Wednesday, April 23, 2025
Homeक्रीडाक्रिकेटपटू क्विंटन डी कॉकचा अखेर माफीनामा!

क्रिकेटपटू क्विंटन डी कॉकचा अखेर माफीनामा!

‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ मोहिमेला पाठिंबा

शारजा (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याच्या वेळी केलेल्या कृत्याबद्दल दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाचा सलामीवर आणि यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने माफी मागितली आहे. वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या वर्णद्वेषविरोधी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी सर्व खेळाडू गुडघ्यावर टेकून बसले होते. पण तसे करण्यास क्विंटन डी कॉकने नकार दिला होता. त्याने सामना सुरू होण्याआधी अंतिम ११ जणांच्या यादीतून आपले नाव देखील त्याने मागे घेतले होते. पण आता आपण केलेल्या कृतीची लाज वाटत असून त्याने सहकारी खेळाडूंसह क्रिकेट चाहत्यांची माफी मागितली आहे. या चांगल्या मोहिमेसाठी यापुढे तो गुडघा टेकवून या मोहिमेला पाठिंबा देणार असल्याचे त्याने सांगितले आहे.

‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने प्रत्येक सामन्यापूर्वी सर्व खेळाडूंना गुडघे टेकावे लागतील, अशा सूचना दिल्या होत्या. पण क्विंटनने तसे करण्यास नकार दिला आणि सामन्यातून माघार घेतली होती. पण आता त्याने याबाबत माफी मागत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी माझ्या सहकारी खेळाडूंची आणि सर्व चाहत्यांची माफी मागतो. मला याला कधीच मोठा मुद्दा बनवायचा नव्हता. मला वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठवण्याचे महत्त्व चांगलेच माहीत आहे. एक खेळाडू म्हणून आमच्यावर मोठी जबाबदारी आहे. पुढील सामन्यात गुडघ्यावर टेकून बसण्यास कोणतीही हरकत नसल्याचे त्याने म्हटले आहे. खेळाडूंनी गुडघे टेकल्याने जागरुकता पसरत असेल आणि कृष्णवर्णीयांचे आयुष्य अधिक चांगले होत असेल, तर त्याचा मला आनंदच होईल, असेही त्याने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -