितसह लोकेश राहुल तसेच सूर्यकुमार यादवच्या रूपाने आघाडी फळी बहरल्याने मधल्या फळीतील नेमक्या फलंदाजांच्या वाट्याला बॅटिंग आली. गोलंदाजीत वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि ऑफस्पिनर आर. अश्विन या अनुभवींना युवांची चांगली साथ लाभली. प्रतिस्पर्धी संघाकडून मार्टिन गप्टिल आणि मार्क चॅपमनने थोडा प्रतिकार केला तरी डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्सने अपयश पराभवाला कारणीभूत ठरले. गोलंदाजीत हंगामी कर्णधार टिम साउदी थोडा प्रभावी ठरला तरी अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, फिरकीपटू मिचेल सँटनर तसेच अॅडम मिल्ने, ईश सोढी यांना अपेक्षित बॉलिंग करता आली नाही. न्यूझीलंडला नियोजित कर्णधार केन विल्यमसन तसेच वेगवान गोलंदाज काइल जॅमिनसनची अनुपस्थिती जाणवली. कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करावयाचे असल्याने दोघांनी मालिकेतून माघार घेण्याला पसंती दिली. टी-ट्वेन्टी वर्ल्डकप संपल्यानंतर तिसऱ्या दिवशी पाहुणे क्रिकेटपटू मैदानात उतरले. त्यामुळे त्यांच्या जिगरीचे कौतुक करायला हवे. सलग क्रिकेट खेळल्याने त्यांना सातत्य राखणे जड गेले.
भारताचा संघ न्यूझीलंडविरुद्धची मालिका नवे मुख्य प्रशिक्षक आणि नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळतोय. माजी कर्णधार रवी शास्त्री यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ टी-ट्वेन्टी वर्ल्डकपनंतर संपुष्टात आला. त्यामुळे नव्या मुख्य प्रशिक्षकाची उत्सुकता होती. ‘द वॉल’ म्हणून सर्वांना ठाऊक असलेला माजी महान फलंदाज आणि कर्णधार द्रविडच्या रूपाने भारताला एक प्रतिभावंत मुख्य प्रशिक्षक लाभला. नेतृत्वाची वाढती जबाबदारी फलंदाजीला मारक ठरतेय, असे कारण देत विराट कोहलीने वनडे आणि टी-ट्वेन्टी संघांचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेनंतर भारताला नवा टी-ट्वेन्टी कर्णधार मिळणार होता. त्यासाठी बीसीसीआयने सलामीवीर रोहित शर्मावर विश्वास दाखवला. प्रत्येक क्रिकेटपटूला संधी मिळेल, असे नवे प्रशिक्षक द्रविड यांनी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वीच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले. तो शब्द त्यांनी खरा करून दाखवला. आयपीएल गाजवलेला फलंदाज वेंकटेश अय्यर आणि मध्यमगती गोलंदाज हर्षल पटेलला अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या लढतीत संधी दिली. पहिल्या दोन सामन्यांत खेळू न शकलेल्या क्रिकेटपटूंचा तिसऱ्या सामन्यात समावेश करण्यात आला. द्रविड यांची फलंदाज म्हणून कारकीर्द उल्लेखनीय आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत बंगळूरुतील राष्ट्रीय क्रिकेट अॅकॅडमीचे (एनसीए) प्रमुखपद सांभाळताना तसेच भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील क्रिकेटपटूंना कोचिंग करताना त्यांच्यातील कुशल आणि प्रतिभावंत प्रशिक्षकाची ओळख संपूर्ण जगाला झाली आहे. त्यामुळे आगामी मुख्य प्रशिक्षक म्हणून द्रविड यांचीच नियुक्ती व्हावी, यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीने विशेष प्रयत्न केले.
रोहितने यापूर्वी, त्याने झटपट क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. त्यात भारताने बाजी मारली होती. विराटनंतर भारताचा भावी कर्णधार म्हणून या मुंबईकर फलंदाजाचे नाव आघाडीवर आहे.
आयपीएलच्या रूपाने रोहितला टी-ट्वेन्टी प्रकारात कर्णधारपद भूषवण्याचा मोठा अनुभव आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएलमधील पाचही विक्रमी जेतेपदे त्याच्याच कर्णधारपदाखाली जिंकलीत. टी-ट्वेन्टी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत सर्वाधिक धावा करताना त्याने ओपनर म्हणून कामगिरी चोख पार पाडली. केवळ वैयक्तिक खेळ उंचावला नाही, तर लोकेश राहुलसह पहिल्या सामन्यात अर्धशतकी आणि दुसऱ्या सामन्यात शतकी सलामी दिली. रोहितचे नशीब जोरावर काही टी-ट्वेन्टी प्रकारात अनेक वेळा ‘टॉस’ महत्त्वाचा ठरतो. त्याने दोन्ही सामन्यांत नाणेफेक जिंकली. त्यामुळे भारताला ‘टॉस’ जिंकणारा कर्णधार मिळाला, अशी प्रतिक्रिया क्रिकेटचाहत्यांमध्ये उमटली आहे. त्याची ‘लीड फ्रॉम द फ्रंट’ ही वृत्ती भारताला भविष्यात फलदायी ठरू शकेल. एका मालिका विजयावरून यशाची टक्केवारी ठरवली जात नसली तरी राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या नव्या संघाने मिळवलेला ‘विजयारंभ’ भविष्यातील यशाची नांदी ठरावी.