Thursday, April 24, 2025
Homeताज्या घडामोडीजिल्ह्यात कुपोषण व बालमृत्यूंमध्ये वाढ

जिल्ह्यात कुपोषण व बालमृत्यूंमध्ये वाढ

जव्हार तालुक्यात वेगवेगळ्या कारणांनी दोन गर्भवतींचा मृत्यू

पारस सहाणे

जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात कुपोषण त्यात बालमृत्यू आणि मातामृत्यूंचे प्रमाण अधिकच आहे. आता पुन्हा एकदा जव्हार तालुक्यात वेगवेगळ्या कारणांनी झालेल्या दोन गर्भवतींच्या मृत्यूने जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा गलथान आणि बेजबाबदार कारभार पुन्हा चर्चेचा आणि जिल्हावासीयांच्या संतापाचा विषय बनला आहे.

या भागातील कुपोषण, माता व बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक योजना राबवल्या जातात. तथापि, असे असूनही जव्हार तालुक्यात दोन गर्भवती महिलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. एका प्रकारात बाळाचा त्याच्या आईच्या पोटात मृत्यू झाल्यानंतर या मातेला वाचवण्याच्या प्रयत्नांना डॉक्टरांना अपयश आले, तर दुसरी गरोदर माता विषारी सापाच्या सर्पदंशाने मृत्यू पावली आहे. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यातील एकूण आरोग्य विभागचा कारभार किती भोंगळ आणि बेजबाबदार पद्धतीने सुरू आहे, याची चर्चा जिल्हावासीय करत आहेत.

दोन घटनांपैकी एका घटनेत, जव्हार तालुक्यातील कायरी येथील रेखा पोटिंदा (२६) या महिलेच्या पोटात बाळाच्या हालचाली थांबल्याचे निदर्शनास आल्यानंतर तिला प्रथम साखरशेत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर या महिलेला जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवून नंतर तातडीने नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी डॉक्टरांनी प्रयत्न केल्यानंतरही गर्भवती महिलेच्या पोटातील बाळ मृत पावल्याचे आढळून आले. तसेच मध्यरात्रीच्या सुमारास या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. या महिलेला अॅनिमिया (रक्तातील हिमोग्लोबिन कमी असण्याचा) आजार होता. तसेच, प्रसूतीपूर्वी रक्तस्राव झाल्यानेही महिलेची प्रकृती गंभीर बनल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तद्नंतर या महिलेचा व बालकाचा मृतदेह मूळगावी आणण्यासाठी रुग्णवाहिका किंवा वाहन मिळत नसल्याने समस्या निर्माण झाली होती. अखेर खासगी शववाहिनीतून मृतदेह मूळगावी आणण्यात आला. याप्रकरणी स्थानिक रुग्णकल्याण निधीमधून वाहनाचे भाडे अदा करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दुसऱ्या एका प्रकरणात पिंपळशेत (पागीपाडा) येथील २१ वर्षीय माया सुरेश चौधरी या गरोदर महिलेला विषारी साप चावला होता. तिच्यावर वेळीच उपचार होऊ न शकल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.

दोन्ही प्रकरणांचा तपास होणार

या दोन्ही गर्भवतींचे मत्यू जव्हार तालुक्यात झाले असून गरोदर महिलांच्या मृत्यूने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास करून याबाबत अहवाल सादर करण्यात येईल, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -