Wednesday, July 24, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यकौटुंबिक नातेसंबंध घट्ट करण्याची सुवर्णसंधी!

कौटुंबिक नातेसंबंध घट्ट करण्याची सुवर्णसंधी!

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे

दिवाळी… लहान-मोठ्यांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सगळ्यांना एकत्र आणणारा सण. आपण सर्वचजण दिवाळीची आतुरतेने वाट पाहत असतो… लहान मुले नवीन कपडे, फटाके, फराळ, खाऊ, सुट्ट्या, फिरायला जाणे यासाठी आतुर असतात, तर मोठी माणसे नवीन घर, गाडी, सोने, जमीन खरेदी यासाठी दिवाळीत नियोजन करीत असतात. घरोघरी महिला स्वतः साफसफाई, फराळाचे पदार्थ बनवण्याची तयारी, सामान खरेदी यादी यात व्यग्र असतात. सर्वांना उत्साह, ताजेपणा, उल्हास, आनंद आणि प्रेरणा देणारी ही दिवाळी जशी जोमात येते, तशीच सुमधुर आठवणी ठेऊन निघून पण जाते.

या सणासुदीच्या काळात आपण सर्वजण, प्रामुख्याने महिला किती दमतात, छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेऊन किती बारकाईने नियोजन करतात, वेळप्रसंगी आजारी देखील पडतात; पण कोणाच्याही उत्साहाला गालबोट न लागू देता सगळं निमूटपणे, नीटनीटकेपणे पार पडतातच. घरातील सर्वच जण या सणात सक्रिय होतात आणि आपली परंपरा जपण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून, जास्तीत जास्त आनंदात हा उत्सव साजरा करण्याचा प्रयत्न करतात.

सोशल मीडियावर शुभसंदेशांचा महापूर येतो, तसेच ‘हॅप्पी दिवाळी’ असा संदेश देणारा फोन, वेळात वेळ काढून सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, कुटुंबातील सदस्य एकमेकांना आवर्जून करतात. पण खरा प्रश्न हा आहे की, दिवाळीच्या या चार-पाच दिवसांत एकमेकांना सोशल मीडियावर अथवा फोनवर गोड शब्दांत शुभेच्छा देणारे कुटुंबातील सर्व सदस्य वर्षभर मात्र एकमेकांशी तितक्याच प्रेमाने, समजुतीने, आपुलकीने वागत असतात का? बहुतांश वेळा उत्तर ‘नाही’ असेच येईल.

कोणत्याही सणावाराच्या, वाढदिवसाच्या निम्मिताने औपचारिकता दाखवून, गोड बोलून तेवढ्यापुरते एकमेकांना कुरवाळणे आणि वर्षभर परत त्याच व्यक्तीची निंदा-नालस्ती, लावालाव्या करणे यातच अनेक कुटुंबातील सदस्य स्वतःला धन्य मानतात. नातं, मग ते कोणतंही असो, नवरा-बायको, बहीण-भाऊ, नणंद-भावजय, सासूबाई-सुनबाई अथवा आपले बालगोपाळ भाचे, पुतणे, नातू… सगळेच कुटुंबातील महत्त्वाचे घटक असतात. ज्येष्ठांचा आदर, मुलांना प्रेम, जिव्हाळा, माया, ममता, महिलां प्रती जाणीव, आदर आणि त्यांना समजून घेणं इतकं साधं, सोपं पथ्य पाळलं तरी कुटुंब सुखात राहू शकतं. पण अनेक घरात नातेसंबंध या विषयावर काम केलेले दिसत नाही. नात्यातील प्रत्येक जण महत्त्वाचा आहे, प्रत्येकाच्या भावनांना घरात स्थान आहे, प्रत्येकाला स्वतःची मतं आहेत आणि आपला स्वतंत्र दृष्टिकोन आहे याबाबत अनेक मंडळी अनभिज्ञ दिसतात. आम्हीच कसे खरे, आम्हीच कसे योग्य आणि आम्हीच कसे सगळ्या कुटुंबाचे सूत्रधार, हा हेकेखोरपणा अनेक नातेवाईक सातत्याने दाखवत असतात. घरातील एखाद्याची पाठ फिरली की, त्याची निंदा करणे, घरातील ठरावीक सदस्यांना डॉमिनेट करणे, सतत चित्रविचित्र टोमणे मारून घरातील ठरावीक सदस्यांना त्रासून सोडणे, घरातल्या घरात राजकारण करणे, एकमेकांची बदनामी करणे, इतरांच्या चुका शोधून-शोधून त्यावर जाहीर चर्चा करणारे, घरातल्या घरात ग्रुप पाडणारे, भेदभाव करणारे आणि तरीही कुटुंब प्रेमाचा खोटा दिखावा करणारे, आव आणणारे आपल्या सर्वांच्याच आजूबाजूला असतात. आजकाल तर स्मार्टफोनमुळे एकमेकांचे फोन स्पीकरवर ठेऊन सगळ्यांनी एखाद्याची खिल्ली उडवणे, कोणत्याही नातेवाइकाचा फोन रेकॉर्डिंग करून आपापसात तो पाठवून त्यावर खुमासदार चर्चा करणे, कोणत्याही दोन व्यक्तीमधील संभाषण खुलेआम सगळ्यांनी ऐकून त्यावर टीका-टिप्पणी करणे, ही नवीन फॅशन आपण स्वीकारली आहे.

अशा वागण्यातून नात्यातील विश्वास तुटतो, गोपनीयता न राहता सर्व काही सार्वजनिक होते, याचे भान देखील आपण बाळगत नसतो. अनेक घरांमध्ये आपल्या कुटुंबातील महिलांना, मुलांना चार लोकांत अपमानित करणे, त्यांच्यावर ओरडणे, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, वागणुकीची, सवयीची जाहीर चर्चा करणे, असा ट्रेंड पाहायला मिळतो. वर्षभर जर घरातले वातावरण सर्वांसाठी नामुष्कीचे असणार असेल, तर चार दिवसांच्या दिवाळीत उगाच एकमेकांना खोटं प्रेम दाखवण्याची तरी काय गरज आहे?

पुढील लेखाच्या माध्यमातून आपण या दिवाळीपासून आपले कुटुंब सावरणे, सांभाळणे, हितसंबंध वृद्धिंगत करणे यासाठी कसे प्रयत्न करावेत यावर ऊहापोह करणार आहोत. यंदाच्या दिवाळीत आपण खरेदी, फराळ, फटाके, घराची सजावट याचसोबत नातेवाईक आणि नातेसंबंध यावर देखील थोडा विचार करूयात.

meenonline@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -