मुंबई (प्रतिनिधी) : ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. समीर वानखेडे यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा देण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सातत्याने पत्रकार परिषदा घेऊन नवनवे आरोप केले आहेत. वानखेडे यांनी २ ऑक्टोबरला मुंबईत कॉर्डेलिया क्रूजवर केलेल्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाच्या मुद्द्यावरून आरोप होत आहेत. त्यांचे पहिले लग्न एका मुस्लीम महिलेशी झाले होते. मात्र, त्यावेळी समीर वानखेडे हे मुस्लीमच होते, असा दावा त्यांचे लग्न लावणाऱ्या काझींनी केला आहे. वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मात्र आपण हिंदूच असल्याचे सांगितले आहे.
‘त्या’पत्रावर कारवाई नाही…
दरम्यान, नवाब मलिक यांनी एनसीबीकडे पाठवलेल्या पत्रावर विभागाकडून कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मलिक यांच्याकडे आलेल्या एका निनावी पत्रामध्ये समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्यात आले होते.
आर्यन तुरुंगातच, जामिनावर आज निर्णय
आर्यन खानच्या जामिनावर सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा पुढची तारीख दिली. त्यामुळे आर्यनसह इतर आरोपींना रात्रही तुरुंगातच काढावी लागली. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमून धामेचा यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणीत एनसीबीवर प्रश्नांचा भडीमार झाला. अरबाज मर्चंटची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी हे प्रकरण कोणत्याही षडयंत्राचे नसून व्यक्तिगत सेवनाच्या आरोपांचे आहे, असे म्हटले. अटकेच्या मेमोत देखील तसेच म्हटल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच जर ड्रग्ज सेवन झाले होते, तर मग आरोपींची वैद्यकीय चाचणी का करण्यात आली नाही? असा प्रश्न देसाई यांनी एनसीबीला विचारला आहे.
कोऱ्या कागदावर सहीचा आरोप
आर्यन प्रकरणात खंडणी मागितल्याचा आरोप एक पंच प्रभाकर साईल यांनी केल्यानंतर आता आणखी एका प्रकरणातील पंच पुढे आला आहे. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दहा कोऱ्या कागदांवर माझ्या सह्या घेतल्याचा आरोप या व्यक्तीनं केला आहे. शेखर कांबळे असे या पंचाचे नाव असून तो नवी मुंबईत राहतो. खारघर येथील एका प्रकरणात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्याला पंच बनवलेले आहे. नायजेरियन नागरिकांवर झालेल्या कारवाईचे हे प्रकरण आहे.
मी दलित हिंदू आहे, मग मुलगा मुस्लीम कसा?…
वानखेडे यांच्या वडिलांनी लग्नाबाबत मुलावर होत असलेल्या आरोपांबाबत उघडपणे भाष्य केले आहे. नवाब मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना त्यांनी, मी दलित आहे, माझे आजोबा, पणजोबा सर्व हिंदू आहेत, मग मुलगा मुस्लीम कसा झाला? असा सवाल त्यांनी केला आहे. मलिक यांनी वानखेडेंवर केलेल्या आरोपांनंतर त्यांच्या वडिलांनी समोर येऊन याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मी जन्मजात हिंदू असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे.
ड्रग्जमाफियाशी वानखेडेंचे संबंध : मलिक
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्याचा सपाटाच लावला आहे. समीर वानखेडे यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग्जमाफियाशी संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत मलिक यांनी वानखेडे, के. पी. गोसावी, प्रभाकर साईल आणि वानखेडेंच्या चालकाच्या सीडीआर तपासणीची मागणी केली आहे. इलेक्ट्रॉनिक तपास झाल्यास काही शंका राहणार नाही, असे मलिक यांचे मत आहे. मुंबईत झालेल्या क्रूझ पार्टीमध्ये एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आपल्या बंदुकधारी प्रेयसीसह सहभागी असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. मलिक म्हणाले, ‘ही ड्रग पार्टी फॅशन टीव्हीने आयोजित केली होती.