Thursday, January 16, 2025
Homeमहत्वाची बातमीनव्या धार्मिक ध्रुवीकरणाकडे?

नव्या धार्मिक ध्रुवीकरणाकडे?

प्रमोद मुजुमदार, नवी दिल्ली

काही दिवसांपूर्वी त्रिपुरामध्ये जातीय तणाव भडकला होता; परंतु घटना घडल्यानंतर इतक्या दिवसांनी महाराष्ट्रात मोर्चे निघावेत आणि त्यातून दगडफेक व्हावी, हे अनपेक्षित आहे. त्यातल्या त्यात आंदोलकांनी पोलिसांनाही न जुमानणं, हे अराजकाचं लक्षण आहे. त्रिपुरामधल्या धार्मिक तणावाच्या घटनांचे पडसाद महाराष्ट्रात काही ठिकाणी उमटले. राज्यात मालेगाव, नांदेड आणि अमरावती अशा ठिकाणी तणाव निर्माण झाला. मालेगावमध्ये ‘बंद’ची हाक देण्यात आली होती. दुपारपर्यंत बंद शांततेमध्ये सुरू होता. मात्र, नंतर त्याला हिंसक वळण लागलं आणि दगडफेक करण्यात आली. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. दुसरीकडे नांदेडमध्ये काही लोकांनी केलेल्या दगडफेकीमुळे शहरात तणाव निर्माण झाला. अमरावतीमध्येही या घटनेचे पडसाद उमटले. काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली. अमरावती शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येत आंदोलक सहभागी झाले होते. मात्र या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने शहरात तणाव निर्माण झाला. आंदोलकांनी काही दुकानांची तोडफोड केली.

ही परिस्थिती पाहता उत्तर प्रदेशमध्ये जसे आंदोलकांवर गुन्हे दाखल करून, नुकसानभरपाईची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याचा निर्णय घेतला, तसाच निर्णय इतरत्रही घेण्याची आवश्यकता या निमित्ताने जाणवली. शीघ्र कृती दलाचे जवान आणि त्यांच्या वाहनांवरही जमावातर्फे दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला. या संपूर्ण प्रकारामध्ये पोलिसांच्या वाहनांचं नुकसान झालं, तर काही नागरिकही जखमी झाले. आंदोलकांचा उन्माद इतका वाढला की, त्यांनी एका हॉस्पिटलचीही तोडफोड केली. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचा वापर करावा लागला. यामध्ये तीन पोलीस अधिकारी आणि सात पोलीस कर्मचारी जखमी झाले. नांदेडमधल्या नई आबादी, शिवाजीनगर आणि देगलूर नाका परिसरात जमावाने दगडफेक करत तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यात अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे जखमी झाले. या जमावाने पुढे चाल केली असती, तर अनिष्ट प्रकार घडू शकले असते.

अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. राज्य सरकारने त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यातच भाजपने विरोधात आंदोलन केल्यानं मतांचं ध्रुवीकरण होण्याचा प्रकार घडू शकतो. लग्नाच्या वरातीला परवानगी मिळत नसताना मोठे मोर्चे कसे निघतात, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. त्रिपुरा इथे धर्मगुरू हजरत मोहंमद पैगंबर यांच्याबद्दल काही कट्टरपंथीयांनी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ रझा अकादमी आणि इतर मुस्लीम संघटनांकडून महाराष्ट्रात आंदोलनं केली गेली. रझा अकादमीच्या पूर्वीच्या मोर्चात पोलिसांवर हल्ले झाले होते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे ही संघटना पूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

याच सुमारास काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराइज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरून मोठा वाद सुरू झाला. या पुस्तकात खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना बोको हराम किंवा इसिससोबत केल्याची टीका केली जाऊ लागली. या मुद्द्यावरून भाजपकडून टीका केली जात असताना खुर्शिद यांनी, मी हिंदूंना दहशतवादी म्हणालोच नाही, असं घूमजाव केलं. त्यांच्या या प्रतिक्रियेवरून नवी चर्चा सुरू झाली. ‘सनराइज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाइम्स’ या पुस्तकातल्या ‘द सॅफ्रन स्काय’ या प्रकरणामध्ये खुर्शिद यांनी हिंदुत्वाची तुलना बोको हराम आणि इसिसशी केली. ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व, गेल्या काही वर्षांमध्ये हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरूपामुळं बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व इसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरूपासारखंच आहे, अशा आशयाचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून देशभरात वाद निर्माण झाला आणि या पुस्तकावर तसंच खुर्शिद यांच्यावर जोरदार टीका केली गेली. या वक्तव्यामुळे काँग्रेसअंतर्गतही त्यांच्यावर टीका सुरू झाली. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी खुर्शिद यांनी केलेली टीका सयुक्तिक नाही, असं म्हटलं.

आजघडीला एकीकडे उत्तर प्रदेशमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रियांका गांधी यांनी सौम्य हिंदुत्वाचा स्वीकार केला आहे. त्या मंदिराच्या पायऱ्या झिजवत आहेत. याच सुमारास खुर्शिद यांच्या भूमिकेमुळे काँग्रेसची अडचण झाली. यातून मतांचं ध्रुवीकरण होऊन काँग्रेसलाच फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे खुर्शिद यांना आपली भूमिका स्पष्ट करावी लागली. मी हिंदूंना दहशतवादी म्हणालेलोच नाही. मी फक्त म्हणालो आहे की, ते आणि अन्य अतिरेकी विचारसरणी धर्माचा विपर्यास करण्याबाबत सारखेच आहेत. हिंदुत्वाने सनातन धर्म आणि हिंदुत्ववादाला बाजूला सारलं आहे व ‘बोको हराम’ आणि ‘इसिस’प्रमाणेच आक्रमक भूमिका घेतली, असं आपण पुस्तकात म्हटलं असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. हिंदुत्वाच्या समर्थकांकडून ज्या पद्धतीनं या मुद्द्याचा प्रचार केला जातोय, ते पाहता हा धर्माचा विपर्यास आहे, असं त्यांनी नमूद केलं. दुसरीकडे भाजपने या पुस्तकावरून काँग्रेसची कोंडी करायचं ठरवल्याचं पहायला मिळालं. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी खुर्शिद यांच्या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

खुर्शिद यांच्या मतानुसार त्यांनी पुस्तकात हिंदू धर्माची नाही तर, हिंदुत्वाची तुलना अतिरेकी संघटनांशी केली. पुस्तकात हिंदू धर्माविषयी अनेक चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत. लोकांनी पूर्ण पुस्तक वाचायला हवं. भाजपने मात्र पुस्तकावर तीव्र प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. मुख्तार अब्बास नक्वी आणि केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे यांनी या प्रकरणी म्हटलं की, स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या खुर्शिद यांच्यासारख्यांना हिंदुत्वाबद्दल काहीही माहिती नाही. कधी ते हिंदुत्व दहशतवादाशी जोडतात, कधी तालिबानशी. हा सगळा मूर्खपणा आहे. खुर्शिद यांचे विचार धार्मिक विद्वेष पसरवणारे आहेत. आपलं राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी ते अशी तथ्यहीन वक्तव्यं करत आहेत. ज्यांच्या पक्षाने मुस्लीम मतं मिळवण्यासाठी ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द तयार केला, त्यांच्याकडून वेगळं काय अपेक्षित असणार? महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसची सहकारी असणाऱ्या शिवसेनेनेही खुर्शिद यांना टीकेचं धनी बनवलं. शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनीही या मुद्द्यावर ट्वीट केलं. ‘अवघं विश्वची माझं घर’ या तत्त्वावर चालणाऱ्या हिंदू धर्माला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. अशी अर्धवट माहिती तुम्हाला प्रसिद्धी देऊ शकते; पण लाखो हिंदूंच्या भावना दुखावल्या जातील, असं त्यांनी म्हटलं. एव्हाना अनेक राजकारणी आणि विचारवंत दोन्ही घटनांवर तावातावाने व्यक्त होत आहेत. त्यातून धार्मिक ध्रुवीकरणाव्यतिरित आणखी काही साधलं जातं का, हे आता पाहायचं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -