मुंबई (विशेष प्रतिनिधी) : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे पीक पेरणीक्षेत्र आणि शेतकऱ्यांच्या राहणीमानात सुधारणा झाली असल्याचे जलसंधारण विभागाच्या अहवालात म्हटले आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले असल्याचेही यात नमूद करण्यात आल्याचे कळते.
राज्याच्या जलसंधारण विभागाने १७६२८४ पैकी ५८ हजार कामांच्या मूल्यमापनानंतर तयार केलेल्या अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या योजनेवर महालेखाकारांच्या अहवालातील आक्षेपांवर उत्तर देताना जलसंधारण विभागाने हे म्हटले असल्याचे सूत्रांनी सांगितले. जलयुक्त शिवार योजनेबाबत केलेल्या आक्षेपांमध्ये हे अभियान योग्य पद्धतीने चालविले गेले नाही. त्यात तांत्रिक माहितीचा अभाव होता. त्यामुळे भूजलपातळी फारशी वाढली गेली नाही, अशा अनेक बाबींचा समावेश होता. जलयुक्त शिवार योजनेमुळे राज्यातील भूजलपातळी वाढली आहे. पाण्याचा उपसा वाढला आहे. अनेक गावांमध्ये भूजलपातळी स्थिरावली आहे.
‘चुकीच्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे’
जलयुक्त शिवार योजनेतील कामांबाबत क्लीनचचिट देण्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जलयुक्त शिवार योजनेमध्ये काही तक्रारी नक्कीच असू शकतात. मी न्यायालयात एक अहवाल दिला होता. त्यानुसारच हा अहवाल आला असावा. ६०० वेगवेगळ्या तक्रारी होत्या. त्याबाबत चौकशी होईल, असे मी स्वतः म्हटले होते. चुकीच्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे.