Friday, May 17, 2024
Homeताज्या घडामोडीDog bite : पेणमध्ये एका दिवसात ४८ जणांचा कुत्र्याने घेतला चावा

Dog bite : पेणमध्ये एका दिवसात ४८ जणांचा कुत्र्याने घेतला चावा

जानेवारी महिन्यात तब्बल ३२९ रुग्ण दाखल; अँटी रेबीज सिरम नसल्याने रुग्णांमध्ये संताप

पेण : पेण तालुक्यात श्वान जोमात तर प्रशासन कोमात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरासह तालुक्यात दिवसेंदिवस कुत्र्यांचा सुळसुळाट वाढतच चालला आहे. आज एकाच दिवसात ४८ जणांना श्वानाने चावा घेतल्याची घटना पेण तालुक्यात घडली आहे. एका जानेवारी महिन्यात तब्बल ३२९ जणांना कुत्रा चावल्याच्या घटनेची अधिकृत नोंद पेण उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली आहे. मात्र उपजिल्हा रुग्णालयात अँटी रेबीज सिरम उपलब्ध नसल्याने रुग्णांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

पेणमध्ये ठिकठिकाणी असणारी दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य, अनेक ठिकाणी पडलेली खराब झालेली मांस, मच्छी आणि डम्पिंग ग्राउंड या ठिकाणी बऱ्याच कुत्र्यांची झुंडच्या झुंड पहावयास मिळत असते. या कुत्र्यांना या ठिकाणी पडलेले कुजके अन्न खाण्याची सवय लागल्याने कोणत्याही क्षणी वाट्टेल तेव्हा शिवशिवलेल्या दातांनी लचके तोडण्याची सवय या कुत्र्यांना लगेलेली आहे. पेणमध्ये बऱ्याच ठिकाणी असणाऱ्या वर्दळीच्या जागेत वावरत असणाऱ्या नागरिकांसह लहान मुलांना एकाच वेळी किमान चार ते पाच कुत्रे अंगावर येऊन चावे घेत असल्याचे प्रकार पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात घडत आहेत. पेण तालुक्यातील शहरी भागासह विविध ठिकाणच्या ग्रामीण भागातील तब्बल ४८ जणांना एकाच दिवसात श्वान दंश झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे यामध्ये लहान मुलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

पेण उपजिल्हा रुग्णालयात अँटी रेबीज व्हॅक्सिन जरी उपलब्ध असले तरी अँटी रेबीज सिरम उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांची गैरसोय होउन त्यांना अलिबाग किंवा कामोठे एमजीएम हॉस्पिटल येथे उपचारासाठी पळापळ करावी लागत आहे.

पेण तालुक्यात श्वानदंश हा प्रकार नवीन नसुन दरवर्षी असंख्य श्वानदंशाच्या शेकडो रुग्णांची नोंद होत असते. एका जानेवारी २०२४ महिन्यात पेण उपजिल्हा रुग्णालयात ३२९ रुग्णांची अधिकृत नोंद झाली असुन त्यांना ६५७ डोस घ्यावे लागले आहेत. त्यावरून तालुक्यातील श्वान दंशाची दहकता लक्षात घेता येईल.

अँटी रेबीज सिरम साठी वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार सुरू- संध्यादेवी राजपूत

या प्रकाराबाबत आम्ही पेण पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार करणार असून या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणार आहोत. तर अँटी रेबीज सिरम उपलब्ध नसल्याबाबत त्याची उपलब्धता करून देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आले आहे.
-संध्यादेवी राजपूत, वैद्यकीय अधिक्षक – पेण उपजिल्हा रुग्णालय

येत्या आठवडाभरातच निर्बीजीकरणाला प्रारंभ करणार- जीवन पाटील

कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची वर्क ऑर्डर काढण्यात आली असून तीन वर्षाच्या कार्यकाळात हे कामकाज चालणार आहे. या कामकाजाला पुढील आठवडाभरात प्रारंभ करण्यात येणार असुन यामध्ये सदर ठेकेदार विविध प्रकारचे साहित्य आणून त्यांना लस देणार आहेत. याशिवाय ज्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले आहे, त्यांची ओळख म्हणून गळ्यामध्ये विशिष्ठ प्रकाराचा पट्टा अडकाविण्यात येणार आहे.
-जीवन पाटील, मुख्याधिकारी, पेण नगरपालिका

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -