Saturday, August 29, 2026

अनोळखी नात्याची राखी

अनोळखी नात्याची राखी

माधवी मसुरकर

आजकाल वर्तमानपत्र, टीव्ही आणि अनेक सोशल मीडियामधून ट्रेनमधील गुन्हेगारीच्या घटना सतत वाचायला मिळत असतात. त्यात विशेषतः तरुण मुलींची छेडछाड, त्यांच्यावर अॅसिड फेकणे, लैंगिक अत्याचार किंवा विनयभंग अशा घटना जास्त दिसतात आणि या डोळ्यांसमोर घडणाऱ्या गुन्ह्यांकडे उघड्या डोळ्यांनी दुर्लक्ष करणारे प्रवासी दिसतात तेव्हा मन सुन्न होते. “मला काय करायचंय?” ही स्वार्थी वृत्ती समाजात इतकी भिनली आहे की, मदतीसाठी हात पुढे येतच नाहीत. अशा वेळी मला चाळीस वर्षांपूर्वीची ती घडलेली घटना... ती रात्र आठवते.… एक साधा थंड डोक्याने घेतलेला निर्णय एका निष्पाप मुलीचे आयुष्य कसे सुरक्षित करू शकतो हे सांगणारी ती घटना!

रात्रीचे नऊ वाजले होते. रात्र पावसाची होती. मी आणि माझे दोन भाऊ आम्ही करी रोड स्टेशनला ट्रेनमध्ये चढलो. तेव्हा रात्री ९ वाजता ट्रेनमध्ये विशेष गर्दी नसायची आणि त्यादिवशी अविश्रांत पाऊस कोसळत होता त्यामुळे असेल कदाचित पण डब्यात विशेष गर्दी नव्हती. त्यामुळे एक भयानक सुनसानपणा डब्यात होता. दादर स्टेशन आले आणि एक २०/२२ वर्षांची मुलगी घाबरत धडपडत आमच्या डब्यात चढली. डबा तसा खालीच होता तरीपण ती माझ्या शेजारी चिकटून येऊन बसली. खरं तर मला ते आवडलं नव्हतं. मी सहज तिच्याकडे नजर टाकली, तर एवढी पावसाळी थंड हवा असून सुद्धा तिला दरदरून घाम फुटला होता. आणि ती अधिकाधिक माझ्याकडे सरकत होती. मला ते शेवटी सहन झाले नाही. मग विचार केला आपणच दुसरीकडे बसूया. म्हणून मी तिथून उठून उभी राहिली, तर तिने चक्क माझा हात खेचून मला खाली बसवले. आता मात्र माझा संयम सुटला. मी तिला रागातच विचारले, “ एवढा डबा खाली आहे आणि तुम्ही इथेच मला काय चिकटून बसताय. तुम्ही तरी उठा नाहीतर मला तरी जाऊ द्या. ही काय जबरदस्ती आहे.” तेव्हा तिचे ओठ थरथरले. तिच्या चेहऱ्यावरची भीती आता मला स्पष्ट दिसत होती. म्हणाली, “ताई तुमच्या डाव्या हाताला समोरच्या सीटवर दोघे बसले आहेत ते गुंड आहेत. मी ऑफिसमधून सुटल्यावर दादर स्टेशनला येत असताना ते माझा पाठलाग करत आहेत हे माझ्या लक्षात आलं. मी ट्रेन पकडली, तर ते दोघं याच डब्यात चढले आहेत. मला खूप भीती वाटतेय. तुम्ही मला सोडून जाऊ नका.”

मी समोर पाहिले तर खरंच तिथे दोन तरुण बसले होते आणि ते त्या मुलीकडेच रोखून पाहत होते. ट्रेन धावत होती. ट्रेनचा खडखडाट आणि मुसळधार पावसाचा आवाज डब्यातल्या भयावह शांततेत अधिकच भर घालत होता. त्या गुंडांची मस्तीही वाढत होती. ते तिला पाहून इशारे करत होते. त्यांच्या नजरेत वासना आणि दुष्टपणा ठासून भरलेला होता. ते तिला पाहत होते आणि एकमेकांकडे बघून हसत होते…. काहीतरी कुजबुजत होते. त्यांच्या नजरा आणि हालचाली संशयास्पद होत्या. आता मलाही घाम फुटू लागला होता. ती मुलगी पुढे बोलली, “ताई मला कांजूरमार्ग स्टेशनवर उतरायचं आहे. पण माझी हिंमत नाहीय उतरायची. मला माझ्या घरी जाण्यासाठी रेल्वे रूळ क्रॉस करून जावं लागत आणि घर खूप निर्जन ठिकाणी आहे. (तेव्हा कांजूर पूर्वेला जाण्यासाठी ब्रीज नव्हता. रूळ ओलांडूनच जावे लागत असे.) ही मवाली मुलं माझ्या मागे उतरतील आणि पुन्हा माझा पाठलाग करतील. मग काय होईल माझं या कल्पनेनेच माझा जीव घाबरतोय ताई. मी काय करू.” क्षणभर मला पण काही सुचेना... माझीही बोलती बंद होण्याची वेळ आली होती. तरीही उसने अवसान आणून तिच्या खांद्यावर हात टाकून तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणाले, “ काहीही काळजी करू नकोस. मी आहे ना. बघू आपण काय करायचे ते.” मी तिच्या हातात पाण्याची बाटली देत म्हटलं, “पाणी पिऊन घे आणि शांत राहा. ” मी माझ्यासोबत असलेल्या माझ्या दोन्ही भावांना त्या मुलीची सर्व हकिगत सांगितली.

माझ्या दादाने क्षणाचाही विलंब न करता तिला धीर दिला. “पहिली गोष्ट, तू अजिबात घाबरू नकोस. आता तू एकटी नाहीस, आम्ही आहोत तुझ्यासोबत.” माझ्या दादाच्या या बोलण्याने तिला खूप धीर आला. दादाने तिला एक मार्ग सुचवला, “तू कांजूरमार्गला उतरू नकोस. ती मुले तिथेही तुझा पाठलाग करतील. तू आमच्यासोबत थेट ठाण्याला चल. जेवून घे आणि रात्री सुरक्षित वाटले की मग विचार करू पुढे काय करायचे ते.” सुरुवातीला तिच्या चेहऱ्यावर अविश्वासाची आणि भीतीची रेषा उमटली… ‘हे लोक तरी चांगले असतील ना?’ आणि हा विचार तिच्या मनात येणे त्या परिस्थितीत स्वाभाविक होते. एकदा ठेच लागली की माणूस पुढचे पाऊल विचार करूनच टाकणार. पण माझ्याशी बोलताना तिला जाणवलेली आपुलकी आणि माया यामुळे हळूहळू तिच्या मनातील शंका विरघळली. तिने आमच्यावर विश्वास ठेवला. ठाणे स्टेशन आले. ती मुलगी बिनधास्तपणे आमच्यासोबत खाली उतरली. ती गुंड मुले सुद्धा आमच्या मागोमाग उतरली. पण आम्ही तिघे तिला मध्यभागी घेऊन सुरक्षितपणे चालत होतो. आमचा ठाम आव आणि एकत्र असणे पाहून त्या गुंडांची हिम्मत झाली नाही बहुतेक. काही अंतरावर त्यांनी आपला रस्ता बदलला आणि ते दुसऱ्या वाटेने निघून गेले. आम्ही तिला घरी घेऊन आलो. आईला सर्व कल्पना दिली. आईने घाबरलेल्या त्या मुलीला हात-पाय धुवायला पाणी दिले. प्रेमाने जेवायला वाढले. जेवण झाल्यावर मात्र त्या मुलीच्या मनात तिच्या आई-वडिलांची काळजी दिसू लागली. मोबाईल नसण्याचा तो काळ होता. टेलिफोन सुद्धा क्वचितच कुणाच्या घरी असायचे. मुलगी वेळेवर घरी पोहोचली नाही म्हणून तिचे आई-वडील काळजीने व्याकुळ झाले असणार, याची आम्हाला सुद्धाकल्पना होती. रात्रीचे अकरा वाजले होते. पाऊस पडतच होता. आम्ही तिला एकटीला सोडणे योग्य नव्हते. मी आणि दादाने तिला सोबत घेतले आणि रात्री साडेअकराच्या सुमारास सुरक्षितपणे तिच्या कांजूरच्या घरी नेऊन सोडले.

दरवाजा उघडताच समोर चिंतेत उभे असलेले तिचे आई-वडील दिसले. आपल्या मुलीला सुरक्षित आणि आमच्यासोबत आलेले पाहून त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांनी आमचे हात हातात घेऊन शंभरदा आभार मानले. एका अनोळखी कुटुंबाने दाखवलेल्या या माणुसकीने ते गहिवरले होते. त्या एका रात्रीच्या घटनेने आम्हाला कायमचे एका घट्ट नात्यात बांधले. त्या मुलीने मला ताईचे आणि दादाला आपल्या भावाचे स्थान दिले. आज ४० वर्षे उलटून गेली, पण ते नाते अजूनही टिकून आहे. दरवर्षी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन येते, तेव्हा ती न चुकता आमच्या घरी येते आणि आमच्या हातावर विश्वासाची आणि प्रेमाची राखी बांधते. आज जेव्हा मी बातम्यांमध्ये पाहते - कोणावर तरी चाकूने हल्ला होतोय आणि डब्यातील इतर लोक फक्त बघ्याची भूमिका घेऊन आहेत, तेव्हा मला माझ्या भावांची ती डोळस तत्परता आठवते. जर त्या दिवशी आम्हीही “मला काय करायचंय?” असा विचार करून तोंड दुसरीकडे फिरवले असते, तर कदाचित एका निष्पाप मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते.

आम्ही त्या मवाली मुलांशी अजिबात झगडाझगडी केली नाही. त्यांना ‘शिकवायला’ गेलो नाही कारण अशा निडर लोकांशी वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो. फक्त त्यांना दाखवून दिले की ती मुलगी एकटी नाही आम्ही सर्व तिच्यासोबत आहोत. त्या मुलीला आमच्यासोबत घरी नेण्याचा माझ्या दादाचा विचार अगदी अचूक आणि समंजसपणाचा होता. काहीही हाणामारी न होता आम्ही त्या मुलीचे रक्षण केले होते. कठीण प्रसंगात कोणाचा तरी हात घट्ट पकडणे म्हणजे काय, हे त्या रात्रीने आम्हाला शिकवले. ‘मला काय त्याचे?’ ही वृत्ती जर प्रत्येक माणसाने सोडून दिली, मनाची संवेदना जागी ठेवली, तर आजही कित्येक निष्पाप आयुष्ये बरबाद होण्यापासून वाचू शकतात! ट्रेन मध्ये महिलांचे रक्षण करण्यासाठी चार महिलागणिक एक पोलिस ठेवा यासारख्या अवाजवी अपेक्षा सरकारकडून करण्यापेक्षा आपण स्वतःच अशा महिलांचा संरक्षक होणे ही गोष्ट जास्त योग्य नाही का ?

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा