वसई (विशेष प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुढाकाराने आता लवकरच वसई-सावंतवाडी रेल्वे सुरू होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. भारतीय जनता पार्टी वसई-विरार जिल्हा उपाध्यक्ष विश्वास सावंत यांच्या पाठपुराव्याला खऱ्या अर्थाने यश येणार आहे. विश्वास सावंत यांनी माजी खासदार निलेश राणे यांना वसई-सावंतवाडी रेल्वे सुरू करण्याचे निवेदन दिले होते.
याबाबत दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन वसई-सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासंदर्भात सांगितले. त्यानुसार रावसाहेब दानवे यांनी नारायण राणे व निलेश राणे यांना आश्वासन दिले असून लवकरच वसई-सावंतवाडी रेल्वे सुरू होणार आहे.
वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात कोकणातील लोक राहत असून त्यांच्या सोयीसाठी वसई-सावंतवाडी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे विश्वास सावंत यांनी एका निवेदनानुसार केली होती.
विश्वास सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्याला आता यश येणार आहे. मुंबईतील घरांच्या किमती वाढल्यामुळे कोकणी माणूस मोठ्या प्रमाणात वसई, विरार, नालासोपारा या भागात राहण्यासाठी आला आहे. त्यांना कोकणात जाण्यासाठी दादर किंवा दिव्याला जावे लागत आहे. गुजरातमधून येणाऱ्या काही गाड्या आहेत. मात्र त्यांची आरक्षणे मिळत नाहीत. तेव्हा आपण माजी खासदार आहात, एखादी रेल्वे तेथील गरजू लोकांसाठी सोडायची असेल तर प्रयत्न केले पाहिजेत, हे आपणास माहीत आहे, असे विश्वास सावंत यांनी निलेश राणे यांना भेटून सांगितले. त्यानुसार निलेश राणे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे वसई-सावंतवाडी रेल्वे सुरू करण्याबाबतची विनंती केली.