मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईला हादरवून सोडणाऱ्या १९९३ सालच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातले गुन्हेगार सरदार शाह वली खान तसेच कुविख्यात डॉन दाऊद याचा हस्तक सलीम पटेल यांच्याकडून राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी २० लाख रूपयांच्या कवडीमोल दराने मुंबईत तब्बल तीन कोटी रूपयांची तीन एकर जमीन खरेदी केली, असा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत केला. या मंत्र्याने केलेल्या या व्यवहारासह इतर चार व्यवहारांचा तपशीलही आपल्याकडे पुराव्यांनिशी आहे आणि हे सारे पुरावे आपण योग्य अशा तपासयंत्रणांकडे चौकशीकरीता सोपविणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या पक्षाचे मंत्री काय उद्योग करतात याची माहिती होण्यासाठी तसेच त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी आपण याच कागदपत्रांचा एक संच नवाब मलिक ज्या पक्षाचे आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडेही सोपविणार आहोत, असे फडणवीस यांनी जाहीर केले.
सरदार शाह वली खान हा १९९३ सालच्या बॉम्बस्फोटातला गुन्हेगार असून त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही ही शिक्षा कायम केली असून सध्या तो तुरूंगात आहे. टायगर मेमनच्या नेतृत्त्वात तो फायरआर्म ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीत कुठे बॉम्ब ठेवायचा याची पाहणी त्याने केली होती. टायगर मेमनच्या घरी शिजलेल्या कटात तो सहभागी होता. माहिमच्याअल हुसैनी बिल्डिंगमधल्या मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स भरण्याचे काम खान याने केले होते. माफीच्या साक्षीदारांनी तसेच इतर गुन्हेगारांनी दिलेल्या प्रत्यक्षदर्शी पुराव्यांच्या आधारे त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली, असेही फडणवीस यांनी सांगितले. मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल, हा दाऊद इब्राहीमची बहीण हसीना पारकरचा सहकारी आणि फ्रंटमन म्हणून ओळखला जातो. २००७ साली तिच्यासोबतच याला पोलिसांनी पकडले होते. त्याला पुढे करून हसीना संपत्ती बळकावण्याचे काम करायची, असेही ते म्हणाले.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर तसेच आमदार आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. ही सलीम – जावेदची स्टोरी नाही तर भीषण वास्तव आहे, असे म्हणत फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला. सॉलीडस इन्व्हेस्टमेंट ही नवाब मलिक यांची कंपनी असून त्याद्वारे त्यांनी ही मालमत्ता खरेदी केली असेही ते म्हणाले.
तेव्हा मलिक मंत्री होते…
हा सौदा २००३मध्ये झाला, तेव्हा नवाब मलिक मंत्री होते. अंतिम रजिस्ट्री झाली त्याच्या काही दिवस आधी मलिक यांना पद सोडावे लागले. पण तुम्हाला माहिती नव्हते की सलीम पटेल कोण आहे? मुंबईच्या गुन्हेगारांकडून तुम्ही जमीन खरेदी का केली? मुंबईत स्फोट करणाऱ्यांकडून तुम्ही जमीन का खरेदी केली? अशा कोणत्या कारणांमुळे त्यांनी एलबीएस मार्गावरील ३ एकरची जमीन इतक्या स्वस्तात दिली. या आरोपींवर टाडा लागला होता. टाडाच्या कायद्यानुसार आरोपीची सगळी मालमत्ता सरकार जप्त करते. मग टाडाच्या आरोपींची जमीन जप्त होऊ नये, यासाठी तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का? असे प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले.