Sunday, May 19, 2024
Homeताज्या घडामोडीपश्चिम विदर्भात महिनाभरात वीज पडून २२ जणांचा मृत्यू; हजारांहून अधिक घरांची पडझड

पश्चिम विदर्भात महिनाभरात वीज पडून २२ जणांचा मृत्यू; हजारांहून अधिक घरांची पडझड

अमरावती (हिं.स.) : पश्चिम विदर्भात यंदाच्या पावसाळ्यात अंगावर वीज पडल्याने २२ व पुरात वाहून गेल्याने दोन अशा एकूण २४ जणांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय आपत्तीमध्ये लहान-मोठी ११४ जनावरे मृत्यूमुखी पडलेली आहे. ४२ गोठे व १४०८ घरांची पडझड झालेली आहे. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे काठालगतची १,१४९ हेक्टर शेतजमीन खरडली गेली, तर १७,९३५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झालेले आहे.

विभागात आतापर्यंत पावसाची २३२.६ मिमी सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २४५.५ मिमी पाऊस झालेला आहे. ही १०५.५ टक्के सरासरी आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यात २३६.८ मिमी, यवतमाळ २९५.३ मिमी, अकोला २१०.६ मिमी, बुलडाणा २१७.१ मिमी व वाशिम जिल्ह्यात २३८.६ मिमी पावसाची नोंद झालेली आहे. ५ जुलैपासून पावसाची रिपरिप सुरू झाली. ती अजूनही सुरूच आहे. यादरम्यान अंगावर वीज पडल्याने अमरावती जिल्ह्यात सहा, अकोला जिल्ह्यात दोन, यवतमाळ जिल्ह्यात आठ, बुलडाणा जिल्ह्यात दोन व वाशिम जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला. तर अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एक व्यक्ती पुरात वाहून गेलेली आहे. यापैकी १८ प्रकरणांमध्ये प्रत्येकी चार लाखांची मदत जिल्हा प्रशासनाद्वारे देण्यात आलेली आहे. बाकी प्रकरणे प्रलंबित आहेत.

१११ गावांमधील ८०४ कुटुंब बाधित

अतिवृष्टीमुळे विभागात अमरावती जिल्ह्यातील १११ गावे व ८०४ कुटुंब बाधित झाली. याची २,५५८ नागरिकांना झळ पोहोचली आहे. ४७५ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. आपत्तीमध्ये १४ व्यक्ती जखमी झाल्या. याशिवाय दुधाळ ३५, लहान ४८, ओढकाम करणारी ३१ जनावरे मृत झालेली आहेत.

१,४०८ घरांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे ३० घरांची पूर्णत: पडझड, १३९ घरांची अंशत:, १,२३९ कच्च्या घरांची पडझड झालेली आहे. याशिवाय ४२ गोठ्यांची देखील पडझड झालेली आहे. या नुकसानीसाठी जिल्हा प्रशासनाद्वारे अद्याप सानुग्रह अनुदान देण्यात आलेले नाही. आपत्तीमुळे अमरावती जिल्ह्यात २.५० लाखांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -