श्रीनिवास बेलसरे
भारतीय संस्कृती जशी अध्यात्म-केंद्रित आहे तशीच जीवनाकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने बघून जगण्याचा सोहळा करून टाकणारी उत्सवप्रेमी संस्कृती आहे. म्हणूनच आपण वर्षभर कोणते ना कोणते सण साजरे करतच असतो. शिवाय त्यांचा संबंध आपल्या पूर्वजांनी इथल्या ऋतूनुसार हवामानात होणाऱ्या बदलांशी, उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींशी जोडला. त्यामुळे आपण थंडीत, जेव्हा शरीराला जास्त कॅलरीची गरज असते तेव्हा, संक्रांतीला तीळगुळाची, तर होळीला पुरणाची पोळी, गुढी पाडव्याला कडुलिंबाचा कोवळा मोहोर गुळाबरोबर खातो. तर पावसाळ्यात, जेव्हा पचनक्रिया मंदावते तेव्हा, चातुर्मासाचे उपवासही करतो. उन्हाळ्यात चैत्रगौरीला कैरीचे पन्हे पितो. आपल्या दैवतांच्या जयंतीला होणारे प्रसाद सुद्धा फार विचारपूर्वक ठरवलेले आहेत.
सर्व सणाचा राजा दिवाळी आहे, हेही खरेच! दिवाळी म्हणजे उत्सव, आनंद, उत्साह! कापणी होऊन गेलेली असल्याने शेतकरी निश्चिंत झालेला असतो. नवे धान्य येऊन पडलेले असते. वर्षभर समृद्धी घरात नांदणार याची खात्री झाल्याने आनंद साजरा करायची सर्वांचीच इच्छा असते. त्यात हा दिव्यांचा सण सगळ्या आसमंतात आनंद पसरवतो.
पूर्वी सर्व भाषांतील सिनेमात दिवाळीची नोंद घेतलेली असायची. त्यात पती-पत्नीचे प्रेम, भावा-बहिणीचे प्रेम, शेतीतील प्राण्याबद्दलची कृतज्ञता, असे सगळे चित्रित केलेले असायचे. अलीकडे सिनेमात भारतीय देव क्वचितच दिसतात. भजने आणि आरत्यांच्या जागी कव्वाल्या आणि सुफी गाणी व भगवान शंकर, गणेश, हनुमान या देवतांच्या नावाच्या जागी खुदा, अल्ला, मौला केवळ हेच शब्द ऐकू येतात. जुन्या सिनेमात अल्लाहबरोबरच संतोषीमाता, माँ शेरोवाली, गणपती, शंकर अशा देवताही दिसत असत. अगदी परवापरवाच्या शोलेत धर्मेंद्र-हेमामालिनीला लग्नाला तयार करण्यासाठी भगवान शंकराच्या मूर्तीमागून बोलतो असा सीन होता.
सिनेमात बहुतेक सणावर खास लिहिलेली गाणी असत. त्यात कदाचित सर्वात जास्त गाणी दिवाळीवरचीच असतील! ‘तू सुखी राहा’ नावाच्या १९६३साली आलेल्या सिनेमात गदिमांनी लिहिलेले, आशाताईंनी गायलेले आणि वसंत पवारांनी संगीत दिलेले गाणे होते –
नवीन आले साल आजला
उजेड पडला नवा, दिवा लाविते दिवा
त्यात नायिका भाऊबीजेसाठी घरी आलेल्या आपल्या मामांचे वर्णन ‘चंद्र’ तर आपल्या आईचे वर्णन ‘धरणी’ असे करते –
घरी पाहुणे आले मामा
धरणीच्या घरी जसा चंद्रमा
अंधाराला येई उजाळा
थंड सुवासिक हवा,
दिवा लाविते दिवा…
‘ते माझे घर’ नावाचा सिनेमा आला होता १९६२ला! सुधीर फडकेंचे संगीत आणि आवाज पुन्हा आशाताईंचा! रवींद्र भटांचे शब्द होते –
तबकामध्ये इथे तेवती निरांजनाच्या वाती,
दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते, तुझी न् माझी प्रीती
एकेकाळचे लोकप्रिय गाणे! यात तर गीतकारांनी दिवसापेक्षा रात्र मोठी असणाऱ्या या काळातील आकाशात चमचमणाऱ्या तारकांचे होणारे सुंदर दर्शन आणि दिवाळीनिमित्त सगळीकडे लावलेल्या दिव्यांची छान तुलना केली होती –
समईसंगे आज उजळल्या या नयनांच्या वाती
आकाशातील नक्षत्रांच्या लक्ष लाविल्या ज्योती
दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते, तुझी न् माझी प्रीती
कवीने तर अगदी पाडव्याच्या महत्त्वाचाही वेगळा उल्लेख केला होता –
सुवासिनी मी वाट पाहते घेऊन पूजा हाती,
आज उगवला दिन सोन्याचा हितगुज येई ओठी,
पतिदेवाला पूजायाला भावफुलांची दाटी,
दिवाळीत या मंगळसूत्रा शोभा येईल कंठी,
दिव्या-दिव्यांची ज्योत सांगते, तुझी न् माझी प्रीती
भाबड्या एकनिष्ठ प्रेमाचा तो काळ! असेच एक दिवाळीची खास नोंद घेणारे गाणे ‘अष्टविनायक’(१९७९) या गाजलेल्या सिनेमात होते. अनुराधा पौडवाल या गोड आवाजाच्या गायिकेने अनिल-अरुण यांच्या दिग्दर्शनात गायलेल्या मधुसूदन कालेलकरांच्या गीताचे शब्द होते –
आली माझ्या घरी ही दिवाळी,
सप्तरंगात न्हाऊन आली,
मंद चांदणे, धुंद श्वास हा, मी तर त्यात भिजावे,
जन्मजन्म रे तुझ्या संगती एकरूप मी व्हावे,
प्रीत नयनी वसे, लाज गाली हसे, कोर चंद्राची खुलते भाळी,
आली माझ्या घरी ही दिवाळी…
शिर्डी के साई बाबा (१९७७) हाही खूप गाजलेला सिनेमा! त्यात आशाताईंनी गायलेले असेच एक ‘दिवाळी गीत’ होते! गीतकार आणि संगीतकार होते पांडुरंग दीक्षित! राजेंद्रकुमार, मनोजकुमार, हेमा मालिनी, शत्रुघ्न सिन्हा, सुधीर दळवी अशा नामवंतांच्या भूमिका असलेल्या शिर्डी के साईबाबा नावाच्या त्या सिनेमातील हे सुंदर गाणे होते-
दीपावली, मनाये सुहानी दीपावली,
मेरे साई के हाथों में जादू का पानी
दीपावली मनाये सुहानी,
मेरे बाबा के हाथों में जादू का पानी,
दीपावली…
त्याकाळी हिंदी सिनेमा काहीही नुसते हवेत सोडून देत नसत. गाण्यातून द्यायचा संदेश गीतकार दीक्षितांनी अगदी स्पष्ट केला होता.
श्रद्धा के दीपक भक्ती की ज्योती,
सत्य प्रेम की जलती निशानी,
दीपावली मनाई सुहानी!
आज जेव्हा आपण सगळ्या गोष्टी विकत आणून दिवाळी साजरी करतो तेव्हा जुन्या दिवाळीची आठवण येतेच. या गाण्यांची आणि त्यात व्यक्त झालेल्या निरागस भावभावनांची आठवण येते. मनात वारंवार विचार येत राहतो, अंधारावर उजेडाच्या विजयाचा संदेश देणारा हा आगळा सण उत्साहात साजरा करताना आपण त्यांच्या मूळ आशयापासून खूप दूर तर आलेलो नाही ना?