रोहित गुरव
यूएईतील टी-ट्वेन्टी विश्वचषक २०२१ स्पर्धा ही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्याने रविवारी पूर्ण झाली. ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना जिंकत प्रथमच टी-ट्वेन्टी विश्वचषक उंचावला. यंदाची स्पर्धा पाकिस्तानसाठी विशेष ठरली आहे. पाकिस्तान संघासह पाक क्रिकेटसाठी ही स्पर्धा संजीवनीपेक्षा कमी नाही.
अलीकडच्या काही वर्षांतील पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास पाहिला तर या बाबी प्रकर्षाने जाणवतील. भारतासोबत स्पर्धा खेळणे हे पाकिस्तान संघातील क्रिकेटपटूंसाठी पैसा आणि प्रसिद्धी मिळवण्याचे मोठे साधन. तर भारताला पाकिस्तानात खेळायला बोलावणे हे पाकिस्तान क्रिकेटसाठी आर्थिकदृष्ट्या गरजेचे. पण दहशतवाद्याच्या मुद्द्यावर भारताने पाकिस्तानसोबत द्वीपक्षीय मालिका खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पाक क्रिकेटची आर्थिक कोंडी झाली आहे. त्यात आयपीएलचे दरवाजेही बंद झाल्याने पाक खेळाडूंमध्ये कमालीची नाराजी आहे. २००९मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव सर्वच देश पाकिस्तानात खेळण्याचे धाडस करत नव्हते; ते आजही कायम आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडने पाकिस्तान दौऱ्यात सामना सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी सुरक्षेच्या कारणास्तव खेळण्यास नकार दिला. त्यापाठोपाठ इंग्लंडनेही हेच कारण देत दौरा रद्द केला. बुडत्याचा पाय आणखी खोलात म्हणतात ना, तसेच आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानचे झाले. आर्थिक कोंडीमुळे पाक क्रिकेट डबघाईला तर खेळ व पैसा मिळत नसल्याने पाकिस्तान खेळाडूही नैराश्येच्या गर्तेत असे दुहेरी संकट होते. ही मरगळ झटकण्यासाठी त्यांना काही तरी चेंज हवा होता. एक मोठी स्पर्धा गाजवायला हवी होती. ती संधी टी-ट्वेन्टी विश्वचषक २०२१ स्पर्धेने दिली.
वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्याच हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने भारताला पराभवाचा धक्का दिला. त्यापाठोपाठ बलाढ्य न्यूझीलंडचा अडथळा त्यांनी दूर केला. अफगाणिस्तान, नामिबीया, स्कॉटलंड यांना पराभूत करत गटातील सर्वच्या सर्व सामने जिंकून उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. उपांत्य फेरीत ऑस्टेलियाने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. विजयासाठी पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या नाकात दम आणला होता. मोक्याच्या क्षणी हसन अलीने मॅथ्यू वॅडेचा झेल सोडून पाकिस्तानचे विश्वचषक विजयाचे स्वप्न धुळीस मिळवले. असे असले तरी पाकचा यंदाच्या विश्वचषकातील प्रवास वाखाणण्याजोगा आहे. गटातील सर्वच्या सर्व सामने जिंकण्याचे कर्तब पाकिस्तानने केले. त्यात भारत, न्यूझीलंडसारख्या प्रबळ दावेदार असणाऱ्या संघांना पाकने नमवले हे विशेष. उपांत्य फेरीत पाकिस्तान पराभूत झाला असला तरी त्यांच्या पराभवात शान होती. उपांत्य फेरीचा सामना ते जीव ओतून खेळले. फलंदाजी, गोलंदाजी आणि अपवाद वगळता क्षेत्ररक्षणात त्यांनी शंभर टक्के सर्वोत्कृष्ट कामगिरी केली. उपांत्य फेरीत जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाच्या नाकात दम आणला हेही नसे थोडके.
संपूर्ण स्पर्धेत कर्णधार बाबर आझम, मोहम्मद रिझवान यांची विस्फोटक फलंदाजी आणि शाहीन शाह आफ्रिदीच्या भेदक गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांच्या सांघिक कामगिरीची दखल माजी क्रिकेटपटू तसेच क्रिकेट जाणकारांनी घेतली. परिणामी, या स्पर्धेमुळे जगाचा, जगातील क्रिकेट संघांचा पाकिस्तानकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. कमकुवत संघ म्हणून आता पाकिस्तानकडे पाहता येणार नाही. पाकिस्तानकडे दर्जेदार क्रिकेटपटू आहेत, हे या स्पर्धेने दाखवून दिले आहे. अशा संघाबरोबर मालिका खेळण्यासाठी बलाढ्य संघ कायम उत्सुक असतात आणि दौऱ्यातही रस दाखवतात. ऑस्ट्रेलिया पाठोपाठ इंग्लंडनेही पाकिस्तानात खेळण्याची आता तयारी दर्शवलीय, हे त्याचेच प्रतीक आहे. त्यामुळे सध्या तरी पाक क्रिकेट परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. टी-ट्वेन्टी विश्वचषक २०२१ स्पर्धा ही त्यांच्यासाठी क्रांतीकारी ठरली आहे. म्हणूनच भविष्यात पाक क्रिकेटने कात टाकली तर नवल वाटायला नको. तसे झालेच तर ते टिकवायला हवे. त्यासाठी आधी पाकिस्तानला आत्मपरीक्षणाची गरज आहे. आज ही वेळ त्यांच्यावर का आली याचा मागोवा घ्यावा लागेल. आणि भविष्यात अशी वेळ येऊ नये यासाठी आतापासूनच तजवीज करावी लागेल. विशेष म्हणजे दहशतीने पोखरलेल्या या देशाला दहशतवादाचे समूळ उच्चाटन करावेच लागेल. तेच त्यांच्या प्रगतीच्या आड येतेय.