Nashik Crime : समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील मलढोण शिवारात रात्रीच्या सुमारास कार अडवून कुटुंबीयांना मारहाण करत तब्बल १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कारचे टायर फोडून प्रवाशांना लक्ष्य करण्यात आल्याने समृद्धी महामार्गावरील रात्रीच्या प्रवासाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात संशयितांचा शोध सुरू आहे. (Sinnar Crime News)
नेमकं काय घडलं ?
छत्रपती संभाजीनगर येथील श्रीकांत राजेंद्रसिंग मिश्रा (३७) हे आपल्या कुटुंबीयांसह कारमधून समृद्धी महामार्गाने मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मलढोण शिवारातील समृद्धी महामार्गावरील चॅनेज क्रमांक ५४२.१ जवळ त्यांच्या कारच्या पुढील चाकासमोर अचानक लोखंडी वस्तू टाकण्यात आली. लोखंडी वस्तूवरून वाहन गेल्याने कारचे टायर फुटले आणि वाहन महामार्गावरच थांबले. कार थांबताच मागून आलेल्या अंदाजे ११ ते १२ अज्ञात व्यक्तींनी फिर्यादी श्रीकांत मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर धमकावत बळजबरीने त्यांच्या ताब्यातील रोकड आणि सोन्याचे दागिने काढून घेतल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या धक्कादायक लुटीत सोन्याच्या अंगठ्या, चैन, नेकलेस, बांगड्या, पाटल्या, कुड्या यांसह विविध दागिने आणि रोख रक्कम असा एकूण तब्बल १८ लाख ९ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटण्यात आला आहे. घटनेनंतर याप्रकरणी वावी पोलिस ठाण्यात(Wavi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अद्याप अज्ञात आहेत. पोलिसांकडून संशयितांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार देविदास माळी आणि शहाजी शिंदे करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. (Sinnar Crime News)
Nandurbar : सध्या राज्यभर गाजत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अर्थात एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या (Drug Inspector) परीक्षेतील कथित पेपरफूट प्रकरणाचा ...
रात्री तीन वाहनांना लक्ष्य केल्याची चर्चा
दरम्यान, याच परिसरात गुरुवारी रात्री चोरट्यांनी जवळपास तीन वाहनांना लक्ष्य केल्याची माहिती समोर येत आहे. यातील एका कारचे टायर फुटल्यानंतर १० ते १२ जणांनी कारजवळ जाण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कारमधील एका व्यक्तीने स्वतःच्या सुरक्षेसाठी पिस्तुलातून गोळीबार केल्याने संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान पोलिसांकडून एका घटनेतील कारची चौकशी सुरू असतानाच दुसऱ्या कारलाही लुटण्यात आल्याचे समजते. मात्र, या घटनांबाबत अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नसून, संबंधित घटनांची पडताळणी आणि सविस्तर तपास पोलिसांकडून सुरू आहे.
वावीला समृद्धीचा थेट एक्झिट पॉईंट देण्याची मागणी
वावी पोलिस ठाणे आणि समृद्धी महामार्गातील अंतर अवघे एक किलोमीटरच्या आसपास असले, तरी महामार्गावर थेट जाण्यासाठी पोलिसांना सुमारे २० किलोमीटरचा फेरा मारावा लागत असल्याची स्थिती आहे. समृद्धी महामार्गावर अपघात, लूट किंवा अन्य आपत्कालीन घटना घडल्यास पोलिसांसह रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सेवा तातडीने घटनास्थळी पोहोचणे गरजेचे आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत पोलिसांना मोठा वळसा घ्यावा लागत असल्याने आपत्कालीन प्रतिसादावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत उपलब्ध होण्यासाठी वावी परिसरात समृद्धी महामार्गाला थेट एक्झिट पॉईंट देण्यात यावा, अशी मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.