सुनील सकपाळ
मुंबई : सातव्या आयसीसी टी-ट्वेन्टी वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदासाठीचा प्रबळ दावेदार पाकिस्तान संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले. बाबर आझम आणि सहकाऱ्यांनी सलग पाच विजय मिळवताना भन्नाट खेळ केला. मात्र, ऑस्ट्रेलियापुढे काहीच चालले नाही. पाकिस्तानच्या युवा संघाला ट्रॉफी उंचावण्यात अपयश आले तरी त्यांनी क्रिकेटचाहत्यांची मने जिंकली.
पराभवाला जबाबदार कोण आफ्रिदी की हसन अली?
पाकिस्तानच्या पराभवासाठी मॅथ्यू वॅडेची कॅच सोडणारा हसन अली आणि वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी यांना जबाबदार ठरवले जात आहे. प्रेक्षक आणि समीक्षकांचे समजू शकतो. मात्र, पाकिस्तानचा कर्णधार आझमचेही आश्चर्य वाटते. वॅडेचा झेल टिपला गेला असता तर कदाचित जिंकलो असतो, तसे त्याने सामना संपल्यानंतर सांगितले. समजा, वॅडे बाद झाला असता तरी मार्कस स्टॉइनिस मैदानावर होता. आपल्या सहकाऱ्याने आक्रमक पवित्रा घेतल्याने त्याने एक बाजू टिकवून ठेवली. पॅट कमिन्स किंवा मिचेल स्टार्क यांच्यातही फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. शिवाय, ऑस्ट्रेलियाने सहा चेंडू राखून सामना जिंकला, हेही विसरू नका. वॅडे बाद झाला असता तर कदाचित शेवटच्या चेंडूपर्यंत सामन्याचा निकाल लांबला असता. हसन अलीला सीमारेषेवर चेंडू जज करता आला नाही, हे मान्य आहे. मग स्टार गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने शेवटचे दोन चेंडू त्याच पद्धती (यॉर्कर) टाकण्याची गरज काय होती. वॅडेने प्रतिस्पर्धी गोलंदाजाची कमकुवत बाब ओळखली आणि शेवटचे दोन सिक्सर एका एकाच पद्धतीने मारले. मुळात क्रिकेट सांघिक खेळ आहे. यात यशासाठी सर्वच्या सर्व ११ जण जबाबदार असतात. त्याचप्रमाणे पराभवाची जबाबदारीही संपूर्ण संघाचीच असते.
कांगारूंकडून किवींचे अनुकरण
उपांत्य फेरीतील दोन्ही सामन्यांचे वैशिष्ट्य धावांचा यशस्वी पाठलाग. दोन्ही सामन्यांत टॉस जिंकलेल्या कर्णधाराने प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिला सामना अबुधाबीतील झायेद स्टेडियमवर झाला तर दुसरा दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर. नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने बाजी मारली तरी त्यांच्या फलंदाजांनी तयार केलेला प्लान योग्य प्रकारे अमलात आणला. न्यूझीलंड संघातून सलामीवीर डॅरिल मिचेलने एक बाजू लावून धरली. पाकिस्तानविरुद्ध तेच काम फॉर्मात असलेला सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने केले. डेव्हॉन कॉन्व्हे आणि जेम्स नीशॅनच्या रूपाने मार्कस स्टॉइनिस आणि मॅथ्यू वॅडे आला. कांगारू असो किंवा किवीज् फलंदाज. झटपट क्रिकेट असूनही संयम बाळगला. प्रतिस्पर्धी संघाला कुठे खिंडीत पकडायचे, याचा त्यांनी योग्य अभ्यास केला. त्यासाठी हाणामारीच्या षटकांची (स्लॉग) निवड केली. दोन्ही संघांच्या उंचावलेल्या फलंदाजीतील कॉमन बाब म्हणजे शेवटच्या ओव्हरमध्ये निकाल न नेण्याचा निर्धार. न्यूझीलंडपेक्षा ऑस्ट्रेलियासमोरील आव्हान मोठे होते. परंतु, विचार करण्याची एकच पद्धत. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांचे प्लान चुकीचे ठरतात. सामना शेवटच्या षटकापर्यंत गेल्यास हुकमी बॉलरचा वापर करू, असे अनेक कर्णधार ठरवतात. मात्र, १९व्या षटकात सामना संपल्यास तोंडघशी पडतात. बाबर आझमने वॅडे आणि स्टॉइनिसची रणनीती ओळखत १९वे षटक फॉर्मात असलेल्या शाहीन शाह आफ्रिदीला दिले. मात्र, प्रतिस्पर्धी फलंदाजांना रोखण्यात आफ्रिदीलाही अपयश आले.
सलग पाच विजयानंतरचा पराभव जिव्हारी
सुपर-१२ फेरीत सर्वच्या सर्व पाच सामने जिंकणारा पाकिस्तान हा एकमेव संघ होता. गटवार साखळीत हार न मानल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा आणि तोही सेमीफायनलमधील पराभव म्हटल्यानंतर पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंसह चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अधिक वेळा बाद फेरीत (उपांत्य किंवा अंतिम फेरी) खेळण्याचा अनुभव ऑस्ट्रेलियाच्या कामी आला. कांगारूंची झटपट क्रिकेटमधील कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांनी विक्रमी पाच वेळा वनडे वर्ल्डकप जिंकला आहे. त्यात सलग तीन जेतेपदांचा समावेश आहे. सहा प्रयत्नांत एकदाही टी-ट्वेन्टी वर्ल्डकप उंचावता आला नसला तरी यंदाच्या हंगामासह तीन उपांत्य तसेच एकदा अंतिम फेरी (२०१०) गाठली आहे. पाकिस्तानने सुरुवातीच्या दोन हंगामांमध्ये फायनल प्रवेश करताना एकदा ट्रॉफीही पटकावली. त्यानंतर सलग दोनदा उपांत्य फेरी गाठली. मात्र, बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाला आयसीसी स्पर्धांच्या नॉकआउट सामन्यांत खेळण्याचा अनुभव कमी आहे. २०१६ टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये सुपर टेन, २०१९ वनडे वर्ल्डकप गटवार साखळीत आव्हान संपुष्टात आले. २०१८ आशिया चषकात उपांत्य फेरी आणि २०१७ आयसीसी चँपियन्स ट्रॉफीचे जेतेपद ही गेल्या चार वर्षांतील सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.
पराभवातून बोध घ्यायचा असतो. पाकिस्तानच्या कर्णधाराने तसे बोलून दाखवले. मात्र, टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील उंचावलेल्या कामगिरीनंतर पाकिस्तान संघाकडून त्यांचे बोर्ड तसेच चाहत्यांच्या अपेक्षाा वाढल्यात हे नक्की.
विजेता कुणीही असो… पाकिस्तान संघाचा खेळ कायम लक्षात राहणार
सातव्या स्पर्धेच्या रूपाने जगाला नवा टी-ट्वेन्टी वर्ल्डकप विजेता मिळणार आहे. यंदाची ट्रॉफी ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंडकडे गेली तरी पाकिस्तानच्या जिगरबाज खेळाची कायम चर्चा राहणार. कर्णधार बाबर आझमने सहा सामन्यांत चार हाफ सेंच्युरी ठोकताना ३०३ धावा फटकावल्या आहेत. सलामीवीर मोहम्मद रिझवान (३ अर्धशतकांसह २८१ धावा) त्याच्या पाठोपाठ आहे. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने धडाकेबाज सुरुवात केली. मात्र, त्याला सातत्य राखता आलेले नाही. लेगस्पिनर शादाब खानने मात्र, सातत्य राखले.