दुबई (वृत्तसंस्था) : संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) सुरू असलेल्या टी-ट्वेन्टी वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीतील (ग्रुप १) महत्त्वपूर्ण लढतीत गुरुवारी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका आमनेसामने आहेत. विजयी सलामीनंतर दोन्ही संघ सातत्य राखण्यास उत्सुक आहे.
मागील पाच टी-ट्वेन्टी सामन्यांत कांगारूंनी लंकेवर ४-१ अशी मोठी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचे चारही विजय सलग आहेत. त्यात २०१९मधील मायदेशातील तीन सामन्यांच्या मालिकेचा समावेश आहे. आमनेसामनेमध्ये ऑस्ट्रेलियाकडे आघाडी असली तरी इतिहासाच्या आधारे सामन्याचा निकाल ठरवता येत नाही. यूएईत सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघांनी आश्वासक सुरुवात केली आहे. अबुधाबीमध्ये झालेल्या लो-स्कोअरिंग सलामी लढत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेवर ५ विकेटनी मात केली. त्यामुळे गुरुवारच्या सामन्यात चुरशीची लढत अपेक्षित आहे.
पहिल्या सामन्यात कांगारूंचे गोलंदाज मॅचविनर ठरले. फलंदाजीत मात्र, सुधारणा आवश्यक आहेत. १२० धावा करण्यासाठी ५ विकेट गमवाव्या लागल्या. आघाडी फळीला सूर गवसलेला नाही. कर्णधार आरोन फिंचला खातेही उघडता आलेले नाही. फटकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नरसह मिचेल मार्श तसेच अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने निराशा केली. अनुभवी स्टीव्हन स्मिथसह मार्कस स्टॉइनिसने फलंदाजीची धुरा सांभाळली तरी विजयासाठी शेवटच्या षटकाची वाट पाहावी लागली. श्रीलंकेची गोलंदाजी तितकी प्रभावी नसली तरी सातत्य राखायचे असेल तर कांगारूंच्या प्रमुख फलंदाजांना खेळ उंचवावा लागेल. फलंदाजी अपेक्षित होत नसल्याने सलग दुसऱ्या सामन्यात मिचेल स्टार्क, जोश हॅझ्लेवुड, पॅट कमिन्स या वेगवान माऱ्यासमोर लेगस्पिनर अॅडम झम्पा तसेच अष्टपैलू मॅक्सवेलवर त्यांची भिस्त असेल.
श्रीलंकेनेही विजयी प्रारंभ करताना बांगलादेशचा ५ विकेटनी पराभव केला. त्यांच्या विजयात चरिथ असलंका आणि भानुका राजपक्ष चमकले. तरीही फलंदाजीत आलबेल नाही. मैदानावर उतरलेल्या सात फलंदाजांपैकी असलंका आणि राजपक्ष यांच्यानंतर केवळ प्रथुम निसंकाला दोन आकडी धावा करता आल्या. अन्य बॅटर सुपरफ्लॉप ठरले. कुशल परेरासह अविष्का फर्नांडो, वहिंदु हसरंगा, कर्णधार दसुन शानकाला खेळपट्टीवर थांबता आले नाही. ऑस्ट्रेलियाची नियंत्रित गोलंदाजी पाहता सर्व प्रमुख फलंदाजांना आपापली जबाबदारी चोख पार पाडावी लागेल. विजयी सुरुवातीनंतरही श्रीलंकेच्या गोलंदाजीमध्ये खूप सुधारणा आवश्यक आहे. बांगलादेशविरुद्ध कर्णधार शानकाला २० ओव्हर्ससाठी ७ गोलंदाज वापरावे लागले. केवळ दुशमंत चमीरा आणि लहिरू कुमाराला चार ओव्हर्सचा कोटा पूर्ण करता आला.
सुरुवातीच्या सामन्यांचा निकाल पाहता सुपर १२ फेरीत ग्रुप १मध्ये श्रीलंकेसह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि द. आफ्रिकेमध्ये अव्वल दोन संघांत स्थान मिळवण्यासाठी चुरस आहे.