समीर वानखेडे यांच्या बचावासाठी पत्नी क्रांती रेडकर पुढे सरसावली
मुंबई (प्रतिनिधी) : आर्यन खान, मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी, भ्रष्टाचार, जात प्रमाणपत्र, जन्माचा दाखला…, अशा प्रकरणांवरून झालेल्या आरोपांमुळे ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे हे चांगलेच चर्चेत आले आहेत. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मात्र, आता समीर वानखेडे यांच्या बचावासाठी त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर पुढे सरसावली आहे. क्रांती रेडकर हिने मंगळवारी पत्रकार परिषद घेत मंत्री मलिक यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी तिने या सर्व आरोपांबद्दल तीव्र संतापही व्यक्त केला आहे.
‘माझा नवरा खोटारडा नाही. रोज काय स्पष्टीकरण द्यायचे? खोटे आरोप आणि ट्विटरबाजी करून काही होणार नाही. आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावेत’, असे आव्हान अभिनेत्री क्रांती हिने दिले आहे. ‘हे सर्व आरोप कोर्टात केलेले नाहीत. ट्विटर हे कोर्ट आहे का? माझा नवरा खोटारडा नाही. रोज काय स्पष्टीकरण द्यायचे? असे सवाल क्रांतीने उपस्थित केले आहेत. त्यांचे (नवाब मलिक) सर्व दावे खोटे आहेत. त्यांच्याकडे असे काही पुरावे असतील, तर ते न्यायालयात सादर करतील व नंतरच त्यावर न्याय होईल. ट्विटरवर कोणीही काहीही लिहू शकतो. जे खरे ठरणार नाही. मी आणि माझा नवरा समीर जन्मतः हिंदू आहोत’, अशा शब्दांत क्रांती रेडकरने नवाब मलिकांना प्रत्युत्तर दिले आहे. मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर फोन टॅप केल्याच्या आरोप केला असून क्रांतीने त्याचे खंडन केले. क्रांती रेडकरने आज पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी तिने समीर वानखेडेंवरील सर्व आरोप फेटाळून लावले. आम्हाला मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत, असाही दावा तिने केला.
समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम अशी चर्चा सुरू असताना समीर यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी ट्विटरवर ‘आपण व समीर दोघेही हिंदू असल्याचा खुलासा केला.
किरण गोसावी लखनऊमधूनही पळाला
लखनऊ : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक प्रकरणी एकीकडे सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे फरार असलेला पंच किरण गोसावी पसार झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला किरण गोसावी हा उत्तर प्रदेशमधील लखनऊ येथे लपून बसला होता. त्याने स्वत: पोलिसांना शरण येणार असे जाहीरही केले. पण, पुणे पोलीस लखनऊला पोहोचण्याआधीच तो तिथूनही पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला पंच किरण गोसावीचा मोठ्या मुश्किलीने त्याचा ठावठिकाणा लागला होता. सोमवारी रात्री तो पोलिसांना शरण येणार होता. लखनऊ येथील मंडियांव पोलीस आयुक्तालयात तो हजर होणार होता. पण सोमवारी रात्री उशिरापर्यंत तो आलाच नाही. पुणे पोलिसांचे पथक पोहोचण्याआधीच गोसावी तिथून पळून गेल्याचे समोर आले.
वानखेडेंची दिल्लीत झाली चौकशी
नवी दिल्ली : मुंबईतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची दिल्लीतील एनसीबीच्या मुख्यालयात जवळपास २ तास चौकशी झाली. दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या चौकशीनंतर समीर वानखेडे हे एनसीबीच्या मुख्यालयातून बाहेर पडले. आर्यन खानच्या सुटकेसाठी समीर वानखेडे यांना ८ कोटी देण्यात येणार होते, अशा आरोप या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने केला आहे. या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी समीर वानखेडे यांची ही चौकशी करण्यात आली आहे.
मलिकांचे एनसीबी महासंचालकांना पत्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘एनसीबी’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आणखी काही आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी मंगळवारी एका अज्ञात एनसीबी अधिकाऱ्याने पत्र पाठवल्याचे सांगून त्यातील माहिती समोर आणणार असल्याचे सांगितले होते. हे निनावी पत्र मलिक यांनी एनसीबीच्या महासंचालकांना पाठवले आहे. एनसीबीकडून सुरू असलेल्या तपासाबाबत या पत्रात माहिती आहे. त्यामुळे आपण याबाबत योग्य ती कारवाई करावी, असे मलिक यांनी म्हटले आहे.वानखेडे आणि एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे खोट्या केसेस टाकून लोकांना अडकवले जात असल्याचा आरोप केला आहे.