पालघर (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या प्रशासनाने यंदा करदात्यांच्या पाण्याची बिले गृहनिर्माण संस्थेच्या नावाने पाठवली आहेत. याला वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील गृहनिर्माण संस्थांनी कडाडून विरोध केला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या या गलथान कारभारामुळे शहरातील करदात्यांना आता अक्षरश: उबग आला आहे. त्यामुळे प्रशासकीय राजवट कधी संपते, अशा प्रतीक्षेत करदाते आहेत.
या महानगरपालिकेत घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली करण्यासंदर्भात प्रशासन अपयशी ठरले आहे.आजच्या घडीला शेकडो कोटी रुपयांची थकबाकी आहे. ती प्रभावीपणे वसूल करणे प्रशासनाला शक्य होत नसल्यामुळे मनपाने पाणीपट्टीची बिले यंदा गृहनिर्माण संस्थाना पाठवली आहेत.
ही वसुली गृहनिर्माण संस्थांनी करावी व एकरकमी पालिकेकडे जमा करावी, अशी जबरदस्ती करण्यात येत आहे. त्यास सर्व स्तरांतून विरोध करण्यात येत आहे. महानगरपालिका आपली जबाबदारी टाळत असून गृहनिर्माण संस्थांना वेठीस धरत असल्याचा आरोप अनेक गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचा आंदोलनाचा इशारा
या बिलासंदर्भात प्रहार जनशक्ती पक्षाचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष हितेश जाधव यांनी नगरविकास मंत्र्यांकडे दाद मागितली आहे. त्यास अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.