मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईमध्ये डिसेंबर महिन्यात रुग्ण वाढण्याची शक्यता असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी पालिकेने लसीकरण मोहीम वेगाने सुरू केली. इतकेच नाही, तर लसीकरणासंदर्भात जनजागृती व्हावी म्हणून १०० टक्के लसीकरण झालेल्या सोसायट्यांवर पोस्टर लावली जात आहेत. मुंबईतील सुमारे १० हजार सोसायट्यांनी १०० टक्के लसीकरण पूर्ण केल्याची माहिती काकाणी यांनी दिली.
कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात केल्यानंतर मुंबईमधील ९७ टक्के नागरिकांना लसीचा पहिला, तर ५८ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. नागरिकांनी लसीकरण करावे म्हणून ज्या सोसायट्यांतील १०० टक्के रहिवाशांनी लस घेतली आहे, अशा सोसायट्यांवर पालिकेकडून पोस्टर लावले जात आहेत. यात एकूण ३७ हजार सोसायट्या असून त्यापैकी २२ हजार सोसायट्या नोंदणीकृत आहेत. त्यापैकी १० हजार सोसायटींमधील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण झाले आहे.
दरम्यान मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार कमी झाल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले होते, तर नुकतेच गणेशोत्सव, नवरात्री सण देखील साजरे झाले आहेत. यादरम्यान रुग्णसंख्या वाढलेली नाही. रोज ३०० ते ४००च्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत.
त्यामुळे रुग्णसंख्या वाढलेली नसली तरी मात्र येत्या काही दिवसांत दिवाळी, तुळशीचे लग्न, ख्रिसमस आदी सण साजरे केले जाणार आहेत. यावेळी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे डिसेंबरदरम्यान रुग्णसंख्या वाढू शकते अशी शक्यता काकाणी यांनी व्यक्त केली आहे.