Thursday, April 24, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखप्रदूषण वाढतंय, काळजी घ्या...

प्रदूषण वाढतंय, काळजी घ्या…

मानवासह प्रत्येक जीवाला शुद्ध हवा, शुद्ध पाणी मुबलक प्रमाणात सहजगत्या मिळणे ही जीवसृष्टीची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पण त्यातच जर मानवनिर्मित गोष्टींमुळे अडथळा निर्माण होऊन असाध्य अशा व्याधींना निमंत्रण मिळून जीवच धोक्यात येणार असेल, तर फार मोठा अनर्थ घडू शकतो. सर्व जगात सुजलाम, सुफलाम असलेल्या आपल्या देशात सध्या राजधानी दिल्लीसह उत्तरेकडील अनेक राज्यांमधील वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा खूप गाजतोय. प्रदूषणाचे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले आहे. वायू प्रदूषणाने नवी दिल्लीतील लोकांचा श्वास रोखून धरल्यानंतर आता मुंबईतील नागरिकही वायू प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याचे चित्र वारंवार दिसत आहे. त्यातच मुंबईची विशेषत: दक्षिण मुंबईतली हवा, तर दिल्लीपेक्षाही जास्त प्रदूषित असल्याचा अहवाल आला आणि मुंबईकरांचे धाबेच दणाणले.

समुद्रावरून वाहणारे वारे, वाऱ्याचा मंदावलेला वेग आणि वाढलेल्या वाहनसंख्येमुळे वाढलेले प्रदूषण या सगळ्यांचा विपरित परिणाम हा दक्षिण मुंबईतल्या हवेवर झाला. त्यामुळे मुंबईतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही अधिक झालेला पाहायला मिळाला. कुलाबा परिसरातील हवा दिल्लीच्या संपूर्ण हवेच्या तुलनेत अतिशय वाईट असल्याचे नोंदविण्यात आले. त्यामुळे आता मुंबईची प्रदूषणकारी दिल्ली होऊ नये याची खबरदारी मुंबईकरांबरोबरच राज्यकर्ते, सामाजिक संघटना आदींना युद्ध पातळीवर घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे भल्या पहाटे सर्वत्र धुके पसरल्यासारखी परिस्थिती बघायला मिळत असल्याने अनेकजण सुखावले होते. धुक्याची ही चादर पसरलेल्या भागांमध्ये कुलाबा, नरिमन पॉइंट, मलबार हिल आदी उच्चभ्रू परिसरांबरोबरच माझगाव, बीकेसी, मालाड आणि अंधेरी परिसरातील हवेची स्थिती खालावल्याचेही वृत्त आले. पुढील दोन ते तीन दिवस ही स्थिती ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता वर्तविली आहे.

वाहनांमुळे होणारे मोठे प्रदूषण, बांधकामात झालेली वाढ यामुळे धूलिकण वाहून न जाता जमिनीलगत हवेत तरंगतात. मुंबईतील वातावरणामुळे श्वसनाचे आजार बळावतील. आधीच आजार असलेल्यांना श्वास घेण्यास अधिक अडचण वाटू लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी हेवी व्यायाम करणे टाळायला हवे. सोबतच सकाळी आणि संध्याकाळनंतर फिरण्यासाठी नियमित घराबाहेर पडणे देखील टाळायला हवे. तसेच एन-९५ मास्कचा वापर करणे महत्त्वाचे आहे. जॉगिंग टाळणे आणि व्यायाम करताना ब्रेक घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे कोरोनापासून वाचण्यासाठी कित्येक देशांनी लॉकडाऊन लागू केला. या लॉकडाऊनने प्रदूषणाच्या समस्येतून बाहेर काढले; परंतु मुंबईमध्ये मात्र प्रदूषणात घट होण्याऐवजी वाढ झाल्याचा अहवाल आयआयटीएम पुणेअंतर्गत येणाऱ्या सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी वेदर फोरकास्टिंग ॲॅण्ड रिसर्च म्हणजे ‘सफर’ या संस्थेने दिला आहे. मुंबईच्या हवेत जीवघेणे सूक्ष्मकण सोडण्याचे वाहतूक क्षेत्राचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत दु्प्पट झाले आहे, त्यामुळे वाहनसंख्या हा हवेचा स्तर अधिक घसरवणारा मोठा स्त्रोत बनला आहे. मुंबईत दशकभरात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

वाहनांची ही वाढलेली संख्या आणि सिग्नलवर आणि अनेक वळणांवर, रस्त्यांवरील बेफिकीरपणे केलेली पार्किंग यामुळे वारंवार होणारी वाहतूक कोंडी या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे वायू प्रदुषणात हाेत असलेली वाढ होय. आपली मुंबई तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेली असल्याने स्वच्छ हवा आत येते. मात्र हवा आत आली की, ती प्रदूषित होते. गेल्या ५ वर्षांत वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणात दुप्पट वाढ झाली आहे. दुसरीकडे लॉकडाऊननंतर कंपन्या सुरू झाल्याने देखील प्रदूषण वाढले. अशातच हिवाळ्यात कमी तापमानामुळे, आर्द्रतेत वाढ झाल्याने आणि वाऱ्यांचा वेग कमी असल्याने प्रदूषण वाढीस पोषक असं वातावरण तयार होतं आणि यामुळेच मुंबईची देखील दिल्ली होत आहे का, असे सध्याचे चित्र आहे. मुंबईमध्ये लोकसंख्येबरोबर वाहनांच्या संख्येतही जास्त वाढ झाली आहे. वायू प्रदूषणाबरोबर पार्किंग आणि इतर गोष्टींची समस्या देखील आहे. कोरोनामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर कमी होऊन खासगी वाहने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात येत असल्यानेही प्रदूषण वाढत आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात मुंबईकर हे रेल्वे वाहतुकीवर अवलंबून आहेत; परंतु कोरोनाकाळात मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल ही फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांसाठी सुरू होती. त्यामुळे नाईलाजाने अनेक मुंबईकरांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. मुंबईच्या विकासात जेवढा लोकलचा वाटा आहे, तेवढाच प्रदूषण नियंत्रित राखण्याचा देखील आहे. वायू प्रदूषणाला सर्वाधिक जबाबदार वाहनक्षेत्रच आहे, त्यामुळे शहरातील वाहने आणि त्यांचा प्रवास तातडीने कमी करण्याची आवश्यकता आहे. प्रदूषणामुळे कित्येक लोकांना जीव गमवावा लागत आहे, तर काहीजणांना अस्थमा, अॅलर्जी, मायग्रेनसारख्या समस्यांचा आयुष्यभर सामना करावा लागत आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी असल्यामुळे येथे वाहतूक क्षेत्राची वाढ होणारच आहे. त्यामुळे आता धोक्याची घंटा वाजायला सुरुवात झाल्याने त्वरित ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -