सिंगल किंवा परतीच्या तिकिटाची सुविधा नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी
मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारने मुंबई आणि उपनगरांतून प्रवास करणाऱ्या लोकल प्रवाशांसाठी नवे परिपत्रक काढले आहे. त्यानुसार लोकल प्रवाशांना ३ महिने, ६ महिने किंवा वर्षभरासाठी लोकलचा पास दिला जाणार आहे. मात्र सिंगल किंवा परतीच्या तिकिटाची सुविधा अजूनही सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
लॉकडाऊननंतर लोकल सुरू झाली आणि सरकारने केवळ अत्यावश्यक सेवांतील लोकांनाच लोकल प्रवासाची परवानगी दिली होती. लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी फक्त एक महिन्याचा पास दिला जात होता. नंतर हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यानुसार राज्य सरकारकडून ऑगस्ट महिन्यापासून सर्वसामान्य लोकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली.
लसीचे दोन्ही डोस झाल्यावर, १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना युनिवर्सल पास दिला जात होता. त्या आधारे लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी लोकलचा पास दिला जात होता. मात्र आता लसीकरणाचा वेग वाढल्यामुळे लोकल प्रवाशांची संख्याही वाढली आहे. हे पाहता राज्य सरकारने नवीन पत्रक काढले असून यानुसार ३ महिने, ६ महिने आणि वर्षभरासाठी लोकल पास देण्याची मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्यांनाही सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच लसीकरणाचे नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवांतील लोकांनाही लसीकरणाचे दोन डोस झाले असतील तरच युनिवर्सल पास उपलब्ध होणार आहेत व लोकलचा पास काढता येणार आहे. मात्र नागरिकांची लोकल तिकीट देण्याची मागणी अद्यापही राज्य सरकारने मान्य केलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
राज्यातील लसीकरण मोहिमेचा वेग वाढला असल्यामुळे आता लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. म्हणूनच मुंबई आणि परिसरात मध्य आणि पश्चिम रेल्वेने २८ तारखेपासून पूर्ण क्षमतेने लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.