Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमीदेशमुखांच्या हॅप्पी दिवाळीनंतर अनिल परबांचा मेरी ख्रिसमस?

देशमुखांच्या हॅप्पी दिवाळीनंतर अनिल परबांचा मेरी ख्रिसमस?

मनी लाँड्रिंग प्रकरणी आमदार नितेश राणे यांचे भाकीत

मुंबई (प्रतिनिधी) : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची दिवाळी ईडीच्या कोठडीत जाणार आहे. मात्र, मनी लाँड्रिंग प्रकरणात देशमुख यांच्या पाठोपाठ परिवहन मंत्री अनिल परब यांचे नाव आहे. त्यामुळे सिंधुदुर्गचे पालकमंत्री (सांताक्लॉज) अनिल परब यांचा नाताळ कोठडीत गेला तर आश्चर्य नको. पत्रात नाव असल्याने त्यांची चौकशी व्हायलाच हवी, असे आमदार नितेश राणे यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणी देशमुख यांच्या अटकेनंतर म्हटले आहे.

नितेश राणे यांनी फेसबुकद्वारे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनी लाँड्रिंग प्रकरणाची खोली स्पष्ट केली. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अवगत केले होते, असे अनिल देशमुख आणि अनिल परब यांनी म्हटल्याचे ईडीला मिळालेल्या पत्रात नमूद आहे. आपल्या मंत्र्यांनी नेमके काय अवगत करून दिले, याची माहिती मुख्यमंत्र्यांनी ईडीच्या कार्यालयात जाऊन द्यायला हवी. त्यामुळे ईडीला केस लवकर सोडवण्यात आणखी मदत होईल, असे नितेश राणे पुढे म्हणाले.

केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय, हा आरोप खोटा आहे. आम्ही यांना १०० कोटी वसूल करण्यास सांगितले. जावयांना ड्रग्ज पुरवण्यास सांगितले होते का? आम्ही वसुली करण्यास सांगितले होते का? तुम्ही वसुली करायची. बारमालकांकडून हप्ते गोळा करायचे. मात्र, केंद्रीय यंत्रणांनी त्यावर लक्ष ठेवले की, केंद्र सरकारवर खापर फोडायचे. तुम्ही वसुली करायची आणि नाही पचली म्हणून दुसऱ्यांना दोषी धरायचे? त्यापेक्षा वसुली करायची नव्हती. पारदर्शक कारभार करायचा होता. मग आम्ही तसेच केंद्रीय यंत्रणा तुमच्या मागे लागलो नसतो. तुम्ही लुटमार सुरू केली तर कारवाई होणारच. त्यात भाजपला दोष देण्यात काय अर्थ, असे राणे म्हणाले.

परमबीर प्रकरणी आदित्यची चौकशी व्हावी

परमबीर हे देश सोडून पळाले आणि सध्या बेल्जियममध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, ते महाराष्ट्र सोडून कसे गेले याचे उत्तर आधी दिले गेले पाहिजे. परमबीर सिंह कुणाचे लाडके? सुशांत सिंग आत्महत्या प्रकरण, दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी तुम्हाला ते हवे होते. तुमची घाण साफ करायला त्यांची गरज भासली. परमबीर हे पोलीस आयुक्त असताना सर्वात जास्त वेळा आदित्य हे सीपी कार्यालयात जात होते. त्यामुळे त्यांना परमबीर यांच्याबद्दल माहिती नाही, हे कसे शक्य आहे?


पर्यावरण मंत्र्यांना ड्रग्ज पार्ट्यांबद्दल माहिती

फोर सीझन्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्ट्यांबद्दल सर्व माहिती पर्यावरण मंत्र्यांना आहे, असा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला आहे. त्यांच्याकडून अधिक माहिती घ्यावी, असा सल्ला त्यांनी नवाब मलिकांना दिला आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतील फोर सिझन हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्ट्या होत असल्याचा संशय व्यक्त केला होता. त्यावर भाजपचे नेते, आमदार राणे यांनी मलिकांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -