मोनिश गायकवाड
भिवंडी : कोणतीही शासकीय अधिसूचना अथवा स्थानिक शेतकऱ्यांच्या सूचना न मागविताच भिवंडीतील जमीन खासगी विकासकांना देण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी करीत असून येथील भूसंपादन शेतकऱ्यांना शेतजमिनीतून बेदखल करून देशोधडीला लावणारे असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या भादाणे आतकोली येथील भादाणे इंडस्ट्रीयल अँड लॉजेस्टिक पार्कसाठी २०० एकर, तर आतकोली इंडस्ट्रीयल अँड लॉजेस्टिक पार्कसाठी ६० एकर जमीन एमआयडीसीने १८ मार्च २०२० रोजी पार पडलेल्या ३८६ व्या संचालक मंडळाच्या सभेत १५ (ब) कलमानव्ये मंजूर केली.
या प्रस्तावित जमिनीत सुमारे ६८ जमीनधारक व ३५ घरे असून काही जमिनी बिगरशेती करून त्या ठिकाणी उद्योग सुरू असताना व येथील स्थानिक शेतकरी स्वतःच्या जमिनीच्या विकासासाठी सक्षम असताना खासगी विकासकाच्या घशात ही मोक्याची जमीन घातली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बुधवारी स्थानिक ठिकाणी शेतजमिनीची मोजणी करण्यासाठी एमआयडीसी, भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी स्थानिक पडघा पोलिसांच्या संरक्षणात आले असता, ग्रामस्थांनी त्यांना रस्त्यात अडवीत मोजणीस विरोध करीत आपला संताप व्यक्त केला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कटके यांनी संबंधित अधिकारी शेतकरी यांच्यातील वादासंदर्भात चर्चा घडवून आणण्यासाठी बैठक आयोजित करण्याचा तोडगा सुचवीत मोजणी कार्यक्रम रद्द केला.